BUY NOW

राजश्री देशपांडे

- राज जाधव

IMG_0588

प्रश्न: राजश्री तू मूळची औरंगाबादची आहेस. तुझ्या परिवाराविषयी काही सांगशील का?
उत्तर : – हो, मी मूळची औरंगाबादची आहे. माझी आई जिल्हा परिषदमध्ये काम करायची आणि बाबा युनिव्हर्सिटीमध्ये होते. त्याच्या आधी बाबा शेती करायचे, पण काही कारणांमुळे शेती सोडावी लागली आणि ते युनिव्हर्सिटीमध्ये रुजू झाले.

प्रश्न: औरंगाबाद, औरंगाबाद मधील शिक्षण आणि तिथून पुढे पुणे ते नंतर मुंबई प्रवास कसा झाला?
उत्तर: औरंगाबादमध्ये मी बारावी पर्यंत होते, त्यानंतर मी पुण्याला आले, सिंबायोसिस कॉलेजमध्ये मी लॉ मध्ये ग्रॅज्युएट झाले. तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर तुम्हाला आधाराची गरज असते. आईची ही अशी शिकवण होती, की यु हॅव टू सपोर्ट युवरसेल्फ. त्यानंतर मला अॅड एजन्सीमध्ये क्लाएंट सर्व्हिसिंगची नोकरी मिळाली. मला माहितही नव्हतं की क्लाएंट सर्व्हिसिंग काय होतं, पण मजा आली. दोन वर्षे मी खूप मेहनत केली आणि बरंच शिकायलाही मिळालं. नंतर अशी वेळ आली, की मी माझी स्वतःची एजन्सी सुरू केली. चार-पाच वर्षे मी पुण्यामध्ये काम केले आणि नंतर मुंबईला शिफ्ट झाले.

प्रश्न: आधी लॉ, मग ॲडव्हर्टायझिंग त्यानंतर फिल्ममेकिंगमध्ये डिप्लोमा आणि शेवटी अभिनय. हा असा लांबचा प्रवास कसा घडला? म्हणजे आधी माहीत होतं अंतिम मुक्काम काय करायचा आहे, की हे घडत गेलं?
उत्तर: लहानपणापासून मी केवळ कामच करत होते. मी नाटकात आधीपासून काम करायचे, अगदी लहानपणापासूनच. पण ते सगळंच कुठेतरी हरवलं होतं, ना पुस्तक वाचन, ना काही नवीन पाहणे, स्वतःसाठी तेवढा वेळ नव्हता. मला कुठेतरी ते एक्सप्लोर व्हायला हवं होतं. त्यामुळे मग मी जेव्हा मुंबईला शिफ्ट झाले तेव्हा वाटलं की आपण काहीतरी शिकावं. त्यामुळे मी फिल्ममेकिंगचा कोर्स केला.

प्रश्न: फायनली अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं आहे असे काही ठरवलं होतं की जे सारं घडत गेलं.
उत्तर: एक आत्ताची जनरेशन सोडली, तर कोणाचेही आई-बाबा सांगत नाहीत की तू फिल्ममध्ये करीयर कर. असे खूप कमी, दुर्मिळ लोक आहेत ज्यांना कलेची आवड होती. पण, मी ज्या बॅकग्राऊंडमधून आले आहे तिथे कोणी असे म्हणणारे नव्हते की तू मोठी होऊन कलाकार हो. डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्याची पद्धत होती, कारण, तेच स्टेबल आहे आणि अभिनयाला नेहमीच एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिविटी म्हणून पाहिले जायचे. मी जेव्हा मुंबईला फिल्ममेकिंगला गेले तेव्हा सुद्धा असं जाणवलं नाही की मी हे करिअर म्हणून बघते आहे. मी ही एक आवड म्हणूनच नेहमी पुढे नेली आहे आणि त्या आवडीमध्ये माझं प्रोफेशन झालं. करिअर म्हणजे काय असतं? त्यामध्ये तुम्ही काम करता आणि त्याचा मोबदला मिळतो. आता असं आहे की, मी माझं आवडतं काम करते आहे आणि मला त्याचा मोबदलाही मिळतो आहे, सो आय एम हॅपी.

