एक अलबेला

albela-3

भगवान दादांच्या जीवनावरील चित्रपट असावा असे एक पोस्टरवजा चित्र मी फेसबुकवर पाहिले आणि लगेच क्लिक केले. किमया मोशन

पिक्चर एंटरटेनमेंट निर्मित आगामी चित्रपट अशी माहिती त्यात मिळाली. निर्माता म्हणून डॉ. मोनिश बाबरे यांचे नाव वाचले. डॉक्टरांच्या पेजवर जाऊन मी पुढच्याच क्षणी हार्दिक शुभेच्छांची पोस्ट केली आणि आपल्या कामाला लागलो. साधारण तीन ते चार तासांतच डॉ. मोनिशचा रिप्लाय आला,‘धन्यवाद. तुम्हाला भेटायला आवडेल.’ वेळ ठरली. दोन दिवसांतच दुपारी ३ वाजता परळ येथील त्यांच्या क्लिनीकवर पोहोचलो. इकडच्या तिकडच्या गप्पांतच मोनिशने विचारले, ‘शेखर, तुम्हाला हा चित्रपट दिग्दर्शित करायला आवडेल?’. ‘काय?’ अनपेक्षित प्रश्नाला माझा पुन्हा प्रश्न.

हो.’ आम्ही फेसबुकवरच तुमच्या आधीच्या चित्रपटांविषयी वाचलंय. शिवाय तुम्ही ‘वास्तव’ चित्रपटाला सहायक दिग्दर्शक होता हे ही एका ओळखीच्या कॅमेरामनने आम्हाला सांगितलंय.’ साधारण वर्षभर आधीच रचना संसद कॉलेजच्या फिल्म इन्स्टिट्यूटचा हेड म्हणून कार्यभार घेतल्यानंतर कॉलेज मॅगझिनसाठी भारतीय चित्रपट इतिहासावर संशोधनपर लेख लिहीताना मला भगवान दादांविषयी थोडीशी माहिती मिळालेली होतीच. तेव्हा, क्षणाचाही विलंब न लावता मी त्यांना चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी ‘होय’ म्हटले. फक्त स्क्रिप्ट रिसर्चसाठी काही महिने लागतील या अटीसोबत. मोनिशने त्यांच्याकडे जमवलेले भगवान दादांवरील बरेच साहित्य माझ्या हाती सुपूर्द केले. आणि ‘एक अलबेला’ ची मुहूर्तमेढ आम्ही रोवली. चित्रपटाच्या पटकथेसाठी घटनांची आवश्यकता असते. त्या अतिरंजितही करता येतात, जर ती काल्पनिक कथा असेल. इथे मात्र मी एका सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शकाच्या कारकीर्दीवर पहिल्यांदाच बनणाऱ्या चित्रपटाची पटकथा तयार करत होतो. ज्याच्यात कोणतीही रंजक घटना ही प्रतारणा वाटत होती. शिवाय चित्रपट पूर्ण झाल्यावर भगवान दादांच्या नातेवाईक किंवा जवळच्या माणसांकडून येऊ शकणारे आक्षेप वगैरे होतेच. एकंदरीत मिळालेल्या माहितीनुसार बारकावे शोधावे तर त्या काळातील एकही व्यक्ती आता हयात नव्हती.

