BUY NOW

नाट्यछटा

रश्मी देव

Yogesh Soman

कार्यशाळा नाट्यलेखन – तंत्र

करोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात सुरू झालेली नाट्यलेखन – तंत्र ही योगेश सोमण सरांची ६ रविवार असलेली कार्यशाळा. एकीकडे बाहेर रोज करोनाचे वाढते आकडे, अनिश्चितता, नैराश्य आणि दुसरीकडे दर रविवारी आम्हाला मिळणारे वेगवेगळे लेखन अभ्यास. अख्खा आठवडा दिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी आमच्यातील संवेदना, सर्जनशीलता, कल्पकता यांना जागं करून त्यांचा कस लावण्यात जायचा.

नंतर-नंतर आम्ही लिहिलेलं लिखाण वाचायला केवळ रविवारी नाही तर रोज भेटू लागलो (अर्थात ऑनलाइन) आणि मग ते ६-८ आठवडे वेगवेगळे विषय, त्यावरचे लिखाण करणे किंवा ऐकणे एवढंच एक व्यवधान उरलं.

हे व्यवधान तेव्हा अगदीच गरजेचं होतं कारण, कोणाचं काम थांबलेलं, कोणाच्या घरी कोणी आजारी होतं, कोणाचा जॉब गेलेला होता तर कोणी भविष्याच्या चिंतेत होतं. पण या सगळ्यातही रोज काही तरी लिहायचं आहे आणि सगळ्यांना ऐकवायचं आहे, या बांधिलकीमुळे आमच्या सगळ्यांमधेच आमच्या नकळत एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. हे तेव्हा जाणवलं नाही पण काही काळानंतर मागे वळून बघताना मात्र नक्कीच जाणवलं आणि त्याबद्दल योगेश सोमण सरांचे खूप खूप आभार.

लेखक हा संवेदनशील असतो असं आपण नेहमीच म्हणतो. मग तो कवी असो, वा कथाकार वा ललितलेख लिहिणार किंवा नाटककार. खरं तर रोजच्या जीवनात आपल्याला पण बऱ्याच गोष्टी जाणवत असतात, आपणही संवेदनशील असतो पण आपल्याला त्या कागदावर उतरवता येतातच असं नाही. म्हणजे सुचणे ते कागदावर उतरवणे (आता मोबाईल किंवा लॅपटॉप “टाईप करणे” म्हणूयात) ही प्रक्रिया जमत नाही. जमली तर त्यात सातत्य राहत नाही (लिखाणाचा कंटाळा) आणि सातत्य असले तरी तो खुसखुशीत पणा, वाचण्याऱ्याला थेट भिडले असं लिहिता येत नाही.

इथे तर आम्ही नाट्य-लेखन तंत्र असंच नाव असलेल्या कार्यशाळेत नाव नोंदवलं होतं. म्हणजे आधी सुचायला हवं आणि मग जे सुचतं ते सतत संवाद स्वरूपात मांडता यायला हवं. सुरवातीला कठीण जायचं पण मग वेगवेगळ्या अभ्यासातून (exercise) त्यातलं तंत्र कळत गेलं आणि आम्ही सगळेच मनात आलेल्या कल्पना फुलवू लागलो. पात्र नियोजन करू लागलो. कागदावर उतरवू लागलो.

संवाद केंद्रस्थानी असलेले वेगवेगळे लेखन प्रकार आम्ही लिहिले. जसे की नाट्यछटा, एकपात्री, श्रुतिका, नाटिका, कथेचे नाट्य रूपांतर, एखाद्या शोधावर किंवा संशोधनावर किंवा कायद्यावर त्याचा अभ्यास करून एकांकिका किंवा नाटक लिहिणे इ. यातही कधी भाषेची मर्यादा असे म्हणजे कधी संस्कृत प्रचुर मराठी अपेक्षित असे तर कधी ऐतिहासिक बाज. कधी वाक्याला शब्द मर्यादा असे तर कधी अमर्याद शब्द वापरून एकच वाक्य बनवाचे असे. कधी एका वाक्यावरून अख्ख्या संवाद लिहायचा असे तर कधी १६ वाक्यात अख्खी कथावस्तू मांडायची असे. हे आणि असे अनेक विचार करायला लावणारे, झोप उडवणारे लेखन अभ्यास आमच्याकडून योगेश सोमण सरांनी करून घेतले. त्यातलेच काही निवडक लिखाण, या सदरात देत आहोत. तुम्हाला आमचे लिखाण कसे वाटले हे नक्की कळवा. तसेच जर तुम्हाला यातील काही आवडले आणि सादर करावयाचे असेल तरी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. प्रत्येक लिखाणाच्या शेवटी लेखकाचा मेल-आयडी देण्यात आला आहे त्यावर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

आभार.