प्रश्न: अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत पाय रोवत असताना, नेमका काय विचार होता? कारण तू केलेला प्रत्येक सिनेमा ‘वूमन ओरिएंटेड’ आहे. हे ठरवून केले आहे की तसे रोल्स येत गेले?
उत्तर: असं काही नाहीये, कारण मला वाटतं प्रत्येक सिनेमात जी स्त्री दाखवली जाते तिचा रोल हा तिच्या दृष्टीने वुमन ओरिएंटेड असतोच. प्रत्येक सिनेमाचा सेंटर पॉइंट वेगळा असतो त्याला मध्यवर्ती ठेऊन तो लिहिला जातो आणि मी ज्या सिनेमांमध्ये काम केले, त्याचा सेंटर पॉईंट हा वुमन ओरिएंटेड होता, म्हणजे अगदीच वुमन ओरिएंटेड नाही म्हणता येणार पण त्यात तो पॉइंट होता.

प्रश्न: जे कॅरेक्टर्स होते, मग ते सुभद्रा असो, एस दुर्गा किंवा अँग्री इंडियन गोड्डेस मधील लक्ष्मी असो हे मेजरली स्ट्रॉंग वुमन ला हायलाईट करणारे होते.
उत्तर: साधेच होते, फरक इतकाच आहे की कोणत्याही स्त्रीचा रोल जेव्हा बऱ्यापैकी लांबीचा दाखवला जातो तेव्हा लोक असे म्हणतात, ‘अरे ही वुमन ओरिएंटेड फिल्म आहे’, पण असे नाहीये. नजीकच्या काळातील कोणतीही मुव्ही पाहिली आणि त्यात स्त्री पात्राचा रोल थोडासा मोठा असला की लोक त्याला वुमन ओरिएंटेड फिल्म म्हणतात.

प्रश्न: म्हणजे कमर्शिअल फिल्म्समध्ये स्त्रीला तेवढा वाव मिळत नाही, असं म्हणायचं होतं.
उत्तर: कारण, कमर्शियल फिल्म्समध्ये एकतर्फी स्टोरी दाखवली जाते. हीरो, हिरोईन आणि व्हिलन हा जो एक टिपिकल पॅटर्न तयार झालेला आहे, की जो आजही कुठे कुठे फॉलो होतो. त्यामधून आपण बाहेर पडायला पाहिजे. We were always an Indian cinema, Indian cinema has more weightage. कारण, आपण तसा सिनेमा दिलेला आहे आणि आपल्या सिनेमाचा खूप मोठा इतिहास आहे. मला वाटतं आपल्याकडे जे लिटरेचर आणि टॅलेंट आहे ते कुठेच नाहीये. दुर्दैवाने आपल्याला आपला सिनेमा माहित नाहीये. कितीतरी लोकांना माहित नाहीये की मराठी मध्ये किती चांगले चांगले दिग्दर्शक आहेत, फिल्म्स बनत आहेत. तेवढेच सुंदर लिटरेचरही आहे. आपण आपला सिनेमा पाहिलेला नाहीये, आपण इतर भाषिक दिग्दर्शकांची नावे घेतो. अर्थात वर्ल्ड सिनेमाही तेवढाच महत्त्वाचा आहे, पण वर्ल्डमध्ये आपणही आहोत. आपण पाहायला हवं मराठी आणि इतर भारतीय भाषेत नवीन काय होते आहे. आपण आपला सिनेमा ओळखायला हवा आणि महत्त्वाचे म्हणजे त्याला प्लॅटफॉर्म द्यायला हवा.