भारतीय चित्रपटांतील अतिप्रसिद्ध व्यक्ती सोडता बाकी कोणाच्या कारकिर्दीविषयी कुठेही, काहीही संशोधनपर माहिती मिळत नसते, नव्हे ती कुणीच लिहीतही नाही. याला अपवाद राज कपूर,दिलीपकुमार, मधुबाला वगैरे. भगवान दादांच्या यशवंत चित्रपटांना आज ७० वर्षे उलटून गेल्यामुळे तेव्हाचे संदर्भ आणि तंत्रज्ञान शोधणे ही पहिलीच अवघड पायरी मला पार करायची होती आणि अचानक भगवान दादांनी १९६५ च्या आसपास स्वत:च दिलेल्या परखड मुलाखतींची मालिकाच हाती लागली. प्रसिद्ध सिने अभ्यासक इसाक मुजावर यांची निर्माता मोनिशनी ओळख करून दिली. मुजावर यांनी भगवान दादांवर लिहीलेल्या एका छोट्याशा पुस्तकाचीही मदत झाली आणि माझ्या पटकथेने पहिला ड्राफ्ट पूर्ण केला. त्याचे वाचनही झाले. पण काहीतरी कमी वाटतंय का या प्रश्नाने मी माझा मित्र, चित्रपट लेखक, दिग्दर्शक अमोल शेटगे यालाही लिखाणासाठी पाचारण केलं. मग अमोल आणि मी लिहीत, खोडून काढत, वैचारिक हमरीतुमरीवर येत साधारण चार महिन्यांत याची पटकथा पूर्ण केली. या चार महिन्यांत १९४० ते ५० च्या दशकांतील चित्रपट सृष्टीतील व्यक्तींचे दुर्मिळ फोटोज, कॅमेरा, एडिटींग मशीन, साऊंड रेकॉर्डिंग युनिट, सेट्स, उपकरणे, वेशभूषा, रंगभूषा या सगळ्या गोष्टींचे संदर्भ मी हळूहळू जमा करीत होतोच. यातील काही काही उपकरणांचे संदर्भ हाती लागायला जवळपास तीन ते चार महिनेही गेले. उदाहरणार्थ १९५१ सालच्या भारतीय बोलपटांत वापरलेला मायक्रोफोन. भगवान दादांचे त्यावेळचे ऑफीस कसे असेल किंवा गीता बालींचे राहते घर कसे असेल याचा आराखडा मी त्यांच्या वैयक्तिक आवडीनुसार आणि तत्कालिन इंटरियर डिझायनिंगच्या पद्धतीनुसार मांडला. फार काय तर १९५१ साली राज कपूर यांचे ऑफीस कसे असावे याची कल्पनाही राज साहेबांवर हॉलीवूडच्या असलेल्या पगड्याचा विचार करून केली. भगवान दादा पालव हे दादर पूर्वेला राहाणारे तसे एक मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्य.

पालव हे आडनाव फक्त ज्यांचे मूळ गाव मालवण परिसरात येते अशाच कुटुंबाचे असते. शिवाय स्वत: मीही मूळ गाव मालवण असलेला. मग दादांच्या लग्नाच्या दृष्यांतआजूबाजूचे नातेवाईक, त्यांची पत्नी यांचा १९३० च्या दशकात काय पेहराव असेल, घर कसे असेल याचा अंदाज बांधला. पटकथा आणि कलादिग्दर्शनाचा अभ्यास पूर्ण होताच आम्ही मुख्य नटाच्या भूमिकेसाठी मराठी नट शोधू लागलो. भगवान दादा दिसताना तसे एक सामान्य माणूस दिसत असले, तरीही त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे मोठे डोळे, गालांकडे असणारा पसरटपणा, अंगी असलेला थोडासा फुगीरपणा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरकरणी सोपा वाटणारा पण कठीण असा नृत्य पदन्यास. अगदी आखूड शिंगी, बहुगुणी गाय शोधणे म्हणजे काय याचा प्रत्यय आला. बरेच फोटो, बरीच नावे पुढे आली. पण, काही केल्या माझे समाधान होत नव्हते. एक दिवस रोजच्याच कामाप्रमाणे डॉक्टरांच्या ऑफीसमध्ये पोहोचलो आणि कार्यकारी निर्माते कुणाल शेटेंनी मंगेश देसाईचा फोटो इंटरनेटवर दाखवला.

