BUY NOW

साडी, तुझी, माझी आणि तिची

-सुवर्णरेहा जाधव

sarees1

२६ मार्च १९४२, २५ फेब्रुवारी १९६८ आणि १८ फेब्रुवारी १९९७ या तीन दिवशी एकच साडी तीन वेगवेगळ्या व्यक्तींची वापरली, तीन पिढ्यातील तीन स्त्रिया, मात्र साडी विणणारी व्यक्ती एकच. इंदिराजी, सोनिया आणि प्रियांका गांधीनी आपापल्या लग्नात नेसलेल्या या साडीची सूतकताई पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तुरुंगात असतांना केली होती.

Gandhi family heirloom म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खादीच्या साडीची कहाणी मला खूप fascinate करते. एका साडीची सहा दशके! तुरुंगात असताना ह्या साडीसाठी सूत कातताना नेहरूंच्या मनात काय विचार येत असतील? स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी विचार की ज्या स्त्री साठी ही कताई चालली होती तिच्या बद्दलचे प्रेम, वात्सल्य भावना..? हे सगळे विचार, या भावना त्यांच्या मनातून, हातातून, त्या सुतात आणि त्या विणीत उतरल्या असतील का?

उद्या ही साडी जर स्वत:ची आत्मकहाणी सांगू लागली तर काय काय बोलेल? इंदिराजींना वडिलांचा सहवास फारसा मिळू शकला नाही, कारण ते सतत तुरुंगात असत. पण, ही साडी जेव्हा इंदिरेने स्वत:वर लपेटली तेव्हा वडिलांबरोबर हुकलेले सुंदर क्षण त्यांना पुन्हा जाणवले असतील का? त्या साडीने लग्नाला उभे राहिलेल्या मुलीला, बापाच्या मायेने गोंजारलं असेल का? असे अनेक विचार माझ्या मनात येत रहातात. नंतर जेव्हा सोनियाजीनी हीच साडी स्वत:च्या लग्नात वापरली तेव्हा परदेशातून आलेली मुलगी या साडीच्या माध्यमांतून भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामाचा भाग झाली असेलच. त्यानंतर प्रियांकानेही हीच साडी इतर महागड्या साड्यांऐवजी वापरणे पसंत केलं. त्यांच्या इतर साड्याही प्रियांका अधून मधून वापरत असते. तसंच, वरूण गांधी यांची पत्नी यामिनी हिनेही इंदिराजींनी मनेकाला तिच्या लग्नात दिलेली साडी वापरली, जी मुळात इंदिराजींची आई कमला नेहरू यांची होती. या साड्यांच्या कथांवर एखादा चित्रपट बनू शकेल अस मला राहून राहून वाटतं.

चित्रपटावरून वरून आठवली या वर्षीची नॅशनल अवॉर्डस्! श्रीदेवीला मिळालेलं अवॉर्ड घ्यायला तिची कन्या जान्हवी कपूर, श्रीदेवीची एक आवडती साडी नेसून गेली. तिच्या आईची मायाच तिच्याबरोबर ती लपेटून घेऊन गेली. असा जीव कसा अडकतो ना या साड्यांमध्ये! श्रीदेवी गेली तेव्हाही तिच्या आवडीच्याच साडीत तिला शेवटी लपेटून नेलं गेलं.. बऱ्याचदा लग्नात नेसलेली साडी स्त्रीला तिच्या शेवटच्या प्रवासातही नेसवतात. श्रीदेवी अचानक गेली, कोणताही हासभास नसतांना. तिने सांगून ठेवलं असेल का कुणाला, की माझ्या शेवटी हीच साडी मला नेसवा की इतर कोणी तरी तो निर्णय घेतला असेल?

का करतो आपण या साड्यांवर इतक प्रेम ?

पाच सहा यार्ड कपड्याचा एक रंगिबिरंगी तुकडा, आपल्याला किती गुंतवून ठेवतो. तिची सुरुवात कुठून होते, किती काय काय process होतात तिच्यावर! शेतकरी जमीन तयार करतो, तिच्या जन्मासाठी. एक बीज, कपाशीचे झाड, त्याला येणारी पाने फुले, फळे त्यातून तयार होणारा कापूस, ती झाडं सांभाळताना केलेली मशागत मग केलेली खुडणी, कापसापासुन कपड्यापर्यंतची सगळी प्रोसेस, धाग्यावर चढवलेले रंग आणि डिझाईन !!