प्रश्न: सेक्रेड गेम्सच्या सुभद्राचा शोध तुझ्यापर्यंत कसा येऊन पोचला?
उत्तर: विक्रम चंद्रा यांनी ही नॉवेल लिहिलेली आहे, ज्यात सुभद्राचा उल्लेख होता. Subuadra is a point, where Ganesh Gaytonde starts realising and changing his life. तो एक पॉईंट होता ज्याला अनुराग सरांनी आणि वरूण ग्रोवरने एक दिशा दिली, त्या कॅरेक्टरला व्यवस्थित डिफाईन केले, त्यामुळे हे खूप इंटरेस्टिंग होतं, प्रत्येक दिवशी पुढच्या भागात काय होणार याची उत्सुकता होती. अनुराग सरांचं सांगायचं तर, बर्‍याच वेळेस ते सेटवर काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात आणि तेच एक मॅजिक आहे. कधीकधी ठरवलेलं वेगळं असतं आणि वेगळेच काहीतरी करून बघू, अशी सूचना येते. किंवा कधी कधी त्यांनी ठरवल्यानंतर अॅक्टर्स काहीतरी वेगळं इम्प्रोवाईज करतात आणि त्यांना आवडून जातं. असा सेट असायला हवा जिथे कलाकारांना असं फ्रीडम आणि कम्फर्ट उपलब्ध होतं, ज्यात तो परफॉर्म करू शकतो.

प्रश्न: अनुरागच्या अगदी विरुद्ध म्हटलं तर विक्रमादित्य यांचं काम. त्याच्याबद्दल काय सांगता येईल?
उत्तर: प्रत्येक दिग्दर्शक हा वेगळ्या पद्धतीने बघतो, विचार करतो दोन भिन्न व्यक्ती एकच सीन वेगवेगळ्या प्रकारे लावू शकतात. प्रत्येक माणूस वेगळ्या प्रकारे त्याला बघतो. आनंदाची बाब आहे की दोन वेगळ्या डायरेक्टरने ही सिरीज डिझाईन केली. दोघांच्या नजरेतून दोन वेगळे विश्व आपल्याला पाहायला मिळाले. Both are incredibly talented and amazing people.

प्रश्न: फँटम बंद झाल्यानंतर सेक्रेड गेम्स सिझन २ साठी काही अडचण होण्याची शक्यता वाटते का?
उत्तर: माझ्या मते नाही येणार, कारण सेक्रेड गेम्स ही एक अप्रतिम नॉवेल आहे आणि सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे. या सिरीजमुळे एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, टॅलेंटेड एक्टर्स सोबत आहेत, आता कुठेतरी आपण जगाशी स्पर्धा करतोय असं वाटतंय. मला इतके मेसेज येतात वेगवेगळ्या देशातून. We are very proud की इंडियातून अशी सिरीज बनवली गेली. प्रत्येक बाबतीत ही सिरीज अगदीच परफेक्ट आहे, कारण प्रत्येकाने चोख काम केलेले आहे, कॅमेरा, रायटिंग, अभिनय सगळंच चोख आहे.

प्रश्न: सेक्रेड गेम्स, ज्यातील कामाची तारीफही होते आहे आणि टीकाही. एस दुर्गा आणि अँग्री इंडियन गॉडेस या चित्रपटांबद्दलही टीका झाली, अश्लील मेसेजेस आले, बराच मनस्तापही झाला असेल. हे, पर्सनली तू आणि तुझ्या परिवाराने कसे टॅकल केले?
उत्तर: दुर्लक्ष, दुर्लक्षच केलं, कारण काम इतकं आहे की अश्या गोष्टींसाठी वेळ नाही. या व्यतिरिक्त मी माझ्या गावासाठीही काम करते. मी दोन गावे दत्तक घेतली आहेत, मला इतकं काम असतं की मी शूटिंगनंतर मिळालेला वेळ गावासाठी देते. बरेचशे प्रीमियर देखील अटेंड करत नाही, कारण जे डायरेक्टर्स असतात ते तुमचा टॅलेंट बघून कास्ट करतात. थॅन्क गॉड अशा डायरेक्टर्स सोबत काम करायला मिळालं.

प्रश्न: सेक्रेड गेम्सच्या रोलबद्दल नावे ठेवणारे लोक तुझ्या समाजकार्यांबद्दल बोलताना कधी दिसले नाहीत, असे वाटते का?
उत्तर: नाही, मला खूप प्रेम मिळते आहे या विषयांबद्दल. मला असं वाटतं की आपल्या इथे लोक खूप चांगले आहेत. काही लोक वेगळा विचार करतात पण ठीक आहे, आपण करोड वर्षांच्या पॅट्रीअर्कल सोसायटीत राहत आहोत बदलायला थोडा वेळ लागेल.

