BUY NOW

सोनाली: अप्सरा ते हिरकणी

राज जाधव

प्रश्न : सोनाली, तुझ्या एंगेजमेंट बद्दल खूप खूप शुभेच्छा! मिस्टर राईट बद्दल काय सांगशील?

उत्तर : थँक यु! येस, आयुष्यातला खूपच महत्त्वाचा निर्णय होता हा आणि आयुष्यातील महत्वाची व्यक्ती सापडली आहे, याबद्दल खरेच आनंद आहे. कारण मी पारंपरिक मूल्ये (ट्रॅडिशनल व्हॅल्यूज) जपणारी मुलगी आहे. एकंदरीत लहानपणापासूनच माझ्या आईवडिलांमुळे माझ्या घरात मी ते पाहत आले आहे. त्यामुळे घरातील वातावरण पाहता माझा या नात्यावर, या लग्नसंस्थेवर खूप विश्वास आहे. मी माझ्या आयुष्यात एका योग्य व्यक्तीच्या येण्याची वाट पाहत होते आणि जोपर्यंत योग्य वेळ येत नाही, योग्य व्यक्ती येत नाही तोपर्यंत आयुष्यातला इतका मोठा निर्णय होत नाही. आणि माझ्या मिस्टर राईटबद्दल थोडक्यात सांगायला गेले तर तो माझ्यापेक्षा अतिशय वेगळा आहे आणि त्यामुळेच आम्ही एकमेकांकडे आकर्षित झालो असे मी म्हणेन. तो खूप साधा आहे, माझ्यासारखा तोही मध्यमवर्गीय परिवारातून आलेला आहे. तोही मराठी कुटुंबातला आहे. सध्या तरी एवढेच. लग्न झाल्यावर आणखी गोष्टी एक्सप्लोर होतीलच.

प्रश्न : सध्या काय करते आहेस? लॉकडाऊनमधील मिळालेल्या वेळेत काय करते आहेस?

उत्तर : सध्या आनंद होतो आहे की साधारण सहा महिन्यानंतर आता माझे काम सुरू होते आहे. पहिल्यांदाच कामात इतकी मोठी गॅप पडली असेल. एरव्ही ती आपण स्वतःहून घेतलेली असते, पण आपण स्वतः जेव्हा ब्रेक घेतो तेव्हा ती गोष्ट वेगळी असते, कारण तो आपण स्वतः घेतलेला निर्णय असतो आणि आपण त्याच्यासाठी तयार असतो. पण असा, परिस्थितीमुळे निर्माण झालेला, ब्रेक आयुष्यात येतो तेव्हा मात्र गोष्टी वेगळ्या असतात. याची शाश्वती नसते की ते किती काळ अजून टिकणार आहे किंवा अजून किती काळाचा ब्रेक असणार आहे. आपण काहीच सांगू शकत नाही. आपल्याकडे त्याची माहिती आणि शाश्वती नसल्यामुळे खूप विचित्र परिस्थिती होऊन जाते, तसेच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात झाले. पण मला वाटते की या ब्रेकमध्ये, परिस्थितीमधून सतत काहीतरी पॉझिटिव्ह शोधत राहणे, हाच माझ्यासाठी एकमेव उद्देश होता आणि माझा अजूनही तोच प्रयत्न सुरू आहे. कारण आजूबाजूला प्रचंड निराशादायी वातावरण आहे, काही लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, लोकांचे जीव जाताहेत, आपल्या आजूबाजूचे लोक अचानक नाहीसे होत आहेत. किती असुरक्षित आणि अनिश्चित आहे हे सगळं! आणि अशा सगळ्या काळात आपणही खूप निराश होऊ शकतो आणि माणूस म्हणून आपल्या सगळ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. कदाचित म्हणूनच काहीतरी पॉझिटिव्ह शोधत राहाणे हे एकमेव काम आहे जे मी या लॉकडाऊनच्या काळात केले आहे. शिवाय माझी तर वेगळीच परिस्थिती होती, कारण मी दुबईत आले आणि मग लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे मी लॉकडाऊनमध्ये माझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर होते. हे अगदी अनियोजित होते, पण कुठेतरी मला असे वाटते आहे की हे नशिबानेच घडवून आणले असावे. कारण या काळात एकमेकांना समजून घ्यायची, एकमेकांना जाणून घेण्याची संधी आम्हाला मिळाली, तेही अशा एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये. अशा स्थितीमध्ये आपण कसे वागतो, कशा प्रकारे परिस्थितीला सामोरे जातो हे समजून घेता आले, एकमेकांच्या स्ट्रेंग्थस् आणि विकनेसेस तपासता आल्या, कुठे तडजोड करावी लागणार आहे, हे शिकता आले. या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी माझ्या आयुष्यात लॉकडाऊन मध्ये घडल्या.