‘बस्स! हा माणूस आपला भगवान दादा’ मी कुणाल आणि डॉ. मोनिशना म्हणालो. पुढील तीन ते चार दिवसांतच मंगेश रचना संसद कॉलेजमधील माझ्या ऑफिसमध्ये आला. संपूर्ण पटकथा, संवाद ऐकल्यावर सावधपणे तो उत्तरला, ‘मस्त सर. यातला कुठला रोल मी करतोय?’ ‘भगवान दादा!!’ मी हसून म्हणालो. ‘सर, भगवान दादांचा डान्स आणि माझा डान्स? मला नाचता येत नाही. म्हणजे सिनेमात लागतं तसं’, खरं तर आता माझ्या पोटात गोळा आला होता. एवढ्या मुश्किलीने भगवान दादांसारखा (म्हणजे तेव्हा फक्त मलाच तसे वाटत होते) अभिनेता मिळतोय आणि तो नाचतच नाही??? चेहऱ्यावर ही भीती न दाखवता मी सुपर कॉन्फिडन्सने त्याला म्हणालो, ‘चित्रपटात सीन्स हे भाव, भावना आणि नाट्य दाखवतात. ते तू चोख पार पाडणारच. उरला प्रश्न नृत्याचा. ती जबाबदारी नृत्य दिग्दर्शकाची.’ मंगेश कुठे तरी सुखावल्यासारखा वाटला. पुढील एक तासात त्याने तीन- चार वेळा तरी ‘तुम्ही माझे भगवानदादांसाठी कास्टिंग करताय सर, पण माझ्या नाचाचे काय ते पाहा’ याची वारंवार जाणीव करून दिली. या चित्रपटासाठी हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रथितयश व गुणी रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांची मी सुरुवातीपासूनच निवड करून ठेवली होती. ‘भट्टेदादा, भगवान दादा सापडले मला… मंगेश देसाई’ मी रात्री त्यांना फोन केला. ‘उदया भेटू शकाल?’ दुसऱ्या दिवशी सायनच्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही तिघे भेटलो आणि पाच मिनीटे मंगेशला सखोल न्याहाळीत भट्टे उद्गारले, ‘होऊ शकेल हा’. फोटो सेशन सुरु झाले. भट्टेंच्या हाताची जादू आम्ही मॉनिटरवर बघू लागलो. चित्रपटाचा छायाचित्रकार उदय देव्हारे यांनी पूर्वीच्या काळातील श्वेतधवल छायाचित्रीकरणाच्या पद्धतीने उत्कृष्ट फोटो काढले आणि सगळ्यांची मनोमन खात्री झाली, मंगेश देसाई… भगवान दादा!

विद्याधर जोशी हे वितरक चंदूलाल मेहतांच्या भूमिकेत तर समोर भगवान दादा म्हणून मंगेश देसाई. व्यावसायिक तणातणीचा आणि भगवान दादांचा आत्मविश्वास दाखवणारा सीन कॅन्ड झाला आणि मंगेशच्या कास्टिंगवरचा माझा विश्वास १०० टक्के पूर्ण झाला. हळू हळू शेड्यूल मागे शेड्यूल चित्रीकरण सुरु झाले. मनातील एक गोष्ट मात्र रोज झोप उडवत होती. चित्रपटात गीता बालींची भूमिका कोण करणार? कारणही तसंच होते. गीता बालींच्या गालांचा गोबरेपणा, देहातील भरदारपणा, चेहऱ्यावरील निष्पाप गोडवा हे सगळं रसायन आज एका ठिकाणी मिळणार कुठे? मराठीत तर सोडाच, पण हिंदी चित्रपट सृष्टीतील ७०, ८० मुलींचे फोटो चाळून झाले. पण काही केल्या गीता बाली सारखी दिसेल अशी काही कोणी सापडेना. मेक अप रुममध्ये विद्याधर भट्टे सातत्याने मला उसकावायचे, ‘बाकी सारं छान चाललंय हो सर. पण तुमची गीता बाली कुठे?’ त्यावर ‘मिळेल.’ असं एकच छापील उत्तर देत मी रोज गीता बालींचा शोध सुरु ठेवला होता. एक दिवस सकाळीच सेटवर पोहोचताच भट्टे गंभीरपणे म्हणाले,‘गीता बालींचं काही होतंय?’ मी न राहवून म्हणालो,‘दादा, तशी मुलगी एकच आहे. विद्या बालन.