प्रश्न: तू ट्रान्सजेंडर्ससाठी काम केलंय, दुष्काळी भागांसाठी काम केलं आहे, दोन गावे दत्तक घेतली आहेस? सुरुवातीला अगदी स्वखर्चाने हे केले आहे. या मागची भूमिका काय होती? त्याची गरज का वाटली?
उत्तर: माझी आई बऱ्यापैकी लोकांसाठी खूप काम करते. मी जेव्हा पुणे सोडून मुंबईला गेले होते तेव्हा प्रवासासाठी खुप वेळ मिळाला. तुम्ही ट्रॅव्हल करताना लोकांशी बोलता, त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकता, समजून घेता, तुम्ही त्यामधून काही शिकता आणि मग तुम्ही जेव्हा मागे वळून पाहता तेव्हा लक्षात येतं की तुम्ही खूप चुका केल्या आहेत. मी आत्ता ज्या पद्धतीने ट्रान्सजेंडर्स लोकांकडे पाहते, त्या दृष्टीने आधी कधीच पाहत नव्हते. मी प्लास्टिकवर देखील काम करते. मला नाही वाटत की मी आधी कधी प्लास्टिक पोल्युशनवर एवढा विचार केला होता. पण आता मी कटाक्षाने प्लास्टिक बॉटल्स टाळते. कारण जर मीच फॉलो करत नसेल तर इतरांना सांगण्यात काय अर्थ आहे. उशीर झाला असेल, पण ठीक आहे आतापर्यंत केलं नाही तर आत्ता करू शकतोच प्रत्येक जण. प्रत्येकाने विचार करायला हवा. चेंज स्टार्टस फ्रॉम यू फर्स्ट. मी स्वतःला पहिले बदललं आणि मग पुढे गेले. पांढरी आणि मठ जळगाव ही दोन गावे आहेत जिथे मी काम करते. इथे केवळ रेन वॉटर हार्वेस्टिंगचीच कामे आहेत असे नाही बरीच अजूनही कामे आहेत. बेसिक माइंडसेट बदलायचा आहे आपल्या लोकांचा, आपण नुसते त्यांना अशा गोष्टी देऊन चालणार नाही, ‘म्हणजे चला टॉयलेट देऊ, झालं आमचं काम, आम्ही निघतो’. याबाबतीत सावित्रीबाई फुले या खूप मोठ्या सोशल वर्कर होत्या, त्यांचा मला खूप मोठा आदर्श वाटतो, त्यांनी लोकांच्या घरी जाऊन कामे केलेली आहेत. लोकांची सेवा करताना त्यांचा मृत्यू होतो ही किती मोठी गोष्ट आहे. मला वाटतं की आपली जेवढी क्षमता आहे तेवढं तरी काम आपण नक्कीच करावं. माझी क्षमता नाहीये की मी हजार- दोन हजार लोकसंख्या असलेले गाव दत्तक घ्यावं. माझे काम बघून जर माझ्यासारख्याच अजून राजश्री पुढे आल्या, असंच जर लोकांना बळ मिळालं तर मीही अजून जोमाने काम करू शकते. आपलं काम आहे की एकमेकांना आपण बळ द्यावं. आपण एकमेकांचा हात धरून चाललो तरच आपण पुढे जाऊ शकतो.

प्रश्न: एस दुर्गा आणि अँग्री इंडियन गॉडेस हे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल्स गाजवलेले चित्रपट, त्यांचं परदेशात कौतुक होऊनही, भारतात त्याची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. याबद्दल काय वाटतं?
उत्तर: हो, काही अर्थी खरं आहे. मला वाटते आपल्याकडे डिस्ट्रीब्यूशन सिस्टिम अजून तितकी स्ट्रॉंग नाहीये. जास्तीत जास्त लोकांपर्यंत सिनेमा पोहोचेल याची खात्री करावी लागेल. मध्यंतरी असा काळ गेला की आपण वेगळ्याच पद्धतीचा सिनेमा लोकांना दिला. त्यांना असं वाटतं की लोकांना हे हवं आहे आणि लोकांना वाटतं की तुम्हीच आम्हाला हे दाखवत आहात, तुम्ही काही चांगलं का नाही दाखवत? थोडं थोडं बदलत आहे, लोकांनाही कळतय पण वेळ लागेल. आपल्या सर्वांनाच एक सिनेमा हवा आहे, पण मी हे म्हणत नाही की कमर्शियल सिनेमा नकोच आहे. एक चांगला सिनेमा हवा आहे, मग त्यात गाणी असोत वा नसोत पण त्यासोबत तथ्यही असायला हवे. काही लोक फिल्म बनवतात आणि ती सेल करण्यासाठी आइटम नंबर बनवतात हे जणू काही ते एक प्रॉडक्ट आहे.

