BUY NOW

बहुरूपी सुबोध भावे

- महेश देशमुख

subhodh1

प्रश्न : लाटेत अडकलेला मराठी सिनेमा मागच्या दशकापासून बाहेर आलाय. राष्ट्रीय स्तरावर मराठी सिनेमाची दखल आवर्जून घेतली जाते. त्यात तुमच्याही सिनेमांचा मोठा वाटा आहे. या बदलाकडे कसे बघता?

उत्तर : मराठी सिनेमाचं माध्यम मागच्या काही दशकांत खूप बदललं आहे. हे चांगले बदल आहेत. म्हणजे २००२ मध्ये मराठीत वर्षाला १२ सिनेमे बनले होते. आता ही संख्या १८० च्या आसपास गेली आहे. मी इंडस्ट्रीत येण्याआधी आणि आल्यावरही लाटेवरचे सिनेमे बनत. विनोदी, सामाजिक, लावणी अशा सिनेमांच्या लाटा यायच्या. त्याला असा त्यावेळी एक निश्चित रस्ता मिळत नव्हता. तीन चार वर्षं मी काम करायला लागल्यावरही तशातच गेली. सिनेमे रिलीज होण्याचं प्रमाण कमी होतं. रिलीज व्हायचेच नाहीत. माझे तर किती तरी सिनेमे असे आहेत, की मलाच माहिती नाही की ते रिलीज झाले आहेत की नाहीत. त्यातच २००६ साली ‘श्वास’ आला. आणि ५० वर्षांनंतर म्हणजे १९५६ साली ‘श्यामची आई’ला राष्ट्रीय पुरस्कार सुवर्ण कमळ मिळालं होतं, त्यानंतर तोच पुरस्कार ‘श्वास’ला मिळाला. योगायोग म्हणजे दोन्ही चित्रपट एका नात्यावरचे होते. एक आई आणि मुलाचा चित्रपट आणि दुसरा आजोबा आणि नातवाचा चित्रपट. ‘श्वास’ पुढे भारताकडनं आॅस्करसाठी गेला आणि एक वेगळीच एनर्जी मराठी सिनेमा करणाऱ्या माणसांमध्ये आली. अशा प्रकारचा सिनेमाही या पातळीपर्यंत चालू शकतो. सातत्याने आपल्याला लावणी, करमणूकप्रधान असे लाटेवर चालणारे सिनेमे करण्याची गरज नाही हे या निमित्ताने समोर आले. एक अतिशय तरल, गोड नात्यावरचा सिनेमा अतिशय उच्च पातळीपर्यंत जाऊ शकतो हे ‘श्वास’ ने दाखवून दिलं.मग त्यानंतर वेगवेगळे प्रयोग सुरु झाले. एक चांगली गोष्ट झाली की, प्रत्येकानं ‘श्वास’ बनववायचा प्रयत्न नाही केला.

प्रश्न : मराठी चित्रपटांची संख्या आज लक्षणीय वाढली असतानाही यशस्वी होणाऱ्या चित्रपटांची संख्या तशी कमीच असते. हे कशामुळे? प्रेक्षकांना रस नाही म्हणून की प्रेक्षकांना काय हवं हे लक्षात आलं नाही म्हणून?

उत्तर : २००२ च्या आसपास २० -२५ चित्रपट बनवणारी इंडस्ट्री आज जवळपास १८० चित्रपट बनवते. आता १८० चित्रपट बनवून सगळं काही सुरळीत चाललंय अशीही परिस्थिती नाही. १८० पैकी फक्त पाच चित्रपट त्यांचे गेलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी होतात. बाकी चित्रपटांचं काय होतं माहीत नाही. याला अनेक कारणं असतात. त्यावर मी सातत्याने विचार करत आलोय. मला असं वाटतं, की आपण बऱ्याच वे‌ळा आपण सिनेमा एक प्राॅडक्ट म्हणून तयार केल्यावर ते चालावं यासाठी जबाबदारीनें काम करतोय का असा प्रश्न पडतो. मला वाटतं आपण नाही करत. त्याची सुरुवात विषयापासून होते. तुम्ही कोणता विषय घेता, तो मार्केटला घेऊन कसा जाता, त्यााची मार्केटला गरज आहे का? याचा विचार हवा. कारण, मराठी सिनेमाला आसपास दोन मोठे स्पर्धक आहेत. एक म्हणजे हिंदी सिनेमा व दुसरं म्हणजे सिरीअल्स. याशिवाय नाटक, मोफत मिळणारं मनोरंजन, तमीळ, मल्याळी, इंग्रजी सिनेमा, वेबसिरीज आहेत. आता इतकं सगळं असताना तुम्हाला मराठी सिनेमा काढायचाय, त्याला थिएटरपर्यंत न्यायचाय आणि पुन्हा लोकांना तो पाहाण्यासाठी थिएटरपर्यंत आणायचंय. तेव्हा तुमच्या सिनेमाचा युएसपी काय आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. या निर्मीतीचा प्रेक्षक कोण आहे हे जर कळणार नसेल तर ती तोट्यातील निर्मिती असणार आहे.