वर्क फ्रॉम होम जेव्हा सुरु झाले, म्हणजे आयटीमधले लोक, माझा फियॉन्से वगैरे, जेव्हा घरून काम करू लागले तेव्हा मला खूप जाणवत होते की कलाकार मंडळी, हे फिल्म इंडस्ट्रीतले लोक वर्क फ्रॉम होम करूच शकत नाहीत, कारण आमचे सगळे काम टीमवर्कवर अवलंबून असते. वेगवेगळ्या एनर्जी आणि टॅलेंटची शंभर दीडशे माणसे काही काळासाठी एकत्र येतात. त्यांच्या एकत्र येण्यानंतर कधी एखादी फिल्म किंवा एखादी कलाकृती तयार होते. मग मी आपण वर्क फ्रॉम होम कसे करू शकतो, यावर विचार करायला करायला सुरुवात केली. मी एक पॉडकास्ट शो केला स्वतःचा, ‘सोनाली सांगते ऐका’ नावाचा, अकरा एपिसोड्स केले. एक सिझन संपवला. तेव्हा माझ्या लक्षात आले की खऱ्या अर्थाने आपल्या घरी बसून देखील आपण आपल्या क्षेत्रातले काम करू शकतो. कुठेतरी तो एक स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न होता. मग मी दुबईत बसून अनेक शॉर्टफिल्म्समध्ये काम केले, काही व्हिडीओजसुद्धा केले, दुबईतल्याच एका म्युझिक कंपोजरबरोबर एक म्युझिक व्हीडिओ शूट केला, एडिटही केला आणि म्युझिक कंपनीसोबत टाय अप करून रिलीजही केला आता त्याच्या पुढचे दोन भाग येत आहेत. मी सतत काही ना काही करत राहिले, स्वतःला क्रिएटिव्हली एंगेज ठेवण्यासाठी, आत्मनिर्भर होण्यासाठी. मला वाटतं की कुठलीच मंडळी घरी बसून डिप्रेस न होता, स्वतःतले, स्वतःसाठी काहीतरी शोधू शकतात. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी लॉकडाऊनच्या काळात स्वयंपाक करायला शिकले. बकेट लिस्टमध्ये ज्या काही गोष्टी होत्या, ज्या आयुष्यात कधीतरी करायच्या होत्या त्या मी या लॉकडाऊनमध्ये केल्या. वाचन, स्वयंपाक करणे, क्वॉलिटी टाइम घालवणे, फिजिकल आणि मेंटल स्वास्थ्यावर लक्ष देणे, हे सर्व करत राहिल्यामुळे मला वाटतं की मी अनपेक्षित लॉकडाऊनचा उपयोग स्वतःसाठी करून घेतला.

प्रश्न : नटरंगने तुला ‘अप्सरा’ ही पदवी तर बहाल केलीच, पण एक अभिनेत्री म्हणून एक वेगळी ओळखही दिली. नटरंगआधीची सोनाली आणि नटरंगनंतरची सोनाली, यात काही फरक जाणवतो?

उत्तर : जसे मी म्हटले की नटरंग नंतर ते अस्तित्व टिकवून ठेवण्याची किंवा त्याचे अजून कंगोरे शोधून काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. नुसतीच उत्तम डान्स करणारी एक सुंदर अभिनेत्री म्हणून मर्यादित न राहता, त्यापलीकडे जाऊन मला माझी स्वतःची इमेज तयार करायची होती. नटरंगची इमेज पुसण्याचा प्रयत्न केला असं मी म्हणणार नाही कारण त्या इमेजसाठी सुद्धा नशीब लागते, मेहनत लागते, कष्ट लागतात, आणि

