BUY NOW

मैत्र सई गिरीजाचे

sai

सई :- गिरीजा तुझी परफेक्ट हॉलिडेची व्याख्या काय ?
गिरीजा :- एकट्याने प्रवास करायचा, मनसोक्त हिंडायचं आजूबाजूला कुणीही ओळखीचं नाही मी आणि फक्त मी, हा आहे माझा परफेक्ट हॉलिडे, अशावेळी मला माझे खास असे बेत आखता येतात जे खूप लोक असले की नाही ठरवता येत.

सई :- म्हणजे सोलो ची कल्पना जास्त आवडते असेच ना ?
गिरीजा :- हो मस्त व्याख्या आहे ‘सोलो’!मला ही कल्पना प्रचंड आवडते कारण विशेषकरून जेव्हा तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असता आणि मुख्य म्हणजे मुलं बरोबर असताना तुम्हाला तुमचे स्वत:चे असे बेत आखता येत नाहीत तिथे सर्वांच्या अनुमतीने, प्रत्येकाची आवड निवड जपत तुम्हाला बेत आखावे लागतात. नाही म्हणजे मला असेही हॉलिडे आवडतात, पण तिथे थोडीफार का होईना पण तुम्ही तडजोड करत असता म्हणजेच ते तुमच्या मनासारखे नसतात त्यामुळेच माझा कल हा प्रामुख्याने ‘सोलो’ प्रवासाकडे जास्त असतो.

गिरीजा :- तू खूप गोष्टी भावनेच्या भरात करतेस तू फार विचार करत नाहीस या गोष्टीचा त्रास झाला का?
सई :- सारासार विचार करता भावनावश होऊन कुठलीही गोष्टी करण ह्याचा निश्चितच त्रास होतो जो मलाही झाला आहे. पण मग मी स्वत:ला पटवून देते की कदाचित हीच माझी खुबी असेल आणि मग मागे वळून पाहताना असही वाटतं, की आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात जे काही निर्णय घेतले तेव्हा ह्याच गोष्टीचा तर मला फायदा झाला. तेव्हा असं काही नाही की आपण आपला स्वभाव बदलणे गरजेचे आहे. आणि हो, मला माझ्या ह्या भावनावश होऊन निर्णय घेण्याच्या वृत्तीबद्दल काही जणांनी तर असंही सांगितलं आहे की ही गोष्ट माझ्या व्यक्तिमतवाचा अविभाज्य घटक असून त्यामुळे माझे व्यक्तिमत्व अजून सुंदर भासते.

सई :- मी तुला आज इतकी वर्ष ओळखत आहे आणि मला माहीत आहे की तू अशी मुलगी आहेस की तू फार जामानिमा न करता अत्यंत साधेपणाने कुठेही जातेस आणि ज्या पद्धतीने तू वावरतेस त्याचं मला नेहमीच आश्चर्य आणि कौतुक पण वाटतं, की तू स्वतःला इतकं छान कॅरी कसं करतेस ? मग ते सेल्फी असोत किंवा फोटोज असोत. हे मान्य की प्रत्येकाची आपली एक स्टाईल असते. पण मग असं तू कधी करू शकशील का, की तू तुझा आळस थोडा बाहेर ठेवून, लोकांचा विचार करून वागू शकशील का ? म्हणजे अशी शक्यता तुला वाटते का ?

गिरीजा :- एकतर मी खूप आळशी आहे, त्यात अशा पद्धतीने विचार करून वागायचं तेही लोकांसाठी, मला खरंच हे महत्वाचं वाटत नाही, आणि हे माझं प्रामाणिक मत आहे. मुख्य म्हणजे जे कोणी असं वागतात आणि ज्यांना हे महत्वाचं वाटतं त्यांच्या विषयी तर मला अपार कौतुक वाटतं, ज्यात तू पण एक आहेस. म्हणजे प्रत्येक वेळेस घराच्या बाहेर पडताना आपण काय घातलंय आणि आपण कसे दिसतोय किंवा लोक काय म्हणतील? किंवा आपण प्रेझेंटेबल दिसतोय की नाही, जर कोणी आपले फोटो काढले ते ते कसे येतील वगैरे वगैरे मला मात्र ह्याचा विचार करणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे अजिबात जमत नाही, किंबहुना जमणारच नाही. मुळात हे माझ्या लक्षातच राहत नाही.

sai4

माझ्यासाठी पूर्ण अंगभर कपडे आहेत हे जास्त महत्वाचं वाटतं. मग माझे केस तेलकट आहेत किंवा मी जिम मधून आल्यामुळे घामाने थबथबलेली आहे आणि अशावेळी कोणी फोटो काढले तर काय? हा विचार मी बिलकुल करत नाही. आहे ते आहे. त्यामुळे खूप वेळा माझे असे काही भयंकर फोटो काढले गेले आहेत किंवा मी काढून घेतलेले आहेत आणि जे फोटो माझ्या हितचिंतकांनी त्यांच्या मित्रांच्या सोशल मीडिया वर टाकलेले दाखवलेले आहेत, की हे बघ कशी माकडासारखी दिसतेयस किंवा अजून काही. पण मला खरंच त्याचं काही वाटत नाही आणि फरक पण पडत नाही. कारण, माझा सॉफ्टवेअर वर विश्वास आहे हार्डवेअर वर नाही.

sai3

गिरीजा :- थोडं कामाबद्दल विचारते. जेव्हा तुला एखादी भूमिका करायची असते तेव्हा त्याचा अभ्यास किंवा त्याची तयारी तू कशा प्रकारे करतेस ?