पण मला मराठी चित्रपटाला ती मिळणार आहे का? थांबा, शोधू कुणी तरी’ भट्टे शांतपणे माझ्याकडे पाहात होते. त्या दिवशीच्या पुढील चित्रीकरणाची सुरुवात झाली, आणि दुपारी ३ च्या सुमारास भट्टे माझ्यासमोर आपला मोबाईल फोन दाखवत म्हणाले, ‘हे वाचा!’ ‘फिल्मविषयी मला उत्सुकता वाटतेय, तुम्ही दिग्दर्शकांशी भेट घडवून द्या पुढच्या आठवड्यात.. विद्या…’ खारच्या विद्या बालनच्या घरी दुपारी आम्ही पोहोचलो.‘स्वागत सगळ्यांचं’ असं चक्क मराठीत बोलून विद्याने कथा सांगण्यासाठी मला समोर बसवलं. या आधी तीच कथा मी जवळपास २०-२५ वेळा इतर कलाकार, तंत्रज्ञांना सांगितली होती. पण, आज मात्र पहिल्या प्रसंगापासूनच त्यात रंगत आली होती. कारण एकच असावे, अतिशय विश्वासपूर्वक आणि उत्साहाने बसलेला श्रोता माझ्यासमोर होता. साधारण तासभर रंगलेल्या त्या पटकथेनंतर एक ८-१० सेकंदांची शांतता विद्याच्या हॉलमध्ये पसरली. हे ८-१० सेकंद दिग्दर्शकासाठी स्पर्धेच्या निकालाची आठवण करून देणारे असतात. कारण, कथे व्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणाने आर्टीस्ट चित्रपट स्वीकारण्यास नकार देऊ शकतात आणि दिग्दर्शकाने उरी बाळगलेले स्वप्न भंग होत असते. ‘पहिली बात, गीता बाली का रोल करने मिल रहा है, जो मुझे बहुतही अच्छा लग रहा है. और दुसरी बात जिस ढंग से इन्होने कहानी बतायी है, उससे मुझे पुरी फिल्म क्लिअर दिख गयी है. शायदही मैने इस तरह का नॅरेशन इस से पहले सुना है.’ कानावर विश्वास न बसणारी प्रशंसा मी, माझे निर्माते आणि भट्टे दादा ऐकत होतो. ‘मै जरुर यह फिल्म करुंगी.’ विद्याने आपली भूमिका मांडून झाली होती. आपण हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहोत, रिजनल फिल्मच्या दिग्दर्शकाची एवढी तारीफ करण्यापेक्षा आपला गंभीर चेहरा ठेवून स्क्रीप्टमध्ये काही तरी उगाचच ढवळाढवळ करत अभिप्राय द्यायचे, या सगळ्यांपेक्षा लांब राहून अगदी खुल्या मनाने तिने माझी पाठ थोपटली.

अगदी त्यानंतर एका मराठी वृत्त वाहिनीच्या मुलाखतीतही तिने माझी प्रशंसा करण्यात हात आखडता घेतला नाही. स्टोरी नॅरेशननंतर पहिला प्रश्न विद्याने मला केला तो ‘तुमच्याकडे गीता बालींची जेवढी माहिती जमलीय ती तुम्ही मला द्याल?’ या प्रश्नात विद्याला अपेक्षित होते ते गीता बाली ‘माणूस’ म्हणून कशी होती, ती इतरांशी व्यक्तीगत जीवनात कशी वागायची. एखाद्या व्यक्तीचा चरित्रपट करायचा असेल आणि त्यातही ती व्यक्ती अभिनेता, अभिनेत्री असेल तर लेखक- दिग्दर्शक म्हणून अशा व्यक्तीच्या पडद्यावरील व्यक्तीमत्त्वाचा आणि व्यक्तीगत आयुष्यातील राहाणीमान, स्वभावाचा मला जो अभ्यास करावा लागला होता तोच विद्यालाही हवा होता. गीता बाली मुंबईत आल्यापासून चित्रपटसृष्टीत मोठी अभिनेत्री बनेपर्यंतचा सर्व प्रवास मी विद्याला सांगितला. इथे मला एका गोष्टीची फारच मदत झाली.

