BUY NOW

नीलकांतीची शिल्पभरारी

दीड वर्षांपूर्वी मराठी सिनेमा आणि नाट्य परिषदेच्या मिटींगमध्ये एका बाईला बाहेरच्या देशात फिल्म फेस्टिवलला आपण कशा पद्धतीने फिल्म्स पाठवल्या पाहिजेत यांवर सविस्तर आणि अभ्यासपूर्वक बोलताना ऐकलं. पुढं ओळख करून घेतली, त्यांनी शांतपणे त्यांचं नाव नीलकांती पाटेकर असं सांगितलं. मधल्या काळात काही खास बोलणं झालं नाही, पण चित्रवेधच्या निमित्ताने त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारता आल्या. दीड वर्षांपूर्वी भेटलेल्या नीलकांती आणि आत्ताच्या नीलकांती यांच्यात बराच फरक जाणवला. अभिनय, फिल्म फेस्टिवलचं काम किंवा नुकतंच न्यूयॉर्क आणि साऊथ कोरियाला झालेले त्यांच्या शिल्पकृतींचे प्रदर्शन – ओव्हरऑल माणूस म्हणून त्या भन्नाट आहेत. बोलता बोलता तुमची फिरकी त्या कधी घेतील सांगता येत नाही. आणि भूक लागली असं सांगताच गरम गरम पिठलंभात करून खाऊ घालतील – आणि तरीही या सगळ्यात त्या स्वतःची ओळख ‘चटोर’ म्हणून करतात.

मी अभिनयासाठीच मी सहावीत असतानाची गोष्ट आहे. १९६६चा काळ असावा. ‘नीलूचं नाटक’ म्हणून गावात लोकांमध्ये उत्सुकता असायची. नंतर कॉलेजमध्ये राज्यस्तरीय नाटकाच्या स्पर्धा असू द्या किंवा मुंबईमधील त्यावेळची उन्मेष – सगळ्या स्पर्धांची बक्षिसं माझ्याच पदरात असायची. मुळात मी मुंबईला आले ते अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठीच. १९७७ ते ८८ दरम्यान ‘अलमास अलमास’ केलं. ‘एक डोही अनोळखी’ या नाटकाचं दिग्दर्शन केलं. ‘गोकुळ ही एक कहाणी’ मधील माझं पात्र लोकांच्या लक्षात राहिलं. सचिन यांनी त्याच भूमिकेवरून मला ‘आत्मविश्वास’साठी विचारलं. २००२ मध्ये ‘स्पर्श’ नावाची टेलीफिल्म केली. खूप अंतराने काम करते, कारण पोटापाण्यासाठी कलेचा वापर करत नाही. कलेचा आदर आहे म्हणून वाट्टेल तशी कामं स्वीकारली नाहीत. एखादं काम किंवा पात्र आतून करावसं वाटत नाही तोपर्यंत करत नाही. म्हणून प्रेक्षक माझा सिनेमा, नाटक आणि मालिकेमधल्या पात्राला आणि मला नीलकांती म्हणून वेगळं ठेवतात, त्यात तुम्ही खूपच वेगळ्या वाटल्या होतात अशी दाद प्रत्येक कलाकृतीला मिळते. कलाकार म्हणून अजून काय हवंय ?

माणूस म्हणून असं जगता आलं पाहिजे बऱ्याच कमी बायका आहेत ज्यांना त्यांचं बाहेरचं काम आणि घर व्यवस्थित सांभाळता येतं. तिथली नाती, माणसं सगळ्यांनाच जपता येत नाहीत. लग्नानंतर मी दोन्ही बाजूंकडे कसरत म्हणून पाहिलं नाही. ज्यावेळी जिथे होते तिथला मनमुराद आनंद लुटला. माणूस म्हणून छान जगायला आवडतं. उगीच एखादा राग मनात ठेवून, दूषण देत जगणारी मी नाही. कोणाला उगीच अडकवून न ठेवता प्रत्येक नातं जपावं, मग स्वतःतला माणूस आपोआप गवसतो. मी आणि मल्हार सॉलिड टीम- माझा मुलगा मल्हार आणि माझ्यात असंच एक नातं आहे. आमच्या दोघांमध्ये सगळ्यात लहान मीच. काही वाचलं, किंवा एखादा सिनेमा बघितला तर त्यावर जोरदार चर्चा होते, एखाद्या विषयावर खटके उडाले तर साहेब मला ओरडतात, आई तू आत्ता शांत बसायचं हां. पण बऱ्याच गोष्टींवर आम्हा माय लेकाची टीम एकत्र असते. शिकणं, शिकवणं प्रत्येक टप्प्यात उपयोगी पडतं शाळेत अभिनयासोबत अभ्यास कधीच सोडला नाही. आयआयटीसाठी माझी निवड झाली होती. संस्कृत माझ्या जवळचं! त्यातले मंत्र आणि श्लोक माझी भाषा अजून प्रगल्भ करतात. बोलताना उच्चार, शब्दांची फेक यांवर प्रभुत्व मिळविण्यासाठी संस्कृत भाषेने खूप मदत केली. योग लहानपणा पासून करते म्हणून मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य आहे. अभ्यास हा फक्त पुस्तकं, शाळा कॉलेज किंवा एका विशिष्ट वयापुरता नसावा. रोज काहीतरी शोधण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करून बघा. काय माहीत, तुमच्यात कुठले कलागुण दडले असतील. वयाच्या कोणत्या वर्षी तुमच्या डोक्याला आणि हाताच्या बोटांना काय गवसेल.