किती जणांचे हात लागतात एका साडीला या सगळ्या प्रक्रियेत. त्या वेळच्या त्यांच्या मानसिकतेचा काही परिणाम होत असेल का त्या धाग्यांवर. ते विणतांना त्यांचा मनातील विचार त्या विणीच्या बंधनात अडकत असतील का? रंगवतांना रंगाऱ्याच्या मनात असणारे भाव, कोणते रंग घ्यायचे ते ठरवतात का? म्हणजे आनंदी असला तर साडीवर चढणारे रंग आणि दुःखी किंवा न्युट्रल भावनेने रंगवत असेल तर रंगाचे निवडीवर परिणाम होत असेल का? हे सगळं मनात आल्याशिवाय रहात नाही.

माझ्या आजीचा एक शेला होता पैठणीचा. तिच्या प्रत्येक मुलीने म्हणजे माझी आई आणि माझ्या मावश्या यांनी तो आपल्या लग्नात वापरला. त्यानंतरच्या पिढीने म्हणजे आम्ही सगळ्या बहिणींनी तो आपापल्या लग्नात वापरला. माझे लग्न होईपर्यंत तो जीर्ण झाला होता …तरीही वापरेन तर तोच, हा माझा हट्ट होता आणि घरच्यांनी तो पुरवलाही. आजही तो शेला माझ्या आजोळी आहे. त्यात माझी आजी, आई, मावश्या, बहिणी यांच प्रेम साठलेलं आहे. त्या किरमिजी शेल्याने माझी लग्नाची पिवळी साडी खुलवली, मला नवरी म्हणून खुलवलं.

त्याच आजीच्या एका साडीचा मी नंतर एक ड्रेस शिवला होता त्या काळातील ते upcycling (अपसायक्लिंग) होतं आता तर असे अनेक DIY videos आपल्याला पहायला मिळतात, जुन्या साड्यांचे नवीन प्रकार वगैरे. माझ्या आईने एक प्रयत्न केला होता, तिच्या एका मऊशार जुन्या कॉटन साडीच्या पट्ट्या कापून त्याच्या वेण्या घालून मस्त गुबगुबीत पायपुसणी केली होती तिने. सुंदर दिसायची. स्पर्श केला की अगदी मस्त वाटायचे. पण मला मात्र त्याला पाय पुसणे जीवावर यायला लागलं. एक दिवस उचलली, धुतली आणि कपाटात ठेवली. आणि आईला म्हटले बाई तुझं रिसायकलिंग आता पुरे. त्यापेक्षा गोधड्या बनव. अंगावर घेईन तेव्हा तू कुशीत घेऊन झोपली आहेस अस तरी feeling येईल. खरंच,आईची साडी आणि तिच्या पदराची महती न संपणारी.

साडी हे रोजच्या वापरातील वस्त्र असल्याने अतिशय सूटसूटीत असावे. काही टक्के शहरी स्त्रिया सोडल्या इतर सगळीचकडे बायका दिवसभर साडी नेसतात. त्यामुळे काम करतांना अडथळा येऊन चालत नाही. पूर्वी तर नऊवारी नेसून युद्धावरही जात असत, नऊवारी असते पँटसारखी, त्यामुळे घोड्यावर मांड टाकायला जमत असेच. आता तर सणासमारंभाला नऊवारी नेसून बाइक्स वरून बसून किती मिरवतात मुली. पूर्वी हातात ढाल तलवारी असत, आता ढोल नगारे.