ती म्हणजे विद्याला आधीच्या फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांविषयी नितांत आदर आहे, नव्हे माहितीही आहे. एक योगायोग असाही झाला की, विद्याचे सासरे म्हणजे सिद्धार्थ रॉयकपूरचे वडील हे मुंबईतील परळ विभागात १९४०-५० च्या सुमारास अनेकांना पाश्चिमात्य नृत्य शिकवत आणि भगवान दादा पाश्चिमात्य नृत्य त्यांच्याकडेच शिकले होते. आमच्या स्टोरी नॅरेशनच्या पहिल्या भेटीत विद्या मला म्हणाली, ‘मी आज सासूबाईंना ही गोष्ट सांगणार आहे की, मी भगवान दादांवरील चित्रपटात काम करणार आहे. माझ्या सासूबाईंनी मला भगवान दादांच्या खूप आठवणी सांगितल्या आहेत. एवढेच काय, तुम्ही माझ्या घरी आलात की पाहालच. ‘अलबेला’ चित्रपटाचे ओरिजिनल पोस्टर माझ्या नवऱ्याने (सिद्धार्थ रॉय कपूर) फ्रेम करून लावले आहे.’ हे एवढे योग जुळून येतील असे मला मात्र नॅरेशनला जाताना अजिबात वाटले नव्हते. हळू हळू गीता बालींचे तेव्हाचे पोशाख, केशरचना यासंदर्भातील आमच्या मिटींग्ज वाढू लागल्या आणि एक गोष्ट जाणवली की विद्या कधीही हिंदी चित्रपट सृष्टीतील तिच्या स्थानावरून आपल्याशी बोलत नव्हती. अगदी ‘एक अलबेला’ हा एक हिंदी चित्रपट असावा अशा पद्धतीने ती बारीक सारीक गोष्टींची काळजी घेत होती.