क्र. १ - वेळ

अजून जोरात… हा…थोडं अजून जोरात… थोडं अजून… ए अगं सोड ना मला जाऊ देत ना…सोड… सोड…(पिच) कमाल आहे हा हिची ही मला मदत करायचं सोडून हसतीये… बघ पडला वारा तुझ्यामुळे आता परत कधी येईल वारा काय माहीत अशी बघू नकोस माझ्याकडे काय मिळतं गं तुला असं वागून. या मार्च महिन्यात जवळ जवळ 2 वर्ष होतील मला इथे असं अडकून दुपारचे 2 वाजले असतील त्या दिवशी. सगळे झोपले होते.. ती नेहमी प्रमाणे बागेत कैऱ्या चोरायला आली होती. पण त्या दिवशी नेमकं पळून जाताना तिचा परकोर तुझ्यात अडकला आणि तू मला ठेऊन घेतलंस. किती प्रयत्न केला तिनी सोडवून घेण्याचा. पण तू काही मला सोडलं नाहीस. शेवटी ती रडवेली झाली कोणी तरी येईल या भीतीने मला तसच सोडून निघून गेली. जाताना पण सारखी मागे बघत होती ती…शेवटी मी तिच्या लाडक्या परकराची फ्रिल होते ना

आता ही म्हणतीये हिनी मला धरलं नव्हतं.. पण जर त्या दिवशी हिनी मला सोडलं असतं तर तिनी घरी जाऊन मला शिवलं असतं आणि मी परत तिच्या बरोबर बागडले असते हुंदडले असते टिपरी पाणी, लिंगोरचा खेळले असते पंचमीला उंच उंच झोके घेतले असते पहिल्या पावसात चिंब भिजलो असतो..मी आणि ती काय मिळालं गं तुला आमची ताटातूट करून?

काय? ही म्हणतीये हिनी मुद्दाम नाही केलं म्हणे काय तर हिचा तो गुणधर्म आहे. हं जाऊदेत या गोष्टीवर अनेकदा आमचे वाद झालेत आणि नेहमी हीच जिंकलिये पण खरंच आज किती मोठं वादळ उठलं होतं मला वाटलं आज तरी ही मला सोडेल पण आता जाऊन तरी काय करणार? बरोबर आहे तुझं गेल्या तीन वर्षात वीत भरावरून पेर भरावर आलीये मी. किती मळून गेलीये, माझा तो लाल चुटुक रंगच निघून गेलाय माझी मलाच ओळख पटत नाहीये.

हो ना गं वाऱ्यानी भलत्याच अंगणात नेऊन टाकलं तर तशीच पडून राहीन…नाही तर अंगण झाडलं की केराच्या टोपलीत पडेन तसं इथे तुझ्या टोकावर पण काही खूप वाईट नाहीये.. छान काटेरी सिंहासनावर विराजमान असते मी आणि आता आपली गट्टी पण जमलीये ना? त्यामुळे सोसाट्याचा वारा आला तरी आजकाल मीच रेटा कमी लावते.

मला हिचं हेच आवडत नाही. माझ्यात गुंतलीये हे ही कधी मान्यच करत नाही… मला म्हणते आजूबाजूला बघ किती तरी तुझ्या सारख्याच चिंध्या आहेत… परवाच्या वादळात ती सगळ्यात जुनी 4 वर्षांची चिंधी उडून गेली..मला वाटतं अडकली तेव्हा हिरवी गार जरी काठाची असेल…मला इतकं वाईट वाटलं तर ही म्हणते कशी तिची वेळ आली होती

ए अगं वारा वाढायला लागलाय अगं थांबव ना मला… धरून ठेव ना… ही काहीच करत नाहीये..नुसतीच बघतीये माझ्या कडे.. मला नाही सहन होते… सुटत चाललीये मी…म्हणजे आज माझी पण वेळ s s s आ s s s

  • लेखिका, रश्मी देव – पुणे
  • For writer’s permission, please contact: rushdeo@gmail.com

क्र. २ - रेडिओ

काय हा सकाळी उठल्यापासून रेडिओचा आवाज ! नुसता ठणठणाट. अहो, आमचे शेजारी, जरा स्वत:लाच ऐकू येईल इतक्याच आवाजात लावा तो रेडिओ. काय म्हणालात ? आई वडिलांना सकाळी गाणी ऐकायला लागतात ?