प्रश्न : चांगल्या मराठी सिनेमापुढे कोणती आव्हानं आहेत?

उत्तर : मला असं वाटतं की प्रत्येक जमिनीचं एक सत्व असतं. म्हणजे कोकणातला हापूस कोकणातच पिकणार, तो लातूरमध्ये नाही होणार किंवा नागपूरची संत्री कितीही प्रयत्न केला तर ती कोकणात नाही येणार, ती नागपुरातच होणार. तसंच जे मराठी मातीमध्ये विषय आहेत ते मराठीतच चालणार आहेत. ते तेलुगु भाषेतला रिमेक करून, हिंदीतला, हाॅलीवूडचा रिमेक करुन ती या मातीत रुजण्याची शक्यता शून्य आहे.

subhodh3

मग असं असताना तुमच्या मातीचा कस तुम्ही बघितलाय का, या मातीचे गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत का? ज्या पद्धतीचा प्रेक्षक इतर सिनेमांना, म्हणजे दाक्षिणात्य सिनेमांना लाभला आहे, तो अतिशय अभिमानी आहे आपल्या भाषेच्या बाबतीत. तसं मराठी कलाकृतीच्या बाबतीत होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मराठी माणसांना जितक्या पटकन आणि न शिकवता हिंदी येतं तितकी कोणतीच भाषा येत नाही.त्यामुळं त्याला लहानपणापासून हिंदी खूप जवळची वाटते. इतर भाषांकडे ओढला जाणारा जर माझा प्रेक्षक असेल तर त्याला मराठी चित्रपटासाठी कसा ओढायचा याचाही विचार केला पाहिजे. त्यासाठी सिनेमा कसा असला पाहिजे, काय विषय असला पाहिजे हे बघायला हवे. आणि आणखी एक जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे, ती म्हणजे समाजाला दिशा देण्याची. सिनेमांनी काय मक्ता घेतलाय का समाजाला दिशा देण्याचा? आपल्याकडे ज्ञानेश्वरांपासून अनेक संत होऊन गेले, त्यांनी दिशा दिली, पण समाज सुधारला नाही हे सत्य आहे. मग हा समाज सिनेमांनी काय सुधारणार आहे? त्यामुळे ही एक जी अतिरिक्त जबाबदारी मराठी सिनेमावर आहे ती आधी झटकून टाकायला पाहिजे. सातत्याने पत्रकार विचारतात तुम्हाला काय संदेश द्यायचाय समाजात? मी म्हणतो आम्हाला काही संदेश द्यायचा नाहीय. आनंद देणारा, करमणूक करणारा सिनेमा देणं हे पाप समजलं जातं आपल्याकडे. त्याच्यामुळे असा सिनेमा करत असेल कुणी तर त्याच्याकडे कुत्सित नजरेनं बघितलं जातं.

subhodh2

प्रश्न : पण, मधला काही काळ वगळता मराठीतही चांगले प्रयोग झालेच आहेत. त्या काळात मराठी सिनेमा हा आदराचा विषय होता.