गिरीजा :- जेव्हा मला एखादया भूमिकेबद्दल सांगितलं जातं, त्याची माहिती दिली जाते तेव्हा सर्वप्रथम मी स्वत:ला भूमिकेत ठेवून त्या भूमिकेशी स्वतःची सांगड घालते म्हणजे त्या भूमिकेला अनुकूल अशा कुठल्या गोष्टी माझ्या स्वभावात आहेत किंवा भूमिकेशी एकरूप होण्यासाठी माझ्यामध्ये असलेल्या कुठल्या वैशिष्ट्यांचा मला उपयोग करून घेता येईल. मनापासून सांगायचं तर पूर्वी मला भूमिकेतली एखादी गोष्ट किंवा भाव माझ्या स्वभावाप्रमाणे नसतील तर त्रास व्हायचा म्हणजे मला ते स्वीकारायला खूप जड जायचं. मी मग थोडं माझ्या पद्धतीने करायचा प्रयत्न करायचे. पण, अनुभवाने असं लक्षात आलं की जर आपल्याला एखादी भूमिका जगायची असेल तर स्वत:ला विसरून त्या भुमिकेत समरसून जाता आलं पाहिजे, पेक्षा ती भूमिका जगता आली पाहिजे आणि मुख्य म्हणजे त्यात स्वत:ला झोकून देता आलं पाहिजे आणि तुम्ही जेव्हा असं करू शकाल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही ती भूमिका जगाल आणि त्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकाल.

सई :- खरं म्हणजे हा तसा बाळबोध प्रश्न आहे, पण तुझ्याकडून त्याच जे उत्तर मिळेल ते खूप संवेदनशील किंवा विलक्षण असेल हे गृहीत धरून मी तुला विचारते की “मातृत्व” ह्याची व्याख्या तू काय करशील ?
गिरीजा :- बाळबोध हा जो शब्द वापरलास तो खूप मस्त आहे. कारण, बहुतांशी स्त्रिया या प्रश्नाचं अत्यंत घीसेपीटे असे उत्तर देतात; म्हणजे आई होणं ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे आणि तत्सम. पण, माझ्यासाठी आई होणं हे जसं वरदान आहे तितकंच ते एकप्रकारे कष्टप्रद सुद्धा आहे. कारण वरपांगी हे खूप छान दिसतं, पण ते तसं नाहीये कारण फक्त मुलं जन्माला घालून आईपण संपत नाही. आपल्याकडे ढोबळमानाने प्रसूती काळात स्त्रियांना होणारा त्रास हा फार मोठा वाटतो, पण मला त्याहीपेक्षा नंतर जे त्रास असतात ते खूप मोठे वाटतात. कारण प्रसूती काळ हा तुम्हाला माहित असतो, त्यातल्या प्रसूतीच्या वेळचा त्रास तुम्ही गृहीत धरलेला असतो. त्यासाठी तुम्हाला काही करावं लागत नाही, मात्र प्रसूती नंतर खरा प्रवास सुरु होतो प्रत्येक दिवस एक आव्हान असतं, कारण एक नवीन माणूस घडवण्याची जबाबदारी तुमच्यावर असते. त्याचं संगोपन करणं, त्याला वाढवणं हे सारं तुम्हाला करायचं असतं.

गिरीजा :- सई, काही दिवसांपूर्वीची गोष्ट, काही मित्र मैत्रिणी एकत्र येऊन घरी छान पार्टी करत होते, तेवढ्यात पार्टीला कलाटणी मिळाली आणि पोलीस वगैरे आले, त्यात मीही अप्रत्यक्षरीत्या होते, कारण माझा नवराही त्या पार्टीत होता. हे सगळं झाल्यावर, इतक्या गोष्टी तुझ्याबद्दल छापून आल्या, काही वाचून तर मी ही सुन्न झाले. तू ह्यातून कशी बाहेर आलीस?
सई :- त्रास होतोच, आणि तो खूप झाला. पण यातून चांगली गोष्ट ही झाली की चांगले मित्र कोण वाईट कोण हे या वेळेस कळले. ही पारख फार महत्वाची होती. अजून एक शिकले ते म्हणजे पब्लिक लाईफ मध्ये कसं कॅरी करायला हवं. या सगळ्यातून बाहेर पडायला घरचे, मित्रमंडळी होते म्हणून खूप आधार वाटला.

