
मुंबईच्या गजबजलेल्या चर्चगेट सारख्या भागात आजही दिमाखानं उभं असलेलं इरॉस! एकेकाळी अतिशय आलिशान, जागतिक पातळीवरही उठून दिसेल असं व्हिक्टोरियन गॉथिक व आर्ट डेको स्टाईलने उभं केलेलं इरॉस थिएटर केवळ मुंबईची शान नाही, तर आज वर्ल्ड हेरीटेज साईट्स मध्ये समाविष्ट झालेलं आहे. पारशी समाजाने दिलेल्या काही उत्तम गोष्टींपैकी एक असं या थिएटरबाबत म्हणता येऊ शकेल. १९३८ साली पारशी व्यावसायिक खंबाटा यांनी खूप विचारपूर्वक आणि आलिशान अनुभव देईल असं हे थिएटर उभं केलं आणि मुंबईच्या शोभास्थळांमध्ये भर पडली. मार्बल, शिसवी जिने, सोडा वॉटर फाउंटन, व आर्कीटेक्चरल सौंदर्याने नटलेलं हे थिएटर केवळ सिंगल स्क्रीन करता प्रसिद्ध नव्हतं. इथे सिनेमा बघायला येणं, मध्यंतरात इथल्या सुंदर फॉयर मध्ये गप्पा मारणं, इथल्या छोट्या मंचावर जागतिक कीर्तीचे संगीत वाद्यवृंद कला सादर करताना ऐकणं हा मुंबईकरांसाठी लक्षणीय अनुभव असे. कालांतराने, इतर अनेक अशाच भव्य दिव्य वास्तूंप्रमाणे इरॉसलादेखील देखरेखीच्या समस्या, पैशांची कमतरता, अशा समस्यांना तोंड द्यावं लागलं. पण, अनेकांनी ही वास्तू जपली जाण्यासाठी अनंत प्रयत्न केले. आर्थिक पाठबळ मिळाल्यानंतर या सुंदर वास्तूचं नूतनीकरण होऊन आयमॅक्स स्क्रीन सुरु झाला.
आमच्या अंकासाठी या आयकॉनिक थिएटरचे सुंदर मिक्समीडिया वापरू न हे चित्र रेखाटलं आहे जागतिक पातळीवरील प्रसिद्ध चित्रकार
प्रफुल्ल हुडेकर यांनी!
इरॉस टॉकीज हे देखणं पेंटिंग मिक्समीडिया वापरून चितारलं आहे पुण्याचे विख्यात चित्रकार प्रफुल्ल हुडेकर यांनी! व्यवसायानं मर्चंट नेव्हीत कार्यरत असलेल्या प्रफुल्ल हुडेकर यांनी शब्दशः जगप्रवास केला आहे. त्यांची पेंटिंगची आवड त्यांनी समुद्र सान्निध्यात जोपासली, भरभराटीस नेली आणि आज जगभरातील आर्ट गॅलरीजमधून, रसिकांकडून त्यांच्या वॉटर कलर पेंटिंग्सना मागणी आहे. प्रफुल्लजी डॅनियल स्मिथ वॉटर कलरचे ब्रँड ॲम्बॅसॅडर आहेत. जगातल्या नामांकित वॉटर कलर आर्टिस्ट्सच्या बरोबरीने हा मान त्यांना त्यांच्या कलाकारीसाठी मिळाला आहे. जगभरातील समुद्रांच्या विविध निळ्या छटा, निसर्गातील नाना रंगछटा आणि वास्तू सौंदर्य आपल्या ब्रशच्या माध्यमातून प्रस्तुत करणाऱ्या प्रफुल्लजी यांनी चित्रवेध अंकासाठी हे मिक्समीडिया पेंटिंग करून अंकाच्या शब्दसौंदर्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे.
COMMENTS