उत्तर : हो ना. आपल्याकडे प्रयोग झालेत. ‘अशीही बनवाबनवी’ चालतो, राजा गोसावी, राजा परांजपे यांनीही वेगळे विषय घेऊन सिनेमे केलेच. पण मला वाटतं, जिथं आपण अडतो तिथं आपले पूर्वज आपल्याला रस्ता दाखवत असतात. प्रभातचे ‘संत तुकाराम’,’माणूस’,’कुंकू’ या सगळ्या चित्रपटांनी त्या काळातला समाज, मराठीपण, मराठी भाषा याबाबत सातत्यानं प्रयोग केले. एक प्रयोगशील इंडस्ट्री म्हणून मराठी सिनेमा त्या काळात खूप अग्रेसर होता. त्यानंतर आम्ही इतके मागे गेलो, की मधल्या २०-२५ वर्षांत काहीच घडलं नाही. ती वर्षं आधी भरून काढावी लागणार आहेत. मी तो प्रयत्न केला. जेव्हा मी ‘कट्यार’, ‘बालगंधर्व’ केला तेव्हा असा विषय माझ्या आजुबाजूला, इतर कोणत्याही भाषांत उपलब्ध नव्हता. त्यामुळे असा जर विषय तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला मराठी चित्रपट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून हे सिनेमे चालले. तुमच्या विषयाची अपरिहार्यता तुमच्या विषयात आहे का, की हा सिनेमा बघणं अपरिहार्य आहे, तेव्हाच तुमचा सिनेमा चालणार आहे, तेव्हाच प्रेक्षक येतील. त्यांना सलमान, आमीर खान बघायचा नाहीय, त्यांना हिंदीसारखा मराठी सिनेमा बघायचा नाहीय. ते हिंदी बघतील. त्यांना मराठी सिनेमा बघायचाय, मराठीपण बघायचंय. माझी ताकद कशात आहे, माझं सत्त्व कशात आहे, माझ्या प्रेक्षकांना काय हवंय, आपण काय देऊ शकतो याचा विचार केला नाही तर आपण प्रेक्षकांना त्यांना आणि इंडस्ट्रीला गरज नसलेले चित्रपट देत बसू.

प्रश्न : पूर्वी मनोरंजनासाठी नाटक आणि चित्रपट होते. नंतर त्यात टेलिव्हीजन आलं. माध्यमं बदलत असताना एक कलाकार म्हणून तुम्ही त्याकडे कशा नजरेनं बघता?

उत्तर : माध्यमं बदलत आहेतच. बदलत राहाणार. आज वेबसिरीज आहेत, उद्या आणखी काही येईल. एकेकाळी आपण व्हीएचएसवर सिनेमे बघायचो. ते एका रात्रीत गायब झालं आणि सीडीज आल्या. आता पेन ड्राईव्ह आले. ते पण गायब होत आहेत. आता आपण सॅटेलाईटवरून थेट डाऊनलोड करून हवं ते बघू शकतो. हे बदलतच राहाणार आहे. एक गोष्ट मात्र कायम राहाणार आहे, ती म्हणजे माणूस आणि त्याचे नातेसंबंध. कितीही टेक्नोलाॅजी आली तरी ते बदलणार नाहीत. नेटफ्लिक्स, हाॅटस्टार ही कादंबरीसारखी माध्यमं आहेत. ती एकत्र कुटुंबानं बसून बघण्याची माध्यमं नाहीत. ती सेन्साॅर नसतात. आपण कादंबरी एकट्यानं वाचताना कोणतीही वाचू, पण सर्वांसमोर वाचायची असल्यास ठरवू की ही नाही वाचायची, ही वाचू या. सामूहिकरित्या आनंद घ्यायचा झाला तर पुन्हा तुम्हाला मूळ गोष्टींकडेच वळावं लागेल. ज्या नाटकांत आहेत, सिनेमांत आहेत, सिरीअल्समध्ये आहेत.

प्रश्न :बायोपिक म्हटलं की सुबोध भावे असं समीकरण बनलं आहे. बालगंधर्व, लोकमान्य आणि आता काशीनाथ घाणेकर ही आपापल्या क्षेत्रातली उत्तुंग माणसं तुम्ही पडद्यावर आणली. या माणसांचं व्यक्तिमत्व एवढं प्रभावी आहे की ते लोकांवर प्रभाव टाकतं. एक कलावंत म्हणून काम करताना या भूमिकांनी तुम्हाला काय दिलं?

