BUY NOW

संपादकीय-२०२३

मृणाल काशीकर- खडक्कर

संपादकीय

सातत्याने बॉक्स ऑफिसवर १०० करोडचा पल्ला ओलांडणारे भारतीय चित्रपट, चित्रपटांची ऑस्करवारी, आणि नवे जागतिक विक्रम यामुळे चित्रपटप्रेमींचा उत्साह द्विगुणित झाला आहेच. अशाच उत्साहाच्या वातावरणात ‘चित्रवेध’चा २०२३चा डिजिटल दिवाळी अंक घेऊन येताना एक सिनेप्रेमी म्हणून मलाही खूप आनंद होतोय!

एक चित्रपट आपल्यासमोर येताना त्यामागे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते, छायाचित्रकार, गीतलेखक, संगीतकार, पार्श्वगायक, अशा अनेकांची मेहनत असते. ‘चित्रवेध’ च्या माध्यमातून आपण नेहमीच या सर्व भूमिकांतील दिग्गजांना बोलतं करून प्रेक्षकांना त्यांची नव्यानं ओळख करून देत असतो. या वर्षी अंकासाठी काय थीम असेल, कोण सेलिब्रिटी असतील ही उत्सुकता वाचकांना असते, यातच ‘चित्रवेध’चं यश आहे असं मला वाटतं! आजपर्यंत अत्यंत ग्लॅमरस कव्हर पेज असलेल्या चित्रवेध दिवाळी अंकाचं यावर्षीचं कव्हर थोडं वेगळं आहे. ज्या चित्रपटगृहांनी वयाची सत्तरी, शंभरी पार केली आहे अशा चित्रपटगृहांच्या सन्मानार्थ एका दिमाखदार वास्तूचं चित्र यावर्षी कव्हरवर झळकणार आहे. त्याबद्दल वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल. ऑपेरा हाऊस ही सुंदर वास्तू आहेच, पण त्यापलीकडे त्या वास्तूनं पाहिलेला सुवर्णकाळ ह्या निमित्तानं समोर आणता आला. तोही प्रफुल्ल हुडेकर या नावाजलेल्या चित्रकाराकडून.

सिनेक्षेत्राच्या विविध बाजू प्रेक्षकांच्या समोर याव्यात हा प्रामाणिक प्रयत्न मी या वर्षीच्या अंकात केला आहे आणि आशा आहे की वाचकांना तो नक्कीच आवडेल. राष्ट्रीय रजतकमळ पुरस्काराने सन्मानित तरुण फिल्ममेकर शंतनू गणेश रोडे, ओटीटी माध्यमावरील अतिशय लोकप्रिय ठरलेल्या ‘रॉकेट बॉईज’ या वेबसिरीजचे मूळ कथालेखक अभय कोरान्ने यांना त्यांच्या या क्षेत्रातील प्रवासाबद्दल आणि त्यांच्या कलाकृतींबद्दल आम्ही बोलतं केलं आहे.

चित्रपटाच्या कथानकात प्रेमाचे अनेक पैलू समोर येतात. प्रेमाचे त्रिकोण चौकोनामधील अशाच एका आगळ्यावेगळ्या प्रेमाच्या पैलूबद्दल लिहित आहेत प्रसिद्ध लेखिका डॉ. वंदना बोकील- कुलकर्णी. आपल्या आवडत्या चित्रपटांमधील प्रेमाचे हळुवार पैलू त्यांनी त्यांच्या लेखणीतून खूप सुरेख उलगडले आहेत.

कथानकात फक्त मानवी पात्रं नसतात, तर ज्या ठिकाणी कथानक घडतं ती ठिकाणं देखील कथानकातली अविभाज्य पात्रं बनतात. नदी हे असंच एक प्रभावी पात्र! प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार प्रणव पाटील यांनी अशा नद्यांच्या कडेकडेनं चालणाऱ्या कथानकांचा प्रवास आणि त्यांचे पैलू आपल्या लेखातून अत्यंत ओघवत्या शैलीत सचित्र मांडले आहेत.