अहो, मग ऐका ! नाही कुठे म्हटलंय आम्ही. पण ती गाणी ‍अख्ख्या वाड्याला ऐकू जातात. काय ? बाकीच्यांना आवडतात. तुम्हीच फक्त असे अरसिक आहात असं म्हणताय ?

अहो, तुम्ही काय घरोघरी जाऊन विचारपूस केलीत का, की कुणाकुणाला आवडतं, कुणाकुणाला नाही ते ? उगाच आपलं काहीतरी सांगायचं. आणि काय हो, आम्ही अरसिक हा जावईशोध तुम्ही कुठून लावलात ? तुम्हाला माहित्ये तरी का आम्ही कोणत्या प्रकारची, किती वेगळ्या प्रकारची गाणी दिवसभरात ऐकतो ते ?काय ? आम्ही स्वत: बरोबर इतरांचंही फुकटात मनोरंजन करतो ? तुम्ही फक्त स्वत: चा विचार करता ?

अहो, तुमच्या जीभेला काही हाड ? अहो आम्ही दुस-यांना त्रास होऊ नये याची काळजी घेतो. तुमच्यासारखं नाही. आम्ही इतरांना त्रास देत नाही. आणि हो तुम्हाला जे वाटतंय ना की लोकांना हे आवडतंय ते तसं काही नाहीये. बाकीचे लोक तुमच्या भांडखोर स्वभावाला घाबरून तुमच्याशी वाद घालत नाहीत. बोलत नाहीत. मग तुम्ही तरी कशाला बोलताय ? तुमच्या खिडक्या दरवाजे लावून घ्या त्रास होत असेल तर ? वा रे वा ! आमच्या घराची दारं लावायची की बंद करायची हे सांगणारे तुम्ही कोण ? तुम्ही आधी तुमचा ठणठणाट बंद करा किंवा कमी करा. आणि ते ही जमत नसेल तर आम्हाला जे सांगताय तेच तुम्ही करा.

काय म्हणून काय विचारताय ?

अहो, तुमच्याच घराची दारं-खिडक्या बंद करा आणि मग दिवस-रात्र तो ठणठणाट ऐकत बसलात तरी आमचं काहीही म्हणणं नाही.

  • लेखिका – केदार जोशी पनवेल
  • For writer’s permission, please contact: kj.kedar@gmail.com

क्र ३ - मी बाहेर जाणार

नाही, नाही, नाही, मी तुमचे कोणाचे काहीही ऐकणार नाही. मी बाहेर जाणार म्हणजे जाणारच ! आपले दुकान उघडणार म्हणजे उघडणारच. चौदा दिवस मला तुरुंगात राहिल्यासारख वाटतंय. आता हा घरातला तुरुंग फोडून बाहेर पडणार आणि मोकळा श्वास घेणार. अग, माहिती आहे, माहिती आहे मला की मला हातावर होम क्वारन्टाइन्चा शिक्का मारलाय, त्यामुळे मला उंबरा ओलांडता येत नाहीये. कितीवेळा तेच तेच सांगशील ? कान किटलेत तुझी बडबड ऐकून पण आज शेवटचा दिवस आहे. मी घराबाहेर पडणार म्हणजे पडणार. आणि काहीही होत नाही मला ठणठणीत आहे मी अगदी ! आणि मास्क लावला, सॅनीटायझरने हात धुतले तर काय होणार आहे मला ? गि-हाइकांचे इतके फोन येताहेत, त्यांना माल नाही दिला तर ती दुसरीकडे जातील आणि आपण कायमचे त्याना मुकू . कळतंय का तुला ? आता तुझं काय रे ? कोणाच्या लक्षात हा शिक्का आला तर ? अरे वेड्या गेल्या तेरा दिवसात तो निघून गेलाय. बघ बघ…. दिसतोय का ते ? पोलीस पकडणारच नाहीत मला. म्हणजे तूसुद्धा आता आईला सामील झालास का ? अरे, दुकान म्हणजे आपली रोजीरोटी आहे रे. दोन महिन्यांपासून ते बंद आहे, कामगारांचे पगार मात्र चालूच आहेत. आता ३१ मे पर्यंत लोकडाउन वाढवलाय. पैसे संपलेत आपल्याकडचे आता. काहीही करून दुकान उघडायलाच हव. धंदा सुरु करायलाच हवा. काय ? केस झाली तर ? किती भित्री आहेस ग तू पिलू ? कोण तुला आता महिषासुरमर्दिनी म्हणेल ? अगं बाळा, गावाबाहेरची दुकानं सुरु झालीत, आपल्यावरच बंदी आहे.