उत्तर : या सर्व प्रतिभावान व्यक्तींचा रोल करायला मिळाला याचं समाधान मला मिळालं ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपण कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी ही मंडळी या ना त्या प्रकारे आपल्या समोर येत असतात. त्यातनं ते काही ना काही देत असतात. त्यामुळं बालगंधर्व केल्यानंतर, लोकमान्य केल्यानंतर किंवा घाणेकर केल्यानंतर मला असं वाटतं या सगळ्यांच्या मुळाशी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातल्या बाबतीत खूप मोठं पॅशन आहे, ते मला सातत्यानं खुणावत असतं. काम करायला भाग पाडत असतं. ‘बालगंधर्व’ केल्यानंतर एक लक्षात आलं, की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कलावंतानं केल्या पाहिजेत, नाही केल्या पाहिजेत. त्याही शिकायला मिळाल्या. ‘लोकमान्य’ केल्यानंतर एक पॅशनचा वापर तुम्ही तुमच्या पद्धतीने एका मोठ्या समाजाला एकत्र आणण्यासाठी कसा करू शकता आणि घाणेकर म्हणजे साधारणपणे अतिशय साध्या, समईप्रमाणे असणाऱ्या रंगभूमीवर ते वादळाप्रमाणे एक झंझावात होते. त्यांच्या आधीच्या कल्पना, नियम वगैरे सगळं धुडकावून त्यांनी आपले नियम प्रस्थापित केले. त्यामुळे या तीन व्यक्तीरेखा केल्यानंतर माझ्यातल्या काही गोष्टी नकळत बदलल्या. कारण, तुम्ही सातत्याने त्यांचा विचार करत असता, साकार करत असता त्यामुळे अनेक गोष्टी बदलत असतात. पण या माणसांचं काम इतकं आहे की त्यांच्यातून काम करण्याच्या बाबतीत, विचार करण्याच्या बाबतीत नकळत संस्कार होतात. या तिघांनी माझ्यात गेल्या पाच सात वर्षांत खूप मोठा परिणाम केलाय हे निश्चीत.

प्रश्न : हिंदीतही बायोपिकची लाट आलीय. ते कसे वाटले?

उत्तर : हिंदीत मी ‘मिल्खासिंग’ वगळता दुसरा बायोपिक बघितला नाही. ‘मंटो’ नाही बघितला. आमीर खानचा ‘दंगल’ बघितला. अतिशय चांगले सिनेमे. आपल्याला काय करायचं हे नेमकं ठाऊक असेल तर सिनेमा निश्चितच चांगला होतो. आणि हो, मी ‘संजू’ मात्र नाही बघीतला.

प्रश्न : मराठीतले सध्याचे सर्वात बिझी स्टार म्हणून तुमचं नाव घेतलं जातं. एकाच वेळी डेली सोप आणि शिवाय सिनेमे सुरु आहेत. त्याचा ताण येत नाही का?

उत्तर : आता नाही मला स्ट्रेस येत. मागे मी पाच डेली सोप, सिनेमे आणि नाटकांचे प्रयोग असे एकत्र करायचो. खरं तर तेव्हा यायला हवा होता. तेव्हा आला नाही. आताही नाही येत. तुमचं काम करण्याचं इन्टेन्शन तुमचं काम खूप सोपं करतं. ‘कट्यार’च्या काळात मला दिग्दर्शन करायचं होतं तेव्हा लोकांनी मला खूप सांगितलं की तुला घरी बसावं लागेल, काम करावं लागेल. मी घरी बसून कामच नाही करू शकत. डोकंच चालत नाही. सेटवर असेल तरच डोकं चालतं. आता ती सवयच झाली आहे मेंदूला. त्यामुळे ‘कट्यार’च्या काळात अभिनेता म्हणून मी नऊ सिनेमे केले. त्यामुळं ना माझं नुकसान झालं, ना ‘कट्यार’चं.

subhodh4

प्रश्न :या धबडग्यात नाटक मागे पडलं का?

उत्तर : होय, नाटकं मागे पडली. मी दुरावलो गेलो आहे त्यापासून. पण, त्याचं गिल्ट नाही. असं होत नाही की आपण नाटक करायलाच हवं. याचं एक कारण की मी व्यावसायिक नाटकांत फारसा न रमणारा माणूस आहे. मला ५० प्रयोग झाले की कंटाळा येतो. नवीन करावंसं वाटतं. मला आनंदाची जबाबदारी हवीय. मध्ये मला नाटकात काम करण्याची संधी मिळाली नाही, तर मी बाकायदा दोन बालनाट्ये केली. आमच्या बालनाट्याच्या ग्रुपमधल्यांनी एकत्र येत आम्ही तीच नाटकं केली जी आम्ही शाळेत असताना केली होती. भयंकर मजा आली. त्यामुळं मला वाटत नाही इतक्यात रंगभूमीकडे वळावं. तसं उत्तम चाललंय मला वाटतं रंगभूमीचं. तिथं असल्यानं आणि नसल्यानं फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही.

subhodh6

प्रश्न :आजकाल छोट्या बजेटच्या इंडिपेन्डंट सिनेमाची चलती आहे. तुम्हाला कधी त्यात काम करावं वाटत नाही का?