प्रश्न: कमर्शियल फिल्म्स करण्याचा इरादा आहे का?
उत्तर: हो, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये कमर्शियल सिनेमा करायला. रोल चांगला असेल तर माझी काहीच हरकत नाही.

प्रश्न: फिल्म इंडस्ट्रीत कलाकाराला एखादे लेबल लावून बऱ्याचदा टाईपकास्ट केले जाते. ‘ये ऑफबीट फिल्म्स करती हैं’, किंवा ‘ये बोल्ड फिल्म्स करती हैं’ या अश्या साच्यात अडकण्याची भीती वाटते का?
उत्तर: नाही, मला साच्यात अडकण्याची भीती नाही वाटत आणि आता कमर्शिअल सिनेमाही बऱ्यापैकी रिस्पॉन्सिबली काम करतो आहे.

प्रश्न: एस दुर्गा आणि हरम या दोन मल्याळम मुवीत तू काम केलं आहेस, मल्याळम इंडस्ट्रीत अनेक चांगले विषय आपल्यापेक्षाही वेगळ्या प्रकारे हाताळले जातात. फहाद फासिलसोबत तू काम केलं आहेस, कसा अनुभव होता?
उत्तर: हरमचा अनुभवही चांगला होता. फहाद फासिल होता त्यामध्ये. माझं काहीच दिवसांचं शूट होतं, पण मला कन्सेप्ट फारच इंटरेस्टिंग वाटली. माझा डबल रोल होता. दोन वेगवेगळे करॅक्टर्स, एक अभिनेत्री आणि तिची बॉडी डबल ही कल्पनाच खूप आवडली मला. कारण खूप कमी लोक असे कॅरेक्टर्स स्क्रीनवर दाखवतात त्यामुळे रोल छोटा असूनही इंटरेस्टिंग होता. मल्याळम मध्ये बरेच अभिनेते आहेत जे चांगले काम करतात फहाद आहे, दुलकर आहे. जुन्या कलाकारांतही मोहनलाल सर वगैरे चांगले काम करतात.

प्रश्न: तू ‘मंटो’ मध्ये पुन्हा नवाजसोबत काम करत आहेस. पण, यात दोघेही पूर्णतः वेगळ्या भूमिकेत दिसत आहात. नवाज आणि नंदिता दास यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
उत्तर: खूपच सुंदर! खूपच सुंदर अनुभव होता नवाज आणि नंदितासोबतही. दोघेही कसलेले अभिनेते आहेत.
आधी आम्ही मंटो शूट केला आणि नंतर सेक्रेड गेम्स. नवाज आणि माझा अनुभव म्हणजे असा आहे की, जसे आपण क्रिकेट खेळतो तेव्हा पळणारा माणूस हा विचार करत नाही की समोरचा पळेल की नाही. त्याला माहित असतं की समोरचा माणूस पण पळेल. ॲक्टिंगचेही असेच आहे, तुम्ही फक्त तुमचं काम करा, समोरचा माणूस त्याच्या पद्धतीने काम करेलच. भले आम्ही सेटवर भेटतो तरीही ती केमिस्ट्री आपोआप पडद्यावर येते. सीनच्या व्यतिरिक्त आम्ही अशा गप्पा वगैरे मारत बसत नाही, तसाही थोडासा इंट्रोवर्ट आहे तो. पण त्याने काय फरक पडतो, शेवटी तुम्ही स्क्रीनवर काय करता हे जास्त महत्वाचे असते.