Sonali pic 1

त्याचा अभिमानच आहे. पण माझी ओळख केवळ तिथपर्यंत मर्यादित न राहू देता त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा लोकांनी आपले काम पाहिले पाहिजे, आपल्या कामाचे कौतुक केले पाहिजे, असे मला वाटते. कारण अनेकदा सुंदर दिसणाऱ्या मुलींच्या सौंदर्यापलीकडे जाऊन त्यांच्या कामापर्यंत लोक पोहोचत नाहीत, असे बऱ्याचदा पाहायला मिळते. नटरंगनंतरचा जो पुढील टप्पा होता तो असा होता की लोकांनी केवळ आपल्या सौंदर्याविषयी, आपल्या नृत्याविषयी न बोलता आपल्या कामाविषयीही बोलावे अशी माझी इच्छा होती. त्यामुळे अभिनेत्री म्हणून आपण अजून काय करू शकतो, कसे शिकू शकतो, आणखी कसे प्रगल्भ होऊ शकतो हे शिकण्याचा प्रवास सुरु झाला. आणि म्हणून मग मी काही असे सिनेमे निवडायला सुरुवात केली जिथे मला फक्त डान्स आणि सौंदर्याच्या निकषावर न घेता एक अभिनेत्री म्हणून संधी मिळेल. त्यातलीच एक फिल्म होती रमा माधव, जिथे मी हिरॉईन म्हणून नाही तर सहाय्यक पात्र म्हणून होते. मी रमा नव्हते, आनंदीबाई होते. जिथे लोकांनीही हे नोटीस केले की मला फक्त हिरॉईन नाही तर अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध करायचे आहे. रमा माधवनंतर हळू हळू असे सिनेमे येत गेले किंवा मी असे सिनेमे शोधत राहिले. अनेक सिनेमांना नाही म्हटलं कारण मला त्या इमेजमध्ये अडकायचं नव्हतं. त्यानंतर मग शटर किंवा क्लासमेटचे उदाहरण घेता येईल. क्लासमेट चित्रपट मी स्वतः घडवून आणण्याचा प्रयत्न केला कारण मला अभिनेत्री म्हणून काहीतरी वेगळे करायचे होते. हा एक पहिला प्रयत्न होता जिथे क्लासमेट्सचे राईट मी घेतले आणि मग पुढचा सगळा प्रवास सुरू झाला. मग मितवा सारखा सिनेमा समोरून चालून आला, ज्याने मला टिपिकल ग्लॅमरस म्हणून प्रेझेंट न करता एक अभिनेत्री म्हणून एक्सप्लोअर केले. पोस्टर गर्लसारखा अत्यंत महत्वाचा सिनेमा मला मिळाला त्याच्याबद्दल मला खूपच कृतज्ञ वाटतं कारण ही फिल्म महत्वाच्या गोष्टीवर भाष्य करते, स्त्री भ्रूणहत्या. शिवाय मातीचं आणि मातेचं महत्त्व या देशात काय आहे हे देखील सांगते आणि त्याचा चेहरा होण्याचं भाग्य मला लाभले. त्यामुळे पोस्टर गर्ल्ससारखी फिल्म मला अत्यंत महत्त्वाची वाटते. एक अभिनेत्री म्हणून मी जो प्रवास करत होते तिथपर्यंत नेण्यासाठी हा खूप मोठा टप्पा होता आणि यापुढे मग काही सिनेमे मी स्वतः घडवून आणण्याचा प्रयत्न केला, त्यातली एक फिल्म होती ती ‘तुला कळणार नाही’, ही सुबोध भावे बरोबर होती, जिथे मी स्वप्नाताईला अप्रोच केला की मला अशा प्रकारची फिल्म करायची आहे. त्यानंतर आलेला ‘हंपी’ हा चित्रपटही एक वेगळा प्रयत्न आहे जो मी प्रकाश कुंटे सोबत स्वतः डिझाइन केला, कारण मला अशा पद्धतीचे काहीतरी वेगळे करायचे होते. मी खरेच नशीबवान होते की या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि ज्या गोष्टी मी घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते त्या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी देखील अनेक लोक पुढे आले. आणि मला असे वाटते आहे हा सर्व प्रयत्न जो होता तो हिरकणी पर्यंत पोहोचण्याचा होता. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हे मधले टप्पे होते जे मी एकेक करून पार करत हिरकणी पर्यंत पोचले. जणू काही मला हिरकणी करायचा होता म्हणून हा सगळा घाट घातला गेला. मी प्रसाद ओकांना अप्रोच झाले मग आम्ही प्रोड्युसर पण शोधले आणि मग तो सगळा प्रवास सुरू झाला आणि जोपर्यंत आपण स्वतःला आरशात वेगळ्या पद्धतीने पाहत नाही तोपर्यंत लोकांचा आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलत नाही. हा एक प्रयत्न मी माझ्या बाबतीत केला आणि मला आनंद आहे की तो टप्प्याटप्प्यावर यशस्वी ठरला. म्हणूनच आज लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा मी फक्त एक सुंदर नृत्यांगना नाही तर एक चांगली अभिनेत्री म्हणून झाला. यासाठी कष्ट तर भरपूर लागतात पण त्याचबरोबर चांगली माणसं जोडली जाणे खूप गरजेचे आहे, आणि हे माझ्या बाबतीत घडले असे मला वाटते.