उत्तर :नाही नाही..इन्डीपेंडंट सिनेमा वगैरे करायचा नाही. मला तो सिनेमा करायचाय ज्यात मी १०० रुपये घातले तर मला १०१ रुपये मिळतील. मी धंदा म्हणून सिनेमाकडे बघतो. मी सिनेमाकडे अजिबात सामाजिक जबाबदारी वगैरे म्हणून बघत नाही. निर्मात्यानं घर विकून, गहाण ठेवून पैसा उभा केलेला असतो. तो पैसा मला परत द्यायचाय. आता सिनेमाकडे सिनेमा म्हणून बघणारी खूप जणं आहेत. या वर्षीचा गुलाबजाम असेल किंवा मुरंबा असेल किंवा व्हेंटिलेटर असेल किंवा फास्टर फेणे, पुष्पक, बापजन्म असेल. ही सगळी मंडळी उत्तम काम करत आहेत. त्यांच्यावर नाटकाचं ओझं नाहीय. मला पण माझ्यासाठी मला तो प्रेक्षक तयार करायचाय जो माझ्या भाषेशी बांधला गेलाय. प्रायोरिटी असली पाहिजे. चित्रपट बघायचा असेल तर पहिला मराठीच बघेन असं झालं पाहिजे. सिनेमाला भाषा नसते म्हणतात पण धंदा आला की भाषा येते.

प्रश्न :सध्या तुमची ‘तुला पाहते रे’ ही मालिका खूप लोकप्रिय झाली आहे. तुमची एकप्रकारची क्रेझ तयार झाली आहे. काय वाटतं ?

उत्तर : ‘तुला पाहते रे’ हिट होईल असं मुळीच वाटलं नव्हतं. असं वाटलं असतं तर मी तेच सिनेमे केले असते जे सुपरहिट वाटले असते. आपण काम करत राहायचं. मला वाटतं ती बरी होईल सिरीअल. आवडेल लोकांना. आता जो हेअर कलर, स्टाईल वरनं जो मॅडनेस चाललाय तो मॅडनेस असेल असं वाटलंच नव्हतं. किंबहुना माझ्या कोणत्याच रोलच्या बाबतीत आजपर्यंत असं झालं नव्हतं. कदाचित प्रेक्षकांना गोष्ट आवडली असेल. अशा प्रकारची गोष्ट टेलिव्हीजनवर मराठीत पहिल्यांदा येत असेल त्यामुळं असेल. कदाचित ही सिरीअल येण्याआधी माझा अभिनयाचा बराच प्रवास झाला आहे. कामाची ती प्रगल्भता आली असेल, लोकांना आवडली असणार. गायत्री, तिचा फ्रेशनेस, अल्लडपणा, त्या वयातला असमंजसपणा आवडत असेल.

प्रश्न : कलावंतांमध्ये स्पर्धा असते तशी मैत्रीही असते. तुमच्या सोबतचे कोणते कलावंत तुमचे जवळचे मित्र आहेत?

उत्तर : माझे समकालिन सगळेच मित्र आहेत. स्वप्नील आहे, जीतू आहे, अंकुश आहे, प्रसाद आहे. या सगळ्यांबरोबर भरपूर काम केलंय. तुम्हाला असुरक्षिततेची भावना असेल तर मग आपण असे अनेक किस्से ऐकतो, त्याने त्याला खाल्ला, त्याने त्याला झाकला. माझी काम करण्याची पद्धत मागच्या काही वर्षांत फार बदलली आहे. कदाचित पं. अभिषेकी बुवा, आमीर खाँ साहेब आयुष्यात आल्यानंतर फारच बदलली आहे. तो पर्यंत माझ्यात एक ‘पणा’ होता. आता हा सीन बघ कसा करतो बघ. आता हे दोघं माझ्या आयुष्यात आल्यानंतर आता माझा प्रयत्न असा असतो की आता मला कुणालाच काही दाखवायचं नाहीय.