प्रश्न: सेक्रेड गेम्सच्या इतर बऱ्याच फेमस पात्रांपैकी सुभद्रासुद्धा एक असे पात्र होतं, की जे लवकर आणि अनपेक्षितपणे मरण पावलं. दुसऱ्या सीझनमध्ये फ्लॅशबॅकमध्ये वगैरे पाहण्याची शक्यता आहे का?
उत्तर: आय होप सो, कल्पना नाही, बघू या काय होतंय ते. खरं सांगू का, विक्रम चंद्राने ही इतकी सुंदर नॉवेल लिहिलेली आहे. पुढेही तुम्ही पहाल की इतके सुंदर कॅरेक्टर्स आहेत. शिवाय काही गोष्टींची मजा थोडक्यातच असते. विनाकारण एखादे पात्र ओढूनताणून वाढवण्यात अर्थ नसतो. I am ok even if I am not there or even I am there. कारण, सुभद्राचा तिथे ऑलरेडी प्रेझेन्स आहे. त्याबदल्यात एका नवीन कॅरेक्टरला बघा. As an actor, आपल्याला संतुष्ट व्हायला हवं.

प्रश्न: सध्या पुढचे प्रोजेक्ट कोणते आहेत?
उत्तर: मी आत्ता एक नवीन फिल्म शूट करते आहे आदिल हुसेनसोबत. फिल्मचे नाव निर्वाना आहे, दिग्दर्शक जयपाल आहेत. आम्ही मनाली मध्ये शूट करणार आहोत.

प्रश्न: मराठीमध्ये काही करत आहेस?
उत्तर: सत्यशोधक नावाची एक फिल्म शूट केली आहे मी आणि संदीप कुलकर्णी यांनी. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित आहे ही फिल्म. अजून काही दिवस बाकी आहेत, थोडासा वेळ लागतो आपल्या इथे, बघू कधी कंप्लीट होते. या फिल्मच्या माध्यमाने नव्या पिढीला ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले कळतील, याचा आनंद आहे. मंटो आणि इस्मत चुगताई देखील बऱ्याच जणांना माहीत नव्हते. माध्यम कोणतेही असो पण जर माणूस त्याद्वारे एखादी माहिती मिळवून, ऐकून, पाहून जागा होत असेल तर ते माध्यम आणि तो प्रयत्न गरजेचा आहे.

IMG_0553

प्रश्न: सध्या चालू असलेल्या metoo ट्रेंडबद्दल काय वाटतं
उत्तर: मला खूप चांगलं वाटतंय. पण हा फक्त ट्रेंड नसावा, आपण प्रत्येकाने नेहमीच असं बोललं पाहिजे, आधीही बोललं पाहिजे होतं. म्हणून हा ट्रेंड नसावा, ही एक मुव्हमेंट असावी आणि ही अशीच रहावी. आपली पॅट्रीएर्कल सोसायटी आहे त्यामुळे आधीपासून हे असंच चालत आलं आहे. शिवाय हे फक्त मुलींसाठी नाहीये, हे सगळ्यांसाठी आहे.

प्रश्न: चित्रवेधसोबतच्या असोसिएशन बद्दल काही सांग. चित्रवेध सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
उत्तर: चित्रवेधच्या मदतीने सुचेता जे काम करते आहे, तशा गोष्टी अजून व्हायला हव्यात, तरच नवनवीन गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतील. चित्रवेध हे बऱ्याच बाबतीत टिपिकल नाहीये अगदी कव्हर पासून कन्टेन्ट पर्यंत त्यात वेगळेपण आहे हे मला विशेष भावलं. चित्रवेध इज ऑल अबाऊट फिल्म्स बट फिल्म्स इज लाइफ आणि त्या सिनेमाचा वेध म्हणजेच चित्रवेध, त्यामध्येच सगळं आलं. चित्रवेध मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या इन्फरमेटीव्ह आहेत, दोज विल बी अ पार्ट स्टोरी टेलिंग. मी एक एन जी ओ चालवते, पण मला वाटायचं की त्याची गरजच नसावी. पण कुठेतरी तसं एक चॅनल लागतं, तसंच चित्रवेध हे सिनेमासाठीचे एक चॅनल आहे असं मला वाटतं.

COMMENTS