प्रश्न : मितवा आणि हंपी असतील नाहीतर अगदी मागच्या वर्षीचा हिरकणी किंवा या वर्षीचा धुरळा, या सगळ्यांमध्ये तुझे रोल्स अगदी वेगळे होते. लोकांना ते आवडलेही. हे सगळे नटरंगची इमेज पुसण्यासाठी जाणीवपूर्वक केलेस?

उत्तर : नटरंग नंतर अर्थातच माझे पूर्ण आयुष्यच बदलले. मी त्याच्या आधी अगदीच थोडके सिनेमे केले होते. ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘हाय काय नाय काय’ वगैरे. मी तेव्हा शिकत होते, अजूनही शिकतेच आहे पण तेव्हा खूपच नवखी होते. मला काहीच माहीत नव्हते. कोरी पाटी होऊन खऱ्या अर्थाने मी इंडस्ट्रीत आले होते. कारण माझ्याकडे तसे बॅकग्राऊंड नाहीये. परिवारातला एकही सदस्य, कुटुंबातला एकही माणूस या क्षेत्रात नाहीये, या क्षेत्राशी कुणालाच काही घेणे-देणे नाहीये. माझे आई आणि बाबा दोघेही आर्मीमध्ये असल्यामुळे या क्षेत्राशी माझा दुरान्वयेही संबंध नव्हता, त्यामुळे नटरंगच्या आधी खऱ्या अर्थाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न होता. मी सुरुवात केली तेव्हा मला सगळे म्हणायचे, तू नाव का नाही बदलत? आधीपासून एक सोनाली कुलकर्णी इंडस्ट्रीमध्ये आहे. कसे तू स्वतःचे अस्तित्व निर्माण करशील? त्यामुळे कुठेतरी नटरंगपर्यंत स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची भूक होती, जी अप्सरा या पदवीमुळे, या गाण्यामुळे मला मिळाली. स्वतःची वेगळी ओळख मी निर्माण करू शकले. अर्थातच माझ्या आयुष्यातील, माझ्या करिअरमधला सगळ्यात मोठा टप्पा आहे नटरंग, सगळ्यात मोठा माईलस्टोन, मैलाचा दगड ज्याला आपण म्हणतो. जिथे पोचल्यानंतर एक नवीन सोनाली कुलकर्णी कोण आहे हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात पोहोचले. त्या निमित्ताने अनेक कार्यक्रम केले, मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पासून ते जगभरातील अनेक देशांमध्ये परफॉर्मन्सेस केले.
वॉज लाईफ चेंजिंग टर्निंग पॉईंट ऑफ माय करियर. इंडस्ट्रीत मी जेव्हा आले होते किंवा त्याच्या आधीपासून अगदी लहानपणापासून माझं स्वप्न होते असे काम करण्याचे. असे स्वप्न होते की असे काहीतरी आपल्या आयुष्यात मिळावे आणि ते नटरंगच्या निमित्ताने माझे स्वप्न पूर्ण झाले, ती स्वप्नपूर्ती झाली असे म्हणायला हरकत नाही. आणि नटरंगनंतर मला थोडेफार या क्षेत्राबद्दल कळायला लागले. मी खूप तरुण होते जेव्हा नटरंग रिलीज झाला होता त्यामुळे हळूहळू एक मच्यूरिटी यायला सुरुवात झाली. चुका होत गेल्या, हळूहळू सिनेमे करत करत मी शिकत गेले. शिकण्याचा प्रवास कुठेच थांबला नाही. वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी नेहमी झगडा सुरूच असतो. सुरुवातीला असे वाटत असते की आपल्याला एक ब्रेक मिळावा, मग तो ब्रेक मिळाल्यानंतर वाटते सुपरहिट फिल्म मिळावी, त्यामुळे कलाकार म्हणून जी भूक आहे ती अशी राहिली तर आपण कायम काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत राहतो तसे माझे झाले. कुठे पॅशन कमी नाही झाली, किंबहुना ती वाढतच राहिली. एकंदरीत नटरंगची किंवा अप्सराची इमेज पुसण्याचा मी प्रयत्न नाही केला, कारण ती इतकी लार्जर दॅन लाईफ आहे. ती जी एक रेष आहे नटरंग आणि अप्सराची, त्याच्या बाजूला एक मोठी रेष काढण्याचा मी प्रयत्न केला. तो यशस्वी झाला की नाही ते पूर्णपणे मला माहीत नाही, पण तो प्रयत्न मात्र प्रामाणिक होता.