सांगू तसे आपण पोलिसांना. ते नक्की ऐकतील. काय म्हणालास ? तुझ्या मित्राच्या वडिलांवर केस झाली ? का ते ? त्यांनी काय गुन्हा केला ? बापरे ! दहा मिनिटे दुकान उघडले म्हणून ? काय मोगलाई लागली आहे काय ? एकाच गावात काही ठिकाणी दुकाने उघडायला परवानगी आणि काही ठिकाणी बंदी ? हा…..हा…..हा अन्याय आहे. नाही, नाही, नाही मी….मी दुकान उघडणार. काय व्हायचे असेल ते होवो. हे काय ? आता पेपर कशाला दाखवतोस ? ही बातमी वाचू ? काय आहे त्या बातमीत ? सूट दिली, की लोक सोशल डीस्टन्स ना पाळता जत्रेसारखी गर्दी करतात ? बरं मग ? त्याने काय होतंय ? अं…..तेही बरोबरच म्हणा ! एकदम सगळे लोक खरेदीला दुकानात आले, गर्दी करून उभे राहिले तर मलाही ती लागण होऊ शकते. सकाळीच ती वाईट बातमी पाहिली, रत्नाकर मतकरी कोरोनाने गेले. आता ८२ वर्षाच्या माणसाला लागण व्हायला तो कुठे बाहेर गेला असेल ? कदाचित मॉर्निंगवॉकला गेले असतील तिथे त्यांच्या गळ्यात यमाने नकळत फास टाकला असेल. मलाही असेच नकळत काहीही होऊ शकते ! अरे बापरे….. कल्पनेनेसुद्धा अंगावर काटा आला. तुम्ही तिघेही योग्य सांगताय. आज अगोदर जगले पाहिजे. जगलो तर कमावू शकू. जान है तो जहान है ! आणि बायको, तू म्हणतेस तेही खोटे नाही हं. ३१ तारीख यायला आता फक्त १२ दिवस उरलेत. दोन महिने घरी काढले तिथे १२ दिवस काढायला काय हरकत आहे ? १ जूनपासून पुन्हा नव्याने सुरुवात करेन. तोपर्यंत घरातच थांबतो. पण घरात थांबलो तरी भूक लागली आहे हं. घरात दोन दोन अन्नपूर्णा आहेत…. जरा नाश्त्याचं बघा, ऐकले आहे मी तुमचे !

  • लेखक – अभय देवरे सातारा
  • For writer’s permission, please contact: abhaydeore@gmail.com

क्र ४ - माहितेय मी ढ आहे ते (बालनाट्यछटा)

ए ताई तू सारखी सारखी मला ढ ढ म्हणून काय चिडवतेस ग?…तू, आई आणि बाबांनी मिळून मला मठ्ठ ठरवलं आहे ना. मग तू सारखी मला का डिवचतेस? आणि आता मलाही मी ढ असल्याचं मान्य झालं आहे. काय म्हणालीस ताई? थोडी सुधारणा का करत नाहीस? सुधारणा नक्की कशी करायची ते तरी सांग ना. तू बघतेस ना, मी नियमित मनोभावे चार तास पुस्तक घेऊन बसलेली असते. शाळेत आणि ट्युशनला वेळेवर जाते. सारखं सारखं वाचते. पण वाचलेलं, काही म्हणजे काही माझ्या डोक्यातच शिरत नाही, त्याला मी काय करणार? देवांनी ते कायमचच रिकाम ठेवलेलं आहे बहुतेक. तुला एक गम्मत सांगते ताई, KG मध्ये माझा प्रवेश घेताना आई बाबांना घाम फुटला होता. मॅडमनी मला विचारलं,” बाळा तुझं नाव काय?” तर मी त्यांना ‘शाहरुख खान’ असे उत्तर दिले होते. त्यांनी हात दाखायायला सांगितलं तर मी त्यांना पाय दाखवला आणि डोळे कुठेत विचारल्यावर नाकात बोट घातले होते. तेव्हाच मॅडमना माझ्या रिकाम्या डोक्याची कल्पना आली असणार.