१६ सप्टेंबर २०१५ ला फिल्मसिटीत सेट उभारुन ‘शोला जो भडके’ या गाण्याला तिच्याबरोबरच्या शुटिंगला सुरुवात झाली. शुटिंगच्या आधी सकाळी गणपती बाप्पाची पूजा करण्याचा प्रघात बहुतेक सगळ्याच प्रॉडक्शनमध्ये असतो. अर्थात आम्हीही त्याला अपवाद नाहीच. विद्या तशी खूप धार्मिक आहे. त्या दिवशी सेटवर मनोभावे गणपतीची पूजा करणाऱ्या विद्याचा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. शूटिंगला सुरुवातझाली. नृत्य दिग्दर्शक स्टॅन्ले डिसोझाने मूळ अलबेलातील गाण्याबरहुकूम तस्साच्या तसा नाच विद्या आणि मंगेश देसाईकडून करवून घेतला. सेटभर पसरलेल्या समुद्र किनाऱ्याच्या वाळूत आमचे भगवान दादा आणि गीता बाली लिलया नाचू लागले होते. सोबत सोळा इतर डान्सर्सना सोबत घेऊन. संगीतकार सी. रामचंद्र यांनी कमालीची वाद्यरचना केलेले हे गाणे सत्तर वर्षांनी पुन्हा एकदा मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये साकारलं गेलं.
पुढल्याच आठवड्यात मंगेश व विद्याच्या सीन्सना सुरुवात झाली. मंगेशने ज्याप्रमाणे भगवान दादांच्या भूमिकेचे तंतोतंत ‘बेअरिंग’ पकडले होते, अगदी तसेच विद्यानेही गीता बालींचे. भगवान दादांची भूमिका ही तशी बऱ्यापैकी अॅग्रेसिव्ह होती, तर उलट गीता बालींची तेवढीच सौम्य. हा विरोधाभास चित्रपटात उत्तम जमून आला. सीन्स सुरु झाल्यानंतर पहिल्याच रिहर्सलमध्ये विद्याने विचारले, ‘तुम्हाला १९५०च्या काळातील अभिनयाची शैली मिळतेय का? की मी अजून थोडी लाऊड अॅक्टिंग करू?’ सर्वसाधारणपणे नाटकातील कलाकार भूमिकेचा पोत, बेअरिंग याचाजास्त विचार करतात असा समज असतो किंवा तसे ते कलाकारांनीच मुलाखतीतून बिंबवलेले असते.
पण, विद्यासारख्या प्रतिभावान चित्रपट कलाकारांनाही ते तितकेच भान असते याचा मला प्रत्यय आला. त्या दिवशी एबीपी माझा न्यूज चॅनलवर ‘मराठी चित्रपटात विद्या बालन’ या मथळ्यांतर्गत बातमी सुरु झाली. मोबाईलवर विद्यासह आम्ही सर्वांनीच ती पाहिली आणि त्वरित आपल्या नवऱ्याला फोन करून विद्याने एबीपीची बातमी व सेटवरील घडामोडी आमच्या समोरच सांगितल्या. हिंदी चित्रपट सृष्टीतील एवढ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे व्यावसायिक उलाढालीने कमी असलेल्या मराठी चित्रपटाविषयी एवढे कौतुकाने बोलणे ऐकून आम्ही सगळेच जण स्तिमीत झालो. बहुधा खऱ्या कलाकाराची हीच लक्षणे असावीत.

आपल्याला मिळणारा पैसा, प्रसिद्धीचा हव्यास याही पलिकडे जाऊन आपण जिथे काम करत आहोत तिथल्या लोकांचे कौतुक, प्रोत्साहन आणि भूमिकेशी प्रामाणिकपणा ठेवणे यानेच ही मंडळी सर्वार्थाने कलाकार म्हणून ओळखली जातात हे मात्र खरे. म्हणता म्हणता विद्याचे मी घेतलेले चार दिवस शुटिंग करून संपले होते. आता फक्त दोन दिवस शुटिंग करून एक गाणे चित्रीत करायचे होते.सेटचे काम पूर्ण झाले होते. दोन दिवस लागून मंगेश, विद्याची रिहर्सलही संपली होती. मोतीया रंगाचा सूट आणि अबोली रंगाची साडी नेसून दोघेही सेटवर आले.पियानोवर बसून सुरुवातीचे चार कॉर्डस् मंगेशने छेडले आणि उठून भगवान दादांच्या शैलीत तो नाचू लागला. भारतातील कोणतीही मिरवणूक ज्या गाण्याशिवाय अपूर्ण असते ते ‘भोली सूरत दिल के खोटे’ हे गाणे आमच्या सेटवर वाजू लागले. विद्याधर भट्टेंनी अगदी हुबेहूब गीता बालींचा मेकअप आणि हेअर स्टाईल केलेली विद्या बालन पदर बांधत गाण्याच्या ठेक्यावर ठुमकू लागली आणि सेटवर एक वेगळीच एनर्जी सगळ्यांच्याच अंगात संचारलेली दिसू लागली. मंगेश, विद्याचा जोडा अगदी मूळ भगवान-गीता बालीसारखा दिसत होता आणि फिल्मसिटीतील इतर सेटस् वरील तंत्रज्ञही आमच्या सेटवर डोकावून जाऊ लागले. भगवान दादांच्या नृत्याची ज्या मंगेशला सुरुवातीला धास्ती वाटत होती तो स्टॅन्लेच्या मार्गदर्शनाखाली अगदी लिलया नाचू लागला होता आणि विद्याची मोहक छबी वर्णन करायला तर माझ्याकडे शब्दच नाहीत. गाण्याचे दुसरे कडवे हे संपूर्णपणे विद्यावर एका शॉट मध्ये चित्रीत करायचे होते.