प्रश्न : जेव्हा सोनाली फिल्ममध्ये बिझी नसते तेव्हा ती काय करते? अर्थात नृत्याची आवड आहेच तुला, त्याशिवाय इतर काय आवडते?

उत्तर : जेव्हा मी चित्रपटाचे शुटींग करत नसते तेव्हा मी कार्यक्रमांमध्ये भाग घेते, लाईव्ह परफॉर्मन्सेस करते. ते माझे पहिले प्रेम असल्याने त्याची आवड अजूनही आहे, ती कमी झालेली नाहीच आहे. त्यामुळे अनेक शोज मध्ये भाग घेते किंवा रिऍलिटी शोज वगैरे करते. जेव्हा कुठलेच शूटिंग नसेल तेव्हा मला ट्रॅव्हलिंग करायचा खूप छंद आहे. नवीन देश, नव्या जागा, नवे लोक एक्सप्लोअर करायला खूप आवडतात. मी सोलो ट्रॅव्हलिंग पण भरपूर करते. वर्षातून एखादी तरी ट्रिप नक्की व्हावी असा प्रयत्न करते. नशिबाने मला असा पार्टनर देखील मिळाला आहे ज्यालाही माझ्याइतकीच ट्रॅव्हलिंगची आवड आहे. ट्रॅव्हलिंगशिवाय वाचते, खूप चित्रपट पाहते, फॅमिली आणि मित्रांसोबत वेळ घालवते. वर्षभर शूटिंग असते, असे नाही होत. मधल्या वेळेत पुढे काय शूट करायचे याची तयारी, मीटिंग्स, चर्चा, ब्रेन स्टॉर्मिंग हेही सगळे होत असते.

प्रश्न : हिरकणीची कल्पना तू प्रसाद ओक यांना ऐकविलीस आणि त्यांना ती आवडली, असे वाचनात आले. त्याबद्दल काय सांगशील?

उत्तर : येस, प्रसाद ओकांना मी अप्रोच केले होते हे खरे आहे. कारण रमा माधवच्या वेळेस आम्ही एकत्र काम केले होते. शिवाय त्यांनी डायरेक्ट केलेला पहिला चित्रपट ‘हाय काय नाय काय’ मध्ये मी काम केले होते, त्यामुळे एक दिग्दर्शक म्हणून, एक कोस्टार म्हणून आणि एक मित्र म्हणून आमची उत्तम ओळख होती. आणि हिरकणी चित्रपटात भूमिका करायची आहे हे जेव्हा माझे ठरले तेव्हा मी त्यांना अप्रोच केले, सांगितले की माझ्याकडे प्रताप गंगावणे यांनी लिहून पाठवलेला सिनॉप्सीस आहे, तुम्ही डायरेक्ट कराल का? आणि त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद समोरून आला, म्हणून ते सगळे घडून आले. सुरुवातीची जी काही गुंतवणूक लागते ती मी स्वतः केली. लेखक, कोअर टीम या सर्वांना साईन केले, रेकी केली. दोन-तीन वर्षे या चित्रपटावर काम सुरू होतं आणि मग फायनली फिल्म फ्लोअर वर गेली. मी प्रसाददादावर विश्वास ठेवला आणि बदल्यात त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांनी देखील माझ्यावरती विश्वास ठेवला की मी हे पात्र करू शकेन. हिरकणी जी तुम्हाला पाहायला मिळते ती पूर्णपणे त्यांच्या मेहनतीमुळे व त्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे बघायला मिळाली, असे मी म्हणेन. मी हिरकणी बनण्यापर्यंतचा जो काही प्रवास होता तोही खूप गमतीशीर होता. दोन अडीच वर्ष गायीचं दूध कसे काढायचे, शेण कसे सारवायचे, बाळाला कसे हाताळायचे हे शिकले. एका शहरी स्त्रीपासून एका गावखेड्यात राहणारी १६७४ मधली हिरकणी कशी असेल हे घडवून आणण्यासाठी माझ्यासह संपूर्ण टीमने खूप कष्ट केले. मेकअप, हेअर, कॉस्च्युम, ऑथेंटिक कपडे, पिन न लावता नेसलेले लुगडे, या चित्रपटासाठी मी टोचलेले नाक, मला टॅन करण्यापासून सगळेच होते. चित्रपटात वापरलेली १६७४ची जी मावळी भाषा होती ती शिकण्यासाठी, आपलीशी करून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. वर्कशॉपचा जो काळ होता एक दीड वर्षाचा तो फार कमाल होता. एकंदर प्रसाददांनी हिरकणीला घडवले म्हणायला हरकत नाही.