ताई हसू नकोस दात काढून, आई बोलावते आहे बघ तुला. ही ताई सारखं मला माझ्या बुद्ध असण्यावर हसत असते. पण मला तिचा राग येत नाही किंवा तिला कडवट किंवा कूजक बोलताही येत नाही. कारण वाईट बोलणं मला जमतच नाही. सगळी माणसं मला समान वाटतात. तरी प्रत्येकाला मिळणाऱ्या प्रगती पुस्तकात, वेगवेगळे मार्ग पडलेले असतात, हे असं कसं होतं हे काही मला कळत नाही. त्या स्वरालीला तर गणितात पैकीच्या पैकी मार्कस मिळतात. तिला सगळं कसं काय येतं हे कोडंच आहे मला. बाबा आले वाटतं ऑफिस मधून, पुस्तक घडलेलं बरं, नाहीतर मिनू तुझी काही खैर नाही. काय म्हणालीस आई, “बाबांचा आवाज ऐकून लगेच पुस्तक उघडून कशी बसलीस?” अगं पण नुसतं पुस्तक डोळ्यासमोर धरल्यावर माझ्या डोक्यात थोडीच काही जाणार आहे. बाबा आज यायच्या आत तुम्हाला मी एक गंमत सांगते. परवा आमचे सर म्हणाले, “वर्गातल्या सगळ्यात हुशार मुलांनी वर्गाच्या उजव्या कोपर्‍यात उभे रहा आणि ढ आणि बुद्धु मुलांनी वर्गाच्या डाव्या कोपर्‍यात उभे राहा”. सगळा वर्ग उजव्या कोपर्‍यात जाऊन उभा राह्यला. मी मात्र एकटीच प्रामाणिकपणे डाव्या कोपर्‍यात जाऊन उभी राहिले. सगळा वर्ग मला बघून खोखो हसायला लागला. मला त्याचे अजिबात वाईट वाटलं नाही. कारण खरी गंमत तर पुढेच झाली, जेव्हा सर म्हणाले, “हुशार माणसं स्वतःला सांभाळतात आणि मठ्ठ मुलांना देव सांभाळतो”.

आता मात्र त्या सगळ्यांचे चेहरे पडले होते आणि मी खुदुखुदू हसत होते. आता बाबा आत येतील आणि पहिला प्रश्न विचारतील, “मिनीचा अभ्यास झाला का?”, आईही लगेच उत्तर देईल, “आपल्या मिनी की नाही चार तास,अगदी मान मोडेपर्यंत अभ्यास केला आहे”. मग बाबा चहा घेता घेता मला केलेल्या अभ्यासावरचे प्रश्न विचारायला लागतील. हे रोजचंच आहे. पण माझं काही बाबा विचारत असलेल्या प्रश्नांकडे लक्ष जात नाही. मी बाबांचे बारकाईने निरीक्षण करत बसते. बाबा कसे बोलताहेत, त्यांच्या भुवया कशा हालत आहेत, त्यांचे डोळे कसे दिसताहेत, त्याच्याकडेच लक्ष असते माझे. अहो मग काय, एक जोरात धपाटा मिळतो. पण त्याही परिस्थितीत माझ्या डोळ्यात पाणी येत नाही किंवा मला राग येत नाही. मी फिदीफिदी हसतच बसते. शेवटी बाबाच कंटाळून, पुस्तक गुंडाळून, टीव्ही बघायला निघून जातात. काय करणार ते तरी, नाईलाज आहे ना. तुमच्याशी गप्पा का मारत बसले. आत्ता बाबा येतील आणि नित्यनियमाप्रमाणे मला धपाटा मारतील. थोड्याच वेळात तुम्हाला त्याचा आवाज पण ऐकू येईल. काय म्हणालात? मी निर्लज्ज आहे! असुदे हो, असुदे जी काही आहे, ती माझी मला मी प्रिय आहे, येते हं.