तुम्हाला हा आगळावेगळा लेख वाचायला नक्कीच आवडेल. याचप्रमाणे चित्रपट तयार होताना शेवटचा टप्पा असतो तो म्हणजे पोस्ट-प्रोडक्शन, ज्याबद्दल सामान्य प्रेक्षकांसाठी विशेष माहितीपर लेख लिहिला आहे प्रसिद्ध पोस्ट-प्रोड्युसर प्रशेन क्यावल यांनी.

दिवाळी अंक म्हंटलं की सगळं खुसखुशीत हवं आणि अशाच एका खुसखुशीत एव्हरग्रीन ‘गोलमाल’ सिनेमाबद्दल लिहिलं आहे अतुल तळाशीकर यांनी. हा लेख वाचून खूप जणांना परत एकदा गोलमाल बघण्याची इच्छा होणार हे नक्की!

डॉ. माधुरी जोशी हे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक सुपरिचित नाव. गाणं आणि त्याचं सादरीकरण यांनी त्यांचं जीवन अतिशय समृद्ध केलं. आवाजाची दैवी देणगी, जितेंद्र अभिषेकीबुवांसारखे उत्तम गुरु, आणि पद्मश्री पं. रोहिणीताई भाटे यांच्यासह गायनसाथ करण्याचा तब्बल पंचवीस वर्षांचा प्रवास! अशा समृद्ध गायिकेने पं. बिंदादीन महाराजांच्या संगीत रचनांवर विस्तृतपणे लिहिलेल्या सुंदर पुस्तकातील काही भाग वाचकांसाठी ‘चित्रवेध’ मधून सादर करत आहोत.

गेली चार-पाच वर्षं मी दिवाळी अंकांसाठी लेखन इ. करताना चित्रवेधच्या टीमचाही भाग होते. चित्रवेधसाठी लिहिताना आणि टीमसोबत संवाद साधताना मला या अंकाचं आणि अंकाशी जोडल्या गेलेल्या लोकांचं वेगळेपण जाणवत होतं. सिनेमाबद्दलचा प्रचंड विचार करणारी, त्यात झोकून काम करणारी, त्याकडे तटस्थ प्रेक्षक म्हणून पाहणारी, सिनेमावर प्रेम करणारी आणि सिनेमाच्या विविध अंगांमध्ये तज्ञ असलेल्या अनेक कलावंतांना मला या टीमचा एक भाग म्हणून जवळून पाहता आलं, जाणून घेता आलं. काहीशा वेगळ्या क्षेत्रातून आलेल्या पण सिनेमा आणि स्टोरी टेलिंग यावर मनापासून प्रेम असलेल्या माझ्यासाठी हा अनुभव खूपच खास होता, नेहमीच असेल. यंदाच्या दिवाळी अंकाचं प्लॅनिंग करताना एकूणच सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी सर्जनशील करण्याची ही प्रक्रिया संपादक म्हणून मी खूप एन्जॉय केली. वाचकांना अंकाच्या माध्यमातून काय नवीन सांगावं याबद्दल बोलताना, भेटीगाठी घेताना, लेखकांशी संवाद साधताना माझी छोटीशी ओंजळ नव्याने भरत गेली… मला चित्रपट रसिक म्हणून अधिक समृद्ध करणारा हा अजून एक अनुभव दिल्याबद्दल चित्रवेधच्या फाउंडर सुचेता फुले यांचे मनःपूर्वक आभार.

चित्रवेध नेहमीच आपल्या डिजिटल दिवाळी अंकातून उत्तमोत्तम गोष्टी तुमच्यासमोर आणत आला आहे… आपणां सर्वांची दिवाळी या अंकासह आनंदमय आणि मनोरंजनपूर्ण साजरी होवो या मनःपूर्वक शुभेच्छा!

COMMENTS