प्रश्न : तू दोन हिंदी सिनेमात काम केले आहेस, यापुढेही हिंदीत काम करायला आवडेल का? सध्या वेब सिरीजचा एक ट्रेंड येत आहे, या बदलत्या प्रवाहाबद्दल तुला काय वाटते? वेब सिरीजमध्ये काम करायला आवडेल का?

उत्तर : हिंदीत काम केले आहे, नक्कीच पुढे करायला आवडेल, पण सध्या मी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये, ज्या स्पेस मध्ये काम करते ते मला एक्स्प्लोअर करायला खूप आवडते. समोरून जर एखादे चांगले काम आले तर निश्चितच करेन. चांगला प्रोजेक्ट, चांगला रोल असेल आणि चांगली संधी मिळाली तर नक्कीच हिंदी फिल्म्स आणि वेब सिरीजमध्ये काम करेन. पण माझे लक्ष हे पूर्णपणे मी मराठी चित्रपटांवर केंद्रित केले आहे. मला असे वाटते की ही अगदी योग्य वेळ आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी. कारण ज्या पद्धतीचा कन्टेन्ट इथे तयार होत आहे, जेवढे आणि ज्या पद्धतीचं काम करायला मिळते, जितकी पॅशन आहे इथे, त्यानुसार नक्कीच हा एक सुवर्णकाळ म्हणता येईल मराठी सिनेमाचा. आणि आपल्या सिनेमाला आणखी मोठे कसे करता येईल याकडे जर आपण सगळ्यांनी लक्ष दिले तर मराठी चित्रपटसृष्टी आणखी मोठी होईल आणि मी माझ्यापरीने तेच करायचा प्रयत्न करत आहे.

प्रश्न : शॉर्ट फिल्म ‘फॅमिली’ बद्दल काय सांगशील? आपापल्या घरात राहून, अनेक दिग्गज फिल्मस्टार्ससोबत ती फिल्म बनवणे हा अनुभव कसा होता?

