BUY NOW

मृणाल कुलकर्णी

mrunali

जीवनाचे एक गाणे गात जाताना,
वेगळीशी चाल त्याची बांधते आहे …

वरील काव्यपंक्ती मृणाल कुलकर्णीच्या ‘अवंतिका’ या मालिकेच्या शीर्षकगीताच्या आहेत. चित्रवेधशी गप्पा मारताना, तिच्याबद्दल जाणून घेताना या ओळी खरंच तिच्यासाठी समर्पक ठरतात. रमाबाई पेशवे, द्रौपदी, जिजामाता ही ऐतिहासिक पात्रं जितक्या ताकदीने तिने रंगवली; त्याचवेळी सोनपरी म्हणून ती लहानग्यांची आवडती आहे. सिनेलेखिका, दिग्दर्शिका म्हणून ऐतिहासिक, सामाजिक, कौटुंबिक विषयांना एक वेगळा रंग देण्याचं कसब नेहमीच तिच्या चाहत्यांना थक्क करते. कलाकार म्हणून ती ग्रेट आहेच, पण एका सेलिब्रिटी पलीकडच्या मृणाल कुलकर्णीला जाणून घेण्याचा प्रयत्न चित्रवेधने केला. मराठी साहित्य, नाटक यांची जपणूक झालीच पाहिजे.

मराठी भाषेवर सध्या अन्याय होतोय, किंवा आपली संस्कृती लोप पावत चालली आहे. यावर फक्त चर्चा होतात पण त्यावर तोडगा निघत नाही. दिवाळी अंक हा आपल्या साहित्य संस्कृतीचा एक भाग, तो जपणं गरजेचं आहे. मला आठवतंय, लहानपणी दिवाळीच्या सुट्टीत आमच्याकडे दिवाळी अंक आवर्जून वाचले जायचे. चित्रवेधचा हा प्रयत्न खूप छान आहे. डिजिटल व्यासपीठावर दिवाळी अंक ही नवी संकल्पना आजच्या पिढीला नक्कीच आवडेल. नाटक तर मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक, तिथे नव्या पिढीने अजून प्रयोग करायला हवेत. भाषेत प्रत्येक युगात तिथल्या सामाजिक, वैचारिक क्रांतीमुळे बदल होतील. पण, शेवटी आपण आपल्यापरीने त्या भाषेला किंवा संस्कृतीला कलेच्या मदतीने कसं समृद्ध करतो हे आपल्यावरच अवलंबून आहे ना ?

यंदाची दिवाळी अशी साजरी करेन आमच्याकडे दिवाळी म्हणजे संपूर्ण कुटुंबाने एकत्र येणे आणि घरी बनवलेल्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेणे . घरी मी सगळा फराळ बनविण्याचा घाट घालत नसले, तरी काही पदार्थ आवर्जून बनवते. लहानपणी गड किल्ल्यांवर दिवाळी साजरी केली जायची. निसर्गात रमायला मला आवडतं. तसा बेत आत्ता करता आला तर दिवाळीची रंगत अजून नक्कीच वाढेल.

आवडती पुस्तकं ? वाचलेली, वाचत असलेली… लिटरेचरमध्ये मास्टर्स केलंय. तसंच साहित्याचा वारसा हा माझ्या कुटुंबातूनच माझ्याकडे आलेला आहे. कथा, कादंबऱ्या आत्तापर्यंत वाचत आले, पण हल्ली कवितांचा नाद लागलाय. संदीप खरे आणि कौशल इनामदार यांच्यासोबत मी काही कार्यक्रम केले. त्यांच्यामुळे कवितांचा सेक्शन डिस्कवर करावासा वाटला. मराठी कवी-कवियत्रींचा एक खंड घेतलाय, तो सध्या वाचतेय. दोन वर्षांपूर्वी हॅरी पॉटर वाचलं,आणि ते मला सुचवलं माझ्या मुलाने. त्याचं कारण असं, की माझा मुलगा एके दिवशी म्हणाला, ‘आई तू नेहमी मला सुचवतेसं की हे वाच, हे जरा नजरेखालून जाऊ दे. पण मी काय वाचतो, माझी आवड काय आहे हे तुलापण कळायला हवं.’ आपण मोठे झालो आहोत. हे अमुक लहान मुलांसाठीचं असं म्हणून बऱ्याच चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. अश्या काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे कदाचित जनरेशन गॅप हा प्रॉब्लेम उद्भवत असेल.

