
२०१७ ला सुरू झालेला प्रवास अजुनही तेवढाच नवा वाटतो. दरवर्षी आखणी करताना तेवढाच उत्साह, तेवढीच उत्सुकता आणि तेवढंच प्रेम. २०१७ मध्ये सुरू करताना आणि त्यानंतरही बरेचदा बरेचदा बऱ्या वाईट अनुभवानंतर वैतागल्यावर दोन्ही co-founders नेहमीच एक वाक्य समोर करतात. जे काही करत आहेस ते प्रेमाने कर. आता एवढ्या वर्षांनी सवयीने हा माझा मंत्रच झाला आहे. यावर्षीही आशयघनतेने नटलेला चित्रवेध सादर करताना खूप आनंद होत आहे. हॉलिवूड वर खूप वर्षांपासून काही करायची इच्छा होती. आपल्याकडे हॉलिवूड बद्दल लिहिणारे जे मोजके लेखक आहेत, त्यातील अग्रणी म्हणजे प्रसन्न पेठे. विल्यम वायलर, फ्रॅंक काप्रा, हिचकॉक यांच्या कारकिर्दीची दशकं १९३०-१९६०. या दशकांचा आढावा घेणारा लेख अगदी नेमका आणि एका वाचनात संपूर्ण सुवर्णकाळ डोळ्यांसमोर आणणारा आहे.
आपण म्हणतो की सिनेमामुळे जग बिघडत चाललंय, पण आपण हे विसरतो की समाज प्रबोधनाचं काम ही सिनेमांनी केलं आहे. अगदी दो आँखें बारह हाथ पासून ते अगदी इतक्यातला स्वदेस, बरेच असेही सिनेमे आहेत ज्यांनी लोकांना एक नवी दिशा दाखवली. प्रिया प्रभुदेसाई हे नाव सिनेवाचकांसाठी अगदी ओळखीचे. त्यांचा व्यासंग, त्यांची काहीही बारीकसारीक टिपायची नजर आणि वेगळेपण हे सगळं दिसून येतं त्यांच्या फिल्म्स च्या निवडीतूनच. Philadelphia सारखा अगदी काळाच्या पुढचा चित्रपट असो वा Blackfish ही अगदी आपण मजेनी बघणाऱ्या व्हेल शोज मधल्या ऑर्का व्हेल ची डॉक्युमेंटरी असो; हा लेख अशा अनेक चित्रपटांबद्दल एक अगदी वेगळा, समाजाप्रती जबाबदार असा एक कंगोरा दाखवतो. स्वदेसला वीस वर्षं झाली, बऱ्याच गावांमध्ये वीज आली, की जिथे अगदी विजेचा बल्ब पण स्वदेस सारखाच पहिल्यांदा लागला; पण अजुनही कावेरी अम्मा, शेतकरी, स्टेशनवरचा पळत जाणारा चहावाला मुलगा या सगळ्यांच्या मध्ये स्वतःच स्वतःला गवसणारा मोहन भार्गव इतक्या वर्षांनीही जीवाची कालवाकालव करून जातो. राज जाधव ती खिडकी उघडून आपल्याला परत त्याच जगात नेतात. प्रणव पाटील त्यांना भावलेले पुस्तकावरून निघालेले चित्रपट विस्तृत करून सांगतात. सहसा न ऐकायला मिळणारे चित्रपट महानंदा, पहेली, रिबेका यांचा समावेश असणारा लेख म्हणजे पर्वणीच आहे.
एक चतुरस्त्र लेखक अजितेम जोशी ज्यांच्या लेखणीतून तब्बल चाळीस वर्षे पत्रकारिता, कादंबरी लेखन, मालिका, अगदी कॉर्पोरेट फिल्म्स ही तयार झाल्या, ते जेव्हा चित्रवेध करिता आपल्या ठेवणीतल्या आठवणी सादर करतात, ते ही अभिनय सम्राट यशवंत दत्त यांच्या; याहून जास्त काही मागुच नाही शकत.
बहुभाषिक बहुआयामी लेखिका स्वाती दाढे यांनी बंगाली साहित्यातील लोकप्रिय अशा मितिन माशि रहस्य कथेच्या नायिकेचा मागोवा घेतला आहे. भारतातली पहिली स्त्री गुप्तहेर म्हणून जाणली जाणारी मितिन माशि सिनेमाच्या पडद्यावर येते आणि त्यानंतर येतंच राहते. तिचा हा प्रवास मांडलाय स्वाती दाढे यांनी.
कॅमेऱ्यामागचे कलाकार या सदरात ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ केळकर यांनी बातचीत केली प्रॉडक्शन डिझायनर तर्पण श्रीवास्तव यांच्याशी. पंचायत, अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर यांचं जग तयार करताना आलेले अनुभव आणि मिळालेले पुरस्कार यातून एका वेगळ्या वाटेची ओळख वाचकांशी करून देता आली.
असं म्हणतात की माणसांना रडवणं हे एकवेळ सोप्पं आहे पण हसवणं हे अतिशय अवघड आहे. स्टँड अप कॉमेडी ही आजच्या काळातील अतिशय लोकप्रिय अशी कला. या क्षेत्रात नावाजलेले अमित टंडन यांना बोलतं केलं आहे रश्मी कोटरीवाला या त्यांच्या दुबईतील मैत्रिणीनी. त्याचं सुंदर मराठी शब्दांकन केलंय मृणाल काशीकर खडक्कर यांनी.
ही सगळी सुरूवात झाली ती ऋता ताई बावडेकर यांच्या मार्गदर्शनाने. वर्षानुवर्षं अगदी हिरीरीने काम करणारी आमची टीम बघता घट्ट विणीचे स्वेटर आठवते. कायम नव्या कल्पना, नव्या गोष्टी घेऊन तयार, कधी हास्याचा गदारोळ तर कधी गंभीर सूचना. आमची कार्यकारी संपादिका मृणाल काशीकर खडक्कर तर कायम नव्या कल्पना घेऊन तयार. शाहूराज चित्रवेधची मांडणी इतक्या वर्षांपासून उत्तम करतो.
आशा आहे की हा अंक दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही तुम्हाला आवडेल.
तुम्हा सगळ्यांना चित्रवेध परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

COMMENTS