albela-4

परफेक्शनसाठी झटणाऱ्या स्टॅन्लेने १६ रिटेक्स घेतले आणि शुटिंग ओके केले पण, तरीही अमाप एनर्जी अंगी असलेली विद्या माझ्याकडे येऊन म्हणाली,‘शेखरजी, तुमची हरकत नसेल तर मी आणखी एक टेक करू?’ मी आणि स्टॅन्लेने एकत्र होकार देताच उत्साहाने ती सेटवरील मार्कवर गेली आणि १७ वा टेक दिला तो लाजवाब रंगला. आता चित्रपटात जो दिसतो तो हाच शेवटचा म्हणजे १७ वा टेक आहे. सिनेमा मराठी असला तरीही आपले परफेक्शन पूर्णपणे असले पाहिजे हा विद्याचा गुण नक्कीच हिंदीतील इतर मोठ्या कलाकारांसाठीही आदर्श आहे.

जून २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात ‘एक अलबेला’ महाराष्ट्र आणि युकेमध्ये एकाच वेळी प्रदर्शित झाला. ब्रिटीश सेन्सॉर बोर्डचे सर्टिफिकेट मिळवणारा व युकेमधील सिनेमॅक्स या थिएटर्सच्या चेनमध्ये दोन आठवड्यात ४८ शोज प्रदर्शित करणारा हा पहिलावहिला मराठी चित्रपट ठरला. ब्रिटीश चित्रपट अभ्यासक लायल पिअर्सनने तर भारतीय चित्रपट सृष्टीचा ‘ला ला लँड’ म्हणून पुन्हा ‘एक अलबेला’चा गौरव केला. भारतात हिंदी आणि इंग्रजी सिने पत्रकारांनी, टीव्ही चॅनल्सनी चित्रपटाची तेवढीच प्रशंसा केली जेवढी मराठीतील बहुतेक सर्वच वृत्तपत्रांनी.

ऑगस्ट २०१६ मध्ये मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टीव्हलमध्ये या चित्रपटाची ‘विशेष चित्रपट’ म्हणून निवड झाली. विद्या बालनचा फेस्टीव्हल ब्रॅन्ड अॅम्बेसेडर म्हणून विशेष सत्कारही करण्यात आला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये एडिंबरा फिल्म फेस्टिव्हलमध्ये सांगता सोहळ्याचा चित्रपट, इंटरनॅशन फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया (गोवा) येथे इंडियन पॅनोरामामध्ये, राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट, बंगलोर चित्रपटमहोत्सवात पुन्हा उत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट, तर स्वीडन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सांगता सोहळ्याचा चित्रपट म्हणून एप्रिल २०१७ मध्ये याची निवड झाली. १०३ वर्षाचा प्रदीर्घ इतिहास असणाऱ्या भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक कलाकार, दिग्दर्शक होऊन गेले. लेख, पुस्तके या स्वरुपात त्यांच्यावर काही प्रमाणात वेळोवेळी लिखाणही झाले. पण एखाद्या नट, दिग्दर्शकावर संपूर्ण लांबीचा चित्रपट बनवण्याचे भाग्य संपूर्ण भारतात दिग्दर्शक म्हणून मला ‘एक अलबेला’च्या रुपाने लाभले. भगवान दादांच्या १९४०-५० च्या दशकातील अवर्णनीय कामगिरीला मी, माझे निर्माते, विद्या बालन, मंगेश देसाई, सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्याकडून वाहिलेली ही एक विनम्र श्रद्धांजली होती!

COMMENTS