मराठीत बायोपिक करायला आवडेल पण… हिंदीत सध्या बायोपिकचा ट्रेंड जोरात सुरु आहे, मराठीत मला एखादे बायोपिक करायला नक्कीच आवडेल. आपल्याकडे बायोपिक फक्त खेळाडूंच्या जीवनपटावर आधारित असते.

मला लेखकाच्या आयुष्यावर बेतलेली गोष्ट करायची आहे. दिग्दर्शिका म्हणून माझे आजोबा गो.नी. दांडेकर यांच्यावर सिनेमा करायला नक्कीच आवडेल; आणि जर अभिनेत्री म्हणून एखादा सिनेमा करायचा असेल तर गौरी देशपांडे यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारायला मला नक्कीच आवडेल. अभिनेत्री म्हणून मी लोकांना माहित होते पण दिग्दर्शिका म्हणून जेव्हा माझा पहिला सिनेमा ‘रमा माधव’ करायला घेतला, सेटवर असताना काहींना ते पचनी पडलं नाही. कारण, तांत्रिक विभागात पुरुष मंडळी प्रामुख्याने काम करताना दिसतात. त्यामुळे एखादी बाई किंवा मुलगी त्या विभागाशी जोडली गेली तर साशंक नजरा आणि मतं नक्कीच वळतात. पण, मी काम जाणून घेतलं, संवाद साधताना बॉसगिरी दाखविली नाही त्यामुळे दोन्ही बाजूने सिनेमा करताना सोपं झालं. आपल्याकडे अजूनही सिनेमातील तांत्रिक विभाग म्हणजे सिनेमाचं छायाचित्रण असू द्या, किंवा संकलन असू द्या; इथे मुलींचा ओढा कमी आहे. पण त्यातही बदल होतील, झाले पाहिजेत.

बदलत्या काळानुसार बदलतेय मी… काळानुसार प्रत्येक माणसात बदल होत असतात. कलाकार तसंच एक माणूस म्हणून बऱ्याच बदलांना सामोरं जावं लागतं. मला नव्या गोष्टी जाणून घ्यायला नेहमीच आवडलं आहे आणि हे बदल घडत असताना नाती खूप महत्वाची भूमिका बजावतात. नाती मला कॅलीडोस्कोप सारखी वाटतात. आपल्या विचारांना आणि कामाला पुढे नेण्यासाठी आपल्या आयुष्यातील नाती खूप महत्वाची ठरतात.

लहान वयात लग्न केलं, आणि त्याची जादू अजूनही कायम आहे … लग्नसंस्था या विषयावर मी ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ नावाचा सिनेमा केला. त्या दरम्यान बऱ्याच जोडप्यांशी संवाद साधला. आजच्या पिढीला माणसं इतकी वर्ष एकत्र कशी राहू शकतात हा प्रश्न नेहमी पडतो. पण माझे पती अॅड. रुचिर कुलकर्णी हे माझे मित्र म्हणून खूप जवळचे आहेत. नात्यात मैत्री असली की तुम्ही आपसूक एकमेकांच्या कामाबद्दल, पर्सनल स्पेसबद्दल आदर ठेवता. आणि वर्षानुवर्षे सामंजस्य राखून एकत्र राहिल्याने ते नातं मुरांब्यासारखं मुरत जातं.

माझा मुलगा विराजस लवकरच त्याची फिल्म घेऊन येतोय… विराजसने सिनेलेखक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करायचा निर्णय घेतला आहे. आमच्या कुटुंबातील लेखनाचा वारसा विराजस पुढे नेईल. आई म्हणून मला त्याचा खरंच खूप अभिमान वाटतो. थेट्रोन नावाच्या नाटक संस्थेशी तो जोडला गेलाय. विस्लिंग वूड्स या सुभाष घई यांच्या फिल्म स्कूलमधून तो पास आउट झाला आहे. तो त्याच्या स्क्रिप्टवर काम करतोय, लवकरच तो सिनेसृष्टीत एक लेखक म्हणून पदार्पण करेल.