पाचवारी तशी नेसायला सोपी. घरी शक्यतो सुतीच साड्या नेसल्या जातात. तिच्या पदराचे उपयोग ते किती! थंडी वाजली खांद्यावर घे शाली सारखा. गरम वस्तू पदराने उचला जेणेकरून हाताला चटका बसणार नाही. धुळीने माखून आलेल्या मुलाचा चेहरा धुतल्यावर आईच्या पदराने पुसला की लखलखीत स्वच्छ व्हावा इतकी त्या पदराची ताकद. चार चौघात जातांना लाजऱ्या बाईला स्वत:चा चेहरा झाकण्यासाठी मद्त करणारा पदर, उन्हात चेहरा काळवंडू न देणारा पदर, बाळाला पाजताना कोणाची नजर पडू नये असा आईला आणि बाळाला सांभाळणारा पदर! याच पदराच्या चिंध्या फाडून जखमेवर बांधलेल्या आपण किती तरी चित्रपटामधून पाहिलेल्या आहेत. आणि तशीच या चिंधीची राखी बांधून घेऊन बहिणीचे रक्षण केल्याच्या कथा आपण इतिहासात वाचलेल्या आहेत. याच जुन्या झालेल्या साडीची मग गोधडी होते. बंगालचे कांथा भरतकाम, गोधडी प्रकारातून डेव्हलप झालेलं आहे. ही गोधडी मीच घेऊन झोपणार अशी लडिवाळ भांडणे घराघरातून होतांना आपण पाहत असतो.

साडी पाच, सहा आणि नऊवार या लांबीत उपलब्ध असते. काही डिझाईनर्स customized साड्या पण करतात. विशेषतः सिनेमामधून साड्यांचे वेगवेगळे प्रकार आणि लांबी आपल्याला दिसून येते. माझ्या नजरे समोर येतो तो विधु विनोद चोप्राच्या “करीब” या सिनेमातील ‘चोरी चोरी जब नजरे मिली’ या गाण्यात त्याने केलेल्या साडीचा पदराचा वापर ! “बादल का आँचल भी आकर वो पागल हवा ले गई” म्हणत बॉबी देओल ती पिवळाशार साडी निळ्याभोर आभाळात उडवताना पहाणे म्हणजे नजरेला एक ट्रीट आहे!!

सिनेमा आणि साडी हा आपल्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय. साडीतल्या फॅशन मधील ट्रेंड्स आणण्यासाठी सिनेमासारखे माध्यम नाही. यश चोप्राच्या सिनेमातील श्रीदेवी, माधुरीच्या साड्या आपण कधी विसरू शकू का? मार्केट मध्ये गेलं की सिनेमातील latest style च्या साड्या घ्यायचा आग्रह दुकानदार करतच असतात, चांदनीतील श्रीदेवीच्या साड्या, हम आपके हे कौन मधील माधुरीची जांभळी साडी. रंगीलातील उर्मिलाच्या plain रंगीत शिफॉन साड्या या सगळ्या ट्रेंड सेटर्सच! पुन्हा हे सर्व साड्यांपुरते रहात नाही. ब्लाऊझच्या वेगवेगळ्या स्टाईल्स, बांगड्याच काय व त्या साडीवर त्या हिरोईनने लावलेल्या बिंद्या (टिकल्या) पण तिच्या नावाने प्रसिद्ध होतात. आणि आपण जेव्हा तशी साडी नेसून नटतो तेव्हा थोड्या वेळासाठी का होईना स्वत:ला स्वप्नसुंदरीसारखे भासू लागतो. सुंदर feel करतो.

ही एक प्रकारची थेरपी झाली मग. कधी dull, depressing वाटत असेल तर मिस्टर इंडियातील श्रीदेवी सारखी साडी नेसून पहा. सैलाब मधील “हमको आज कल है” मधील नऊवारी नेसलेली माधुरी आठवून पहा लगेच छान वाटायला लागेल.

साडी जितकी आपल्याला शालीन सोज्वळ भासवू शकते तेवढीच ती मादक ही feel करवू शकते. फक्त काही गोष्टीचे भान आपण ठेवायला हवं म्हणजे– आपल्याला काय बरं दिसतं. आपण कुठे जाणार आहोत, आपला audience काय असेल. सिझन कोणता आहे, प्रसंग कोणता आहे, आपला बॉडी शेप काय आहे, आपल्याला कोणता रंग सूट करतो. रात्र आहे की दिवस. इतक्याच (!) गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात आणि मग या सगळ्याला साजेशी साडी आपल्या वॉर्डरोबमध्ये आहे का हे ही पहायला लागते. नाहीतर निघा पुन्हा shopping ला.