  • लेखक – वीणा लोकूर
  • For writer’s permission, please contact: veena.lokur@yahoo.com

क्र ५ - घड्याळाचे काटे

हे राघुदादा… माझे शेजारी…वय वर्षे सत्तर…हे एक मस्त कॅरॅक्टर आहे…!…कुठलीच गोष्ट सरळ स्वीकारायची नाही…त्यात कायम काहीतरी खोच काढत राहायचे, हे त्यांच्या आवडीचं काम…मात्र आमचे छान जमते…!! रघुदादा…घड्याळाच्या या छोट्याशा तबकडीवरच्या या तीन काट्यांची मांडणी, किती वेगळे संकेत देते…बघता का…!!…आता तूम्ही म्हणाल…एवढीशी ती तबकडी…त्यात काय संकेत वगेरे…!?…ते तुमचं नेहेमीचंच…!..आता माझंही नेहेमीचंच छोटं व्याख्यान…ऐकाच, याला काटे म्हणतात…काटे…घड्याळाचे काटे…गुलाबाचे नाही…टोचणार नाहीत… !…

पहिला सेकंद काटा – दुसरा मिनिट काटा – तिसरा तास काटा. हो..तुमचं बरोबर बरोबर….यात नवीन ते कांय….? असंच म्हणताय तूम्ही…पण ऐकाच जरा.. यातला सेकंद काटा आपल्या बालपणाचे प्रतीक आहे… बघा, कसा सतत लहान मुलासारखा, न थकता गरगर फिरत असतो. यातला मिनिट काटा युवा पिढीचा प्रतिनिधी. याचे एक मिनिटही वाया जात नाही. आणि तास काटा वरिष्ठ नागरिकांचा म्हणजे तुमचा प्रतिनिधी! राघुदादा बघा बघा…आता चेहेरा कसा खुललाय तुमचा!

आता समजा की, आपण या घड्याळाचे तास काटा आणि मिनिट काटा काढूनच टाकले आणि फक्त सेकंद काटा ठेवला तर काय होईल…!?…नुसते ऐकत बसू नका…विचार करां काहीतरी समजा, समजा हं असं म्हणतोय मी की…तास काटा आणि सेकंद काटा काढून टाकला आणि फक्त मिनिट काटा तबकडीवर ठेवला तर काय होईल? अगदी बरोब्बर ओळखलेत आपल्याला अशा घड्याळावरून वेळेचा अंदाजच येणार नाही. वावावावा. तुमचं वय आणि बुद्धी दोन्ही वाढलंय की रघुदादा

पण बालपणीचा सेकंद काटा आणि यौवनातला मिनिट काटा काढून तबकडीवर फक्त वरिष्ठ नागरिकांचा तास काटा ठेवला…तर मग काय होईल…??…क्या बात है भिडू…एकदम सही बोला भाय, तू….!..फक्त तास काटा ठेवला तर वेळेच भान सुटणार नाही…!!..तास काटा हळूहळू चालत सात वर आला तर सात वाजलेत हे नक्कीच समजेल…सात आणि आठच्या मधे दिसला तर साडे सात वाजले..!..हेच नेमक वरिष्ठ नागरीकांच, कुटुंबजीवनातलं स्थान…काळ आणि वेळेच भान ठेवणे.,.!! हा हा हा हा…आता टोचत नसेल ना … काट्यासारखं माझं बोलणे…??. काय राघुदादा…!!! बोला बोला ….

क्र ६ - Live in relationship

या ना काकू, आज सकाळीच आलात! काय दही हवं आहे का?हो आहे ना. बसा, काय म्हणालात? नाही, नाही काही प्रॉब्लेम नाही. हो आज रविवार आहे ना, त्यामुळे कुठेही जाण्याची घाई नाहीये. सगळं, ठीक आहे ना ?काकांची तब्येत बरी आहे ना? नाही,म्हणजे चेहऱ्यावर थोडी काळजी दिसते म्हणून विचारते! काय मला काही विचारायचं? हो खुशाल विचारा. मी पाणी आणते. कॉफी करू का, म्हणजे माझ्यासाठी करत होते. या ना. हो बोला ना. या आत या,अहो त्यात काय ?अभि होय? तो झोपलाय जरावेळ. उठेल त्याच्या वेळेला.नाही ,नाही त्याला डिस्टर्ब नाही होणार.तुम्ही बोला .आम्ही ना हो आम्ही असेच राहतो. तो त्याच्या बेडरूममध्ये आणि मी माझ्या. हो घरमालकांना आम्ही सोसायटीत येण्यापूर्वी कल्पना दिली होती. आम्ही लग्न केलेलं नाही, पण आम्ही एकत्र राहणार आहोत. नाही, नाही सोसायटीच्या नियमांप्रमाणे याला काही बंधनं नाहीत .हो, पण आम्ही सोसायटीचे नियम मोडले का? नाही ना? तसं नाही, तुम्ही आत्ता एकदम विचारलं ना म्हणून ! काय तुम्हाला कौतुक वाटतंय. त्यात काय कौतुक वाटण्यासारखं ?काय म्हणालात भांडण? नाही.