सिद्ध करायचं नाही. तो त्या दोघांचा संगीताच्या बाबतीतला समर्पण आहे ती वृत्ती गेल्या काही वर्षांत माझ्यामध्ये यायला लागली आहे. तेव्हाही मला कुणाची भिती, असुरक्षितता वाटत नव्हती, आता तर मी त्याच्याही पलीकडे गेलो आहे. आता तर मी प्रेक्षकांसाठीही काम करत नाही. फक्त माझ्यासाठी काम करतो. ज्या दिवशी मला कंटाळा येईल, त्यादिवशी मी या सगळ्यातूनच बाहेर पडेन. मग मी अभिनयच करणार नाही. मी आत्ता काम करतोय कारण मला त्या माध्यमातनं, अभिनयातनं मला आनंद मिळतोय. कलाकाराला जेव्हा आनंद मिळतो तेव्हाच तो आनंद त्या कलाकृतीतून लोकांपर्यंत पोहोचतो.

प्रश्न : दिग्दर्शनाकडे कसे वळालात?

उत्तर : खरं सांगू का, ‘कट्यार’चं दिग्दर्शन कुणीच करायला तयार नव्हतं. म्हणून मी केलं. मी सात आठ लोकांना विचारलं, तुम्ही करता का, तुम्ही करता का म्हणून पण ते नाही म्हणाले. कुणी रस नाही दाखवला. पण मला करायचं होतं. त्याच्यावरती फिल्म करायची होती. काहीही झालं तरी.

प्रश्न : ‘कट्यार’सारख्या विषयावर चित्रपट करताना रिस्क वाटली नाही का?

उत्तर : ‘कट्यार’ करताना कधीच रिस्क वाटली नाही. ‘बालगंधर्व’च्या वेळेसही लोक म्हणाले, आता कोण बघतंय, गेला तो जमाना. मी म्हणालो मला लोकांसाठी करायचाच नाहीय. मी तर माझ्यासाठीच करतोय. मला वाटतं की यावर काम व्हायला पाहिजे. कुणासाठी काही करू नका. फक्त करत राहा. त्या कलेसाठी म्हणून काम करत राहा. लोकांपर्यंत पोहोचतं. ‘बालगंधर्व’ही पोहोचलाच की. ‘कट्यार’मुळं शास्त्रीय संगीत इतक्या मुलांपर्यंत पोहोचलं की त्यांच्या भावविश्वातच ते संगीत नव्हतं. तरुण प्रेक्षक लाभला. लहान लहान मुलं घेई छंद मकरंद गायला लागली. क्लासेस लावले. माझं काम झालं. हे व्हावं म्हणून मी हा सिनेमा काढला नाही. त्याचं बायप्राॅडक्ट जर सकारात्मक असेल तर का नाही?

प्रश्न : महागुरु सचिन यांना कसं सांभाळलं?

उत्तर : मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलं की, मला तुम्ही सचिन म्हणून नको आहात. मला सचिन पिळगावकर हवेत सेटवर. ते जुन्या स्कूलचे असल्यामुळे त्यांच्यासाठी दिग्दर्शकाचा शब्द शेवटचा शब्द. त्यामुळं मला सेटवर कुणाचाच काही त्रास झाला नाही.शंकरजींचा नाही, सचिनजींचा नाही की कुठल्याच कलाकाराचा नाही. ‘कट्यार’च्या वेळी झालेला ग्रुप अजूनही आहे. श्रेयाचा विषय आला की अडचण होते. मला असं वाटतं की श्रेय आलं की वाटून टाकावं, अपयश असेल तर आपण घ्यावं. ‘कट्यार’चा वाटेकरी म्हणाल तर त्याच्या यशाचे वाटेकरी सगळेच आहेत. मी प्रारंभीच सांगितलं हे फसलं तर माझी जबाबदारी, हे चाललं तर ते सगळ्यांचं श्रेय असेल. गोष्टी सोप्या होतात.

subhodh5

प्रश्न : दिवाळीचं तुमच्यासाठी काय महत्त्व आहे? यंदाची दिवाळी काय खास असणार आहे?

उत्तर : दिवाळी स्पेशलच असते. या वर्षी ८ नोव्हेंबरला घाणेकर रिलीज होतोय. ९ तारखेला माझा वाढदिवस आहे. त्यादिवशी पुण्यात प्रिमीअर आहे. गेल्याच्या गेल्या वर्षी दिवाळी स्पेशल होती कारण ‘कट्यार’चा रिलीज होता. ‘बालगंधर्व’चा मुहूर्तही माझ्या वाढदिवशी दिवाळीतच झाला. त्यामुळे दिवाळी माझ्यासाठी कायम स्पेशल आणि सक्सेसफुल आहे.

COMMENTS