बायकांनी उगीच सुपरवुमन व्हायला जाऊ नये… घरची कामं आणि त्यात बाहेरची कामं या सगळ्याचा घाट घालत असताना सध्याची स्त्री सुपरवुमन होऊ पाहतेय. अश्याने ती स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. कुटुंब आणि तिचं प्रोफेशनल आयुष्य यांमध्ये तिची ओढाताण होते. अश्यावेळी तिने घरच्या कामाचं नियोजन सगळ्या कुटुंबासोबत केलं पाहिजे. नवरा आणि मुलं यांनाही घर कामात मदत करण्यासाठी सामील केलं पाहिजे. स्त्रियांसोबत घरातल्या पुरुषांना पण बेसिक स्वयंपाक करता आला पाहिजे. आमच्याकडे माझे मिस्टर आणि मुलगा दोघेही मला घर कामात मदत करतात.


कामापुरतं सोशल आणि मिडिया …
सोशल मिडिया सध्याची गरज असली तरी त्याचा वापर कितपत करावा यावर सेन्सॉर लागण तितकंच महत्वाचं आहे. मला गरज वाटते तेव्हा मी फेसबुक वापरते पण आज माझ्या ताटात काय आहे याचे फोटो अपलोड करणं असले प्रकार करत नाही. सोशल मिडीयावर सध्या सगळ्याच लोकांना एक स्टेटस आलंय, प्रत्येकाला प्रत्येक विषयावर बोलायचं आहे. मात्र ऐकून घेणं याबाबतीत दुष्काळ दिसतो. त्यामुळे या चक्रापासून शक्य तितक्या लांब राहण्याचा प्रयत्न करते.

साड्यांमधली तुझी रुची नेहमीच वाखाणली जाते… माझ्या आईकडे खूपच छान साड्या होत्या. कदाचित तिची दृष्टी माझ्याकडे आली असेल. पारंपारिक वेशभूषेत राहणं मी नेहमीच पसंत केलंय. माझी पहिली साडी मी सोळाव्या वर्षी नेसली. त्यानंतर बऱ्याच ऐतिहासिक मालिका करताना खूप सुंदर साड्या नेसता आल्या. पैठणी, कांजीवरम साड्या मला खूप आवडतात.

आपले मसाले आपल्यासोबत घेऊन फिरावे … नुकतीच मी पॅरीसला जाऊन आले, तिथे मी काही मालवणी मसाले घेऊन गेले होते. तिथले खाद्य पदार्थ बनवताना त्यांचा वापर करून एक प्रयोग केला. माझ्या मित्रमंडळीना तो आवडला. फिरण्याची आवड असल्याने, बऱ्याच देशांमध्ये जाण्याचे बेत आखले जातात. अश्यावेळी तिथे जाताना आपले काही खास मसाले मी जवळ ठेवते.

आजचा सिनेमा आणि आजची मी … आजच्या डिजिटल युगात एक कलाकार म्हणून मी खूप सकारात्मक दृष्टीने सिनेमाकडे पाहते. सध्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर सिनेमा शूट करून, काही अॅप्सच्या मदतीने एडीट करून एक फिल्म तयार करू शकता. आणि ते पाहण्यासाठी सोशल मिडीयावर स्वतःचा प्रेक्षक मिळवू शकता. टेक्नोलॉजीमुळे गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्यामुळे कमी खर्चात तुमची गोष्ट तुम्ही लोकांसमोर आणू शकता, याशिवाय एका फिल्ममेकरसाठी अजून सुदैवाची गोष्ट कोणती? आजच्या पिढीला फक्त उठून काम करायचं आहे, त्यांचा आत्ताचा स्ट्रगल दर्जेदार गोष्टी ते लोकांसमोर कसे आणतील यावर असेल. आजच्या पिढीतल्या नव्या फळीकडून स्क्रिप्ट्स ऐकतेय, नव्या गोष्टी शिकायला मिळताहेत. फार छान स्पेस मध्ये आहे.

-पूनम बिश्त

COMMENTS