ही झाली सिनेमातील स्वप्नवत सुंदर कहाणी. पण, आपल्या सिनेमातून साड्या अनेक प्रतीकात्मक पद्धतीने सुद्धा चित्रित केल्या गेलेल्या आहेत. एखाद्या स्त्रीवर वाईट नजर टाकणारा व्हिलन आणि तिच्या खांध्यावरच्या फाटलेल्या पदराकडे जाणारी त्याची नजर. हिरोईनच्या नकळत तिचा अचानक ढळलेला पदर आणि त्यावरची प्रतिक्रिया, अनेक ठिकाणी फाटलेली साडी आणि त्यातून जाणवणारे स्त्रीचे दैन्य.

अशावेळी प्रकर्षाने आठवतो तो गांधी सिनेमातील एक प्रसंग. बापूजी एका नदीकाठी हातातील पंचा पाण्यात बुडवून चेहरा पुसत बसतात. तेव्हा त्यांची नजर समोरच्या काठावर असलेल्या एका अत्यंत गरीब आईकडे जाते जिच्याजवळ तिचं बाळ आहे. तिच्या शरीरावरच्या कपड्यांची लक्तरे झालेली असतात. तिच्या लक्षात येतं, की समोरच्या किनाऱ्यावरून कोणीतरी (बापूजी) आपल्याकडे पाहतोय. तिला त्यांच्या नजरेतील दु:ख दिसत नाही फक्त पुरुष दिसतो. लज्जा रक्षणासाठी ती स्वत:च्या शरीरावरची फाटलेली वस्त्र तशाही परिस्थितीत नीट करण्याचा प्रयत्न करते आणि बापू इकडून आपला पंचा पाण्यात तिच्यासाठी सोडतात. तो वहात वहात तिच्यापर्यंत जातो आणि पटकन आणि अत्यंत कृतज्ञेतेने ती तो घेते आणि छातीशी कवटाळते तेव्हा समोर असणारी व्यक्ती महात्माच असली पाहिजे हेच तिच्या चेहऱ्यावरचे भाव सांगतात . या प्रसंगात जरी बापूनी पंचा तिच्याकडे पाठवला असला तरी तिच्यासाठी तो लज्जारक्षण करणारा पदरच झाला असेल हे जाणवते. अत्यंत प्रभावी अस हे दृश्य मनातून जात नाही. देशातील गरीबांच्या व्यथा यातून दाखवून देतं. गरीब बायका, लोकांनी दिलेल्या साड्या किंवा अनेक तुकडे जोडून दंड घातलेल्या पाच वार केलेल्या साड्या नेसतात. आता मात्र असे अनेकविध कपडे जोडून बनवलेल्या designer साड्या आपण हजारो रुपये देऊन विकत घेतो.

आपल्याकडे प्रत्येक राज्यात एकेक प्रकारची साडी बनते, ती तिथल्या हवामानाला साजेशी, स्थानिक मटेरिअल वापरून बनवलेली असते. माझ्या भारतीय textiles च्या अभ्यासात भारतभर फिरले तेव्हा जाणवलं की गावागावातून साडी विकणारा विणकर गरीबच राहिला आहे. ज्या साड्यांना आपण हजारो/ लाखो (पैठणी, पटोला) रुपये देतो त्याचे या कारागिरांना मात्र मिळणारे पैसे फारच कमी असतात. दुकानदार मात्र फायदा करून घेतात. आपण प्रत्येक सणासमारंभाला साड्या विकत घेत असतो. त्यामुळे साड्यांना मागणी असतेच. पण, जो ही साडी विणतो तो रिकामाच राहतो. हजारो वर्षे जी फॅशन चालत आलीय ती अजूनही तितकीच वर्षे चालेल …आता तर ती ग्लोबल पण होत जातेय.

साडी आणि साडीवरच्या accessories म्हणजे ब्लॉऊझ पीसेस, पेटीकोटस, दागिने, बटवे आणि ते शिवणारे, बनविणारे हे सगळे, यावर इतके कारागीर अवलंबून आहेत; त्यामुळे वाटतं जर साडी चुकून कधी फॅशन मधून गेलीच तर तिच्यावर अवलंबून असणारे किती तरी धंदे (business) बंद होतील! आणि मग आमच्यासारख्या साडी प्रेमींचे काय होईल याचा विचारही मला करवत नाही !

COMMENTS