सई :- आपल्या दोघींबद्दल काय म्हणशील?
गिरीजा :- आपली ओळख झाली ती एका ऍप्टिट्यूड टेस्ट सेन्टर मध्ये, दहावीच्या आसपास. तेव्हापासून आपण कायम एकमेकींना भेटायचो, पत्रं लिहायचो. तू कायमच भरभरून देतेस, मी थोडी हातचं राखून वागणारी. मला खूप वर्षांनी हे उमजलंय, की कुठल्याही नात्यात गुंतवणूक ही करावीच लागते आणि हे तुझ्याकडे बघून मला शिकायला मिळालं. आता मी बदललीये, तुझ्याबाबतीत तर नक्कीच. बाकीच्यांकरिता मी अजूनही हातचं राखूनच वागते.

sai2

गिरीजा :- आपल्या चित्रपट सृष्टीत किंवा असंही म्हणू की एकूणच समाज हा अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीत जखडलेला आहे आणि म्हणूनच पुरुष कलाकारांना जितकं मानधन मिळते, तितकं स्त्री कलाकारांना मिळत नाही. तू ह्याबद्दल काय सांगशील? तुझ्या स्वभावाशी सुसंगत असं उत्तर दे.
सई :- एक म्हणजे मुळात मला हे पटत नाही आणि मी हे मान्य देखील करत नाही. माझ्या मते तुम्ही स्वत:ची किंमत ओळखणं हे सर्वात महत्वाचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही रास्त अशी मागणी करणं हा तुमचा हक्क आहे. पण आपल्याकडे काय होतं, मुळात आपण आत्मसंशोधन न करता प्रवाहाप्रमाणे वाहत जातो आणि मग वेगळी वाट शोधायचा विचारच करत नाही, उलट मी तर असंही म्हणेन, की ह्या क्षेत्रात पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त वाव आहे. एक म्हणजे उपलब्ध असलेली विविध क्षेत्रं, मग फॅशन इंडस्ट्री असेल किंवा त्याशी संलग्न अशी विविध क्षेत्रे. त्यामुळे तुम्ही नवीन वाट चोखंदळणे आणि स्वतःची ओळख निर्माण करणे हे खूप महत्वाचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तडजोड न करणे.

गिरीजा :- कसं आहे सई आज तुला हे शक्य आहे, कारण आज तू ज्या उंचीवर आहेस तिथे तुझे लाड पुरवले जातात. पण, म्हणून तू ही गोष्ट जरा गांभीर्याने घेऊन इतर कलाकारांना फायदा होईल अशा पद्धतीने काहीतरी करावंस असं मला मनापासून वाटत.
सई :- तुझ्यासाठी दिवाळी म्हणजे काय आहे ?

गिरीजा :- एकाच शब्दात सांगायचं तर दिवाळी म्हणजे घरचा मऊ भात. त्याची जी चव आहे तोच अर्थ मला दिवाळीसाठी अभिप्रेत आहे. नातेवाईक, जवळचे मित्र मैत्रिणी ह्यांच्यात राहणं आणि रमणं मला खूप आवडतं. दिवाळी हा तर सर्वानी एकत्र साजरा करायचा सण त्यामुळे कटाक्षाने मी दिवाळी मध्ये कुठलंही बाहेरचं काम करायचं शक्यतो टाळते. दिवाळीची माझी संकल्पना ही नवीन कपडे घालायचे, नातेवाईकांना घरी बोलवायचं पहिल्या दिवशी उटणं लावून अंघोळ, एकत्र केलेला फराळ त्यानंतर नातेवाईकांकडे जायचं किंवा त्याना घरी बोलवायचं आणि मस्त पैकी सण साजरा करायचा, ही माझी खरी दिवाळी म्हणजेच घरचा “मऊ भात”
सई :- ह्या बाबतीत माझी पण मतं तशीच आहेत. मुख्य म्हणजे घरच्यांबरोबर दिवाळी साजरी करणं ह्यापेक्षा दुसरा कुठलाच मोठा आनंद नाही. दिवाळी फार आवडते.

गिरीजा :- सई तू मुळची सांगलीची, त्यामुळे सांगलीबद्दल अस काय सांगशील किंवा अशी कुठली गोष्ट की जी सांगलीत येऊन नक्की करायला हवी?
सई :- सांगलीत पुष्पराज चौकात मिळणारा मसाला थम्स अप हे एक विलक्षण असं पेय आहे ज्याचा नक्की सर्वानी आस्वाद घ्यावा.

सई :- मुंबई कि पुणे ?
गिरीजा :- वर सांगितलं तसं कितीही झालं तरी मऊ भात तो मऊ भात आणि मुंबई हा माझ्यासाठी तेच आहे कारण मी तिथे लहानाची मोठी झाले. हां, पण आता पुणे शहरात माझं घर, संसार आहे आणि एक शहर म्हणून मला तेही तितकंच आवडतं, मी आता पुण्याचीच झाले, तरीही “मऊ भात” जास्त जवळचा.

सई / गिरीजा : तर अशा ह्या दोन जिवलग मैत्रिणींच्या गप्पा.

COMMENTS