उत्तर : लॉकडाऊनचा काळ जेव्हा सुरू झाला तेव्हा आपण सगळेच आपापल्या घरात अडकलो होतो. हळूहळू वर्क फ्रॉम होमची प्रोसेस सुरू झाली. आयटी आणि इतर सेक्टर्स घरी बसून काम करू शकतात, त्यांना टेक्निकल सपोर्ट मिळू शकतो त्यानंतर ते काम सुरू करू शकतात. पण फिल्म इंडस्ट्री ही घरी बसून काम करू शकत नाही असा आपल्या सगळ्यांचा समज झाल्यामुळे कुठेतरी एक स्थिरता आली होती. मला अजून आठवते आहे की १ एप्रिलला मला श्री. अमिताभ बच्चन यांचा फोन आला आणि अतिशय नम्रपणे ते माझ्याशी पंधरा-वीस मिनिटे बोलले. आपण घरी बसून देखील काम करू शकतो हे सिद्ध करण्यासाठी इंडियन फिल्म इंडस्ट्री म्हणजे हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ, बंगाली, पंजाबी या सर्व इंडस्ट्रीज्मधील जे बॅकस्टेज कलाकार आणि डेली वेज वर्कर्स आहेत त्यांना आर्थिक मदत म्हणून उपक्रम त्यांनी सुरू केला होता आहे. ज्यात आपण एक शॉर्ट फिल्म करणार आहोत ज्याचं सोनी नेटवर्क च्या सर्व चॅनेल्सवर प्रीमियर होईल आणि रिलायन्स सोबत टाय अप करून या सगळ्या लोकांना किमान एक दोन महिन्याची आर्थिक मदत किंवा रेशन पुरवले जाईल, बेसिक गरजा पुरवल्या जातील. यासाठी हा उपक्रम होता आणि त्यात त्यांनी मला सहभागी करून घेण्यासाठी विचारले आणि अर्थातच ही फार मोठी गोष्ट होती. रजनीकांत, मोहनलाल, दलजीत, मामुटी, रणबीर, आलिया, प्रियांका आणि स्वतः अमिताभ बच्चन यात होते. प्रत्येक प्रादेशिक फिल्म इंडस्ट्रीतील मोठी मोठी माणसे यात सहभाग होणार होती आणि मराठीत त्यांनी माझ्या नावाचा विचार केला. खरं तर माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी अचिव्हमेंट होती. आपण जे काम करतो त्या चित्रपट सृष्टीला रिप्रेझेंट करण्याची संधी आपल्याला मिळते आणि ती सुद्धा ज्या व्यक्तीचा आदर्श घेऊन अनेक लोक चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे आहेत त्या व्यक्तीकडून हे येते, तेव्हा मनापासून काहीतरी सेन्स ऑफ अचिव्हमेंट नक्कीच वाटते. आणि मी कृतज्ञ आहे की मला ही संधी मिळाली. अर्थातच माझ्या मराठी चित्रपटसृष्टीची मी ऋणी आहे. त्यांनी मला इथपर्यंत आणले की आज बच्चन सर किंवा अशा माणसांनी दखल घ्यावी आणि त्यांच्या इतक्या स्तुत्य उपक्रमात आपल्याला सहभागी करून घ्यावे, ही गोष्ट मी कधीच विसरू शकणार नाही. आणि शॉर्ट फिल्म करण्याचा अनुभवदेखील भन्नाट होता कारण, खरेच पहिल्यांदाच आपण घरी बसून एखादी फिल्म करू शकतो, जिथे वाटते आहे की जी पात्रे आहेत ती एकाच घरात बसलेली आहेत. हे जे इल्युजन तयार केले गेले होते ते फारच वाखाणण्याजोगे होते. कारण असे काही कधीच केले गेले नव्हते. त्याच्यामागे खूप विचार होता, रिसर्च होता आणि खूप व्यवस्थित सगळे शॉट डिव्हिजन आणि स्टोरी बोर्डिंग करून काय अँगल ने शूट करायचे आहे, कुठे कॅमेरा असेल, तुमच्यावर किती क्लोजअप असेल, तुम्हाला कुठे पाहायचे आहे, कुठे बघून बोलायचं आहे, हे सगळे सविस्तर अभ्यास करून पाठवले गेले होते की खरोखर बघताना आम्हाला सुद्धा एक क्षण असे वाटले की हे तर आपण सगळे एकत्र मिळून शूट केले आहे असे वाटते आहे आणि लोकांना देखील तो फील आलाच. थँक्स टू मिस्टर बच्चन की त्यांनी ही सुरुवात केली, आणि त्यामुळे त्यानंतर खरेतर वर्क फ्रॉम होम हे इंडस्ट्रीत सुरू झाले. अनेक लोकांनी अनेक शॉर्टफिल्म्स, अनेक प्रोजेक्टस, शुटिंग्ज, डबिंग्ज, असे बरेच काही घरून केले सो कुठेतरी ही जी पायोनिअरिंग आहे ती मिस्टर बच्चन यांनी केली आणि मीही याचा कुठेतरी छोटासा हिस्सा आहे, याबद्दल मला खरेच मनापासून खूप भारी वाटते.

प्रश्न : Covid काळात सगळेच चित्रपट डिजिटल माध्यमातून लोकांसमोर आले. त्यात अगदी मोठे चित्रपट पण होते. तुझा शेवटचा थिएटर रिलीज धुरळा, त्याच्या प्रीमियरच्या काही आठवणी? आणि थिएटर रिलीज किती मिस करशील?

उत्तर : मी ओटीटी प्लॅटफॉर्मवर खूप काही करत आहे, बघत आहे, बरेच लोक चित्रपटही पाहत आहेत. पण शेवटी सिनेमाचा जो मोठा पडदा आहे, सिल्वर स्क्रीन आपण ज्याला म्हणतो, त्याची क्रेझ जी आहे ती वेगळीच आहे. म्हणजे मला कायम त्या मोठ्या पडद्याची नायिका व्हायचे होते, ते नेहमीच माझे पहिले प्रेम राहील आणि त्यामुळे मी त्याला प्रचंड मिस करते आहे. तो जो काही चार्म आहे, जो फील आहे तो घरी बसून येऊच शकत नाही. माझा लास्ट रिलीज धुरळा होता आणि त्यावेळेस कुणी विचारदेखील केला नसेल की पुढचे ६ – ७ महिने आपण थिएटरमध्ये जाऊच शकणार नाही, तो सगळा अनुभव घेऊ शकणार नाही. ते मी खूप खूप खूप मिस करते. पण माझा पुढचा चित्रपट जो आहे ‘झिम्मा’ तो परत एका मोठ्या पडद्यावरच रिलीज होईल याची मला पूर्ण आशा आहे आणि मला खात्री आहे माझ्यासारखे जे अनेक सिनेमाप्रेमी आहेत ते देखील या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतील.