वयाच्या कोणत्या वर्षी तुमच्या डोक्याला आणि हाताच्या बोटांना काय गवसेल आणि बोटं आपसूकच वळू लागली तीन वर्षांपूर्वी पायाने त्रास द्यायला सुरूवात केली. म्हणून, डॉक्टरांच्या सल्ल्याने जास्त फिरणं बंद झालं. मग कंटाळा यायचा म्हणून एका मैत्रीणीसोबत कॅमेरा घेऊन कुंभारवाड्यात जायला लागले. ती पॉटर होती. आधी फक्त जाऊन गप्पा मारायचे.. बसून बसून कंटाळा यायला लागला म्हणून छोटे छोटे रिप्लिका बनवायला लागले. २०१३ ला पहिलं स्कल्पचर बनवलं. ३ महिन्यात ३० ते ४० शिल्प बनवले. माती हे माध्यमच वेगळं आहे. मातीला स्पर्श केला की तुमचे विचार आणि त्या विचाराने घडणारी कलाकृती यांच्यात अजून कोणीच नसतं. एकदा कळायला लागलं मला हे जमतंय, मग मी थांबलेच नाही. आणि गंमत म्हणजे हा फक्त एक छंदच नाही राहिला. जहांगीर आर्ट गॅलरी ते न्यूयॉर्क, साउथ कोरियाला याचे प्रदर्शन झाले. आणि हो, अगदी लहानपणापासून करत होते असं ही नाही, या वयात मी स्वतः स्वतःला नव्या रुपात सापडलेय. आणि पडक्या दाताची आजी भेटली

मला ५० वर्षांनी भेटलेला माझा बालमित्र हा वयानुसार वेगळा नक्कीच असेल, पण मी त्याला माझा बालमित्र म्हणूनच भेटेन. माणसांमधल्या नात्याची हीच तर मज्जा आहे. मी बनवलेल्या शिल्पकला बऱ्याच जणांनी पाहिल्या. लोकांनी विचारलं “खूप वर्ष काम करता, कोणत्या आर्टस कॉलेजला होत्या” तर मला हसू येतं , त्यावर उत्तर देते की, मला साधं कागद घेऊन एखादं चित्र रेखाटायला सांगितलं तर जमणार नाही. पण या मातीशी नाळ जोडली गेली आहे. जसा थॉट बदलत जातो तशी बोटं फिरायला लागतात, त्यातूनच ‘वॉर अँड पीस’, पडक्या दाताची आजी हिचं ‘वेल्थऑफ स्माईल’ नावाचं शिल्प हातातून घडलं. सध्या मी स्कल्पचरसाठीचे वर्कशॉप्स घेते. त्यात मुलांना टेक्निक्स पेक्षा एखादा विचार समरसून कसा करायचा हे शिकवते. कला संवेदनानांवरच मोठी होते, टेक्निकचं काय, ते कोणीही शिकू शकतं. एकमेकांचा नाद लुटता आलं पाहिजे सध्या स्त्री पुरुष समानतेला घेऊन होणारे वाद नको त्या मुद्द्यावर होताना दिसतात. स्त्री आणि पुरुष हे एकमेकांचे सहचर आहेत. जे माझ्याकडे आहे ते पुरुषाकडे नाही, जे पुरुषाकडे आहे ते माझ्याकडे नाही. निसर्गाने माणसाला सगळ्यात बुद्धिमान प्राणी बनवला आहे. स्त्री पुरुष एकमेकांशिवाय पूर्ण नाहीयेत. मग एकमेकांवर जोरजबरदस्ती कसली? एकमेकांची स्पेस जपून, एकमेकांचा नाद लुटता आला पाहिजे. आयुष्य साजरं करता आलं पाहिजे.

आमची बाबा फटाक्यांची दिवाळी आत्ता प्रदूषणाचे दाखले देत दिवाळीत फटाक्यांवर फुल्ली मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पण माझ्या लहानपणी आम्हा पाच भावंडात फटाक्यांची वाटणी करून त्याचा दणका उडविणे हा दिवाळीचा महत्त्वाचा कार्यक्रम असायचा. लक्ष्मी , सुतळी बॉम्ब हातात पेटवून, फुटण्याच्या वेळेस दूर उडवायला भारी मज्जा यायची. आमचे बाबा पण आमच्यात सामील व्हायचे. रॉकेट हातात पेटवून, मग ते सोडायचे, त्यासाठी बाटली वापरणं असला काही प्रकार नव्हता. लग्नानंतर माझा मुलगा मल्हार याच्यासाठी जेव्हा फटाके आणायला लागले, त्याच्यासमोर हातात फटाके घेऊन उडवून फोडायला लागले, तेव्हा तो गार झाला होता. गेल्या काही वर्षात मुंबईत तरी फटाके फोडले नाहीत, कारण लहानपणी आमच्या घरासमोर मोठं मैदान असायचं. आता रॉकेट सोडलं तर कोणाच्या घरात जाऊन काय दिव्य होईल हे सांगता येत नाही. दिवाळी फार आवडता सण आहे.

NeelkantiSculpture2

COMMENTS