आमच्यात भांडण नाही होत. मतभेद चिक्कार आहेत. अनेक विषयांवर आहेत, पण आम्ही एकमेकांच्या मतांचा आदर करतो. उगीचच मत लादत नाही बसत. प्रेम? प्रेम आहे म्हणूनच एकत्र राहतोय ना! काय म्हणालात, हो एकत्र राहतोय तर शरीर संबंध असं म्हणायचंय का तुम्हाला?हो होतात आमच्यामध्ये मधून मधून. आम्हाला काही गैर वाटत नाही त्यामध्ये. पण लग्नाचा वर्ख असलेले, पण कदाचित जबरदस्तीचे असे शरीर संबंध नाहीत आमच्यात. जे आहे ते स्वच्छ. काय, मुलं वगैरे? नाही, नाही अजून तसा काही विचार नाही केला, पण कधी केला तरी लग्न करायलाच हवं का? याबद्दल जोपर्यंत आमचं एकमत होत नाही तोपर्यंत नाही करणार. हो खर्च ना ,आम्ही दोघं मिळवतो आणि खर्च करतो.नाही हो काकू ,अगदी सोपं आहे. घराचं भाडं तो भरतो. मी दुधाचे पैसे देते .कोणतीही वस्तू आम्ही अर्धे अर्धे पैसे देऊन घेतो .बाईचा पगार त्याने दिला तर मी लाइट बिल भरते .आम्ही ठरवून घेतले आहे काय कोणी करायचं ते!काय त्याच्या घरच्यांकडे? त्याच्या घरच्यांकडे त्याने केव्हा भेटायला जावे व भेटवस्तू द्याव्यात की नाही हे त्याचं तो ठरवतो आणि माझ्या बाबतीत मी. नाही हो खूप आनंदात आहोत आम्ही .कपड्यांचे काय? त्याच्या चालण्याचा अन् न चालण्याचा काय प्रश्न? ती माझी इच्छा आहे. मला हवं ते मी घालते. बरं येताय का ? या, कधीही या संकोच करू नका.

  • लेखक – ज्योती आपटे
  • For writer’s permission, please contact: jyotiapte14@yahoo.com

क्र ७ - बोम

चिमु :- ओये भामटे, काय म्हनाव बाप्पा या पोट्टीले ? काय व मले काईतरी समजलं… काय ?… मलेच विचारतं काय म्हुन…हम्म आख्ख्या गावात बोम हाय तुई… थांब तुया बापलेच सांगतो… तू तं लयच शायनी निघाली वं… हे पाय अशे डोये दाखून माया आंगावर यायचं काम नाई सांगून ठेवतो… अव सांगतो सांगतो काले एवढी बोंबलून रायली….. मले एक खरं सांग. त्या सोनाराच्या पोट्ट्याच्या प्रेमात हायना तू…. ओये सांगनं भवाने…..ओये सांगनं भवाने, लाजून तं असं र्हायली का हम्म, दिसाले तं एकदम हीरो हाय… आता हिले कोण सांगन का थो ढं हाय म्हुन. पायजो बारावीत काय दिवे लावते तं…मले का करा लागते ? अव माय करवली कोनाले नेशीन सासरी. अहं पायत कशी लाजून र्हायली पायजो जमिनीत गडशील… पन एक सांगून ठेवतो. थो हाय सोनाराचा पोरगा. बारावीत फेल झाला त त्याले दुकान हाय बसाले बापाचं, पन तू फेल झाली नं तं तुया बापचं सपनं तुटून जाईन…. आ हं मले काई समजवन्याचा प्रयत्न करू नको…. थो तुया संग लग्न करल याची गॅरंटी हाय काय…. एक ध्यानात ठेवजो…. सोनार अन कोनाचे नाई होनार..!!

  • लेखक – डॉ मोनिका ठक्कर
  • For writer’s permission, please contact: monikathakkar27@gmail.com

COMMENTS