प्रश्न : ‘धुरळा’नंतर आगामी सिनेमे कोणते आहेत? प्रेक्षकांसाठी काय वेगळे घेऊन येणार आहेस?

उत्तर : पुढचा येणारा सिनेमा आहे झिम्मा. तो गेल्या वर्षी पूर्णपणे लंडनमध्ये शूट केला होता. सात बायका ट्रीपला जातात आणि त्यांचे आयुष्य कसे बदलते. लवकरच तो रिलीज होईल, सिनेमागृहात.

प्रश्न : परिवारात कोणतीही चित्रपटाची पार्श्वभूमी नसताना, आज इथवरच्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना काय वाटते? समाधानी आहेस की अजून काही मिळवायची इच्छा आहे?

उत्तर : परिवारात किंवा लांब-लांबपर्यंत मित्र-मैत्रिणींमध्ये कोणीही या क्षेत्रात नसतानाही आपण इथपर्यंत पोहोचलो याबद्दल मी नक्कीच कृतज्ञ आहे. कारण अनेक लोक अशी स्वप्ने पाहतात. स्वप्न पाहणारे लोक खूप असतात पण प्रत्येकाची स्वप्ने पूर्ण होतात असे नाही. माझे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल मी अनेक लोकांची ऋणी आहेच, ज्यांनी टप्प्याटप्प्यावर माझ्यावर विश्वास दाखवला, ज्यांच्याकडून मी शिकत गेले, कळत नकळत खूप काही, अशा अनेक जणांची. त्या सगळ्यांबद्दल खरच मला कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. निश्चितच जे काही मी अचिव्ह केले आहे, स्वतःच्या बळावर स्वतःच्या व्हॅल्यूज कॉम्प्रमाईज न करता, त्याबद्दल मी निश्चितच समाधानी आहे. पण मात्र अजून पुढेही खूप काही करत राहायचे आहे त्याबद्दल देखील तितकीच एक्साइटेड आणि होपफुल आहे.

प्रश्न : एवढे विविधरंगी रोल्स केल्यानंतर एक अभिनेत्री म्हणून अशी एखादी भूमिका किंवा ठराविक पात्र आहे का, जे तुला पडद्यावर उतरवायला आवडेल?

उत्तर : अनेक रोल्स मी केले आणि प्रत्येक वेळेला हाच प्रयत्न होता की पूर्वीच्या भूमिकेपेक्षा आत्ताची आणि पुढची भूमिका ही कायम वेगळी असावी, आणि आपले काम हे कायम इम्प्रूव्ह होत रहावे, त्यामुळे तो प्रयत्न पुढेही चालू राहणार आहे. पण असे अनेक रोल्स आहेत जे मला पडद्यावर साकारायला आवडतील. अशा खूप इन्स्पायरिंग स्त्रिया आहेत ज्या आपल्या इतिहासात, आपल्या देशात, आपल्या मातीत घडून गेलेल्या आहेत किंवा सध्याही आहेत, त्यांच्या गोष्टी मला सांगायला आवडतील. या पूर्वी न केलेल्या वेगवेगळ्या भूमिका करायला मी अजूनही भुकेली आहे, असं मी म्हणेन.

प्रश्न : सोनाली, दिवाळी कशी साजरी करतेस? तुझ्या दिवाळीच्या काय आठवणी आहेत?

उत्तर : दिवाळी अगदी साधीसुधी मराठमोळ्या पद्धतीने आपल्या कुटुंबियांसोबत साजरी करते आणि यावर्षी देखील तशीच करणार आहे. दिवाळीतले तीन-चार दिवस अतिशय महत्वाचे, अतिशय सुंदर असतात. मला सगळी सजावट, रांगोळ्या, दिवे, आकाश कंदील वगैरे हे सगळे करायला आवडते. वन ऑफ माय फेवरीट फेस्टिवल्स! मी अगदी वाट पहात आहे. तुम्हीही दिवाळी सगळे covid सोपस्कार पाळून छान साजरी करा.

चित्रवेध आणि चित्रवेधच्या सर्व टीमला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

COMMENTS