BUY NOW

सुपरहिरो ते सुपरह्युमन्स : अभय कोरान्ने

मुलाखत आणि शब्दांकन: राज जाधव

Rocket Boys

“जे खरे हिरो आहेत त्यांची गोष्ट सांगितली गेली पाहिजे, म्हणून मी दोन नामांकित शास्त्रज्ञांची गोष्ट सांगायचं ठरवलं!” – अभय कोरान्ने

रॉकेट बॉईज या अतिशय गाजलेल्या वेबसिरीजचे मूळ कथालेखक अभय कोरान्ने सांगतायत त्यांच्या लेखक म्हणून प्रवासाबद्दल!

अभय कोरान्ने हे नाव लेखक म्हणून आपल्याला परिचित होतं ते ‘भावेश जोशी’ या एका सुपरहिरोच्या सिनेमामुळं, पण, ‘रॉकेट बॉईज’ या सोनी लिव्हवर आलेल्या वेबसिरीजच्या दोन्ही सिझन्सला मिळालेल्या तुफान यशानंतर सिरीजचा लेखक-दिग्दर्शक अभय पन्नू इतकंच ही आगळीवेगळी शास्त्रज्ञ द्वयीची गोष्ट आपल्यासमोर आणणाऱ्या मूळ कथालेखक अभय कोरान्ने हे नाव सर्वश्रुत झालं. या वेबसिरीजसाठी त्यांना उत्कृष्ट मूळ कथानकासाठी फिल्मफेअर नामांकन आणि iita अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे. तर जाणून घेऊया अभय कोरान्ने यांचा चित्रपट आणि वेबसिरीज माध्यमातील एक लेखक म्हणून प्रवास आणि अनुभव…

अभय सर्वप्रथम तुमचं ‘चित्रवेध’ टीमतर्फे मनापासून अभिनंदन आणि या मुलाखतीसाठी ‘चित्रवेध’ टीमशी संवाद साधण्यासाठी तुम्ही वेळ काढल्याबद्दल आभार…

प्रश्न :तुमच्या चित्रपट क्षेत्रातील या सर्व प्रवासाची सुरुवात कशी झाली? तुमची आवड, मॅनेजमेन्टमधील कॉर्पोरेट जॉब नसून लेखन आणि सिनेमा ही आहे, हे कधी जाणवलं? ती तुम्ही कशी जोपासली? या निर्णयावर तुमच्या कुटुंबाची प्रतिक्रिया कशी होती आणि त्यांनी पाठिंबा कसा दिला?

अभय: खरं तर, मला शाळेत असल्यापासूनच सिनेमाची आवड होती. मी स्वतःला लकी समजतो की माझा जन्म, केवळ सिनेमांबद्दल साक्षर असणाऱ्याच नव्हे तर कला, साहित्य आणि संस्कृतीवर अधिक भर देणार्‍या कुटुंबात झाला. त्या काळात आम्ही असं एकमेव कुटुंब होतो की ज्यांच्याकडे मुलं मोठी होत असताना केबल टीव्ही नव्हता. त्या दिवसांत वीकेंडला डीडी मेट्रो आणि नॅशनल या दोन्ही चॅनेल्सवर उत्तम भारतीय चित्रपट दाखवत असत. हृषीकेश मुखर्जी आणि सई परांजपे यांच्या सिनेमांशी माझी अगदी लहान असतानाच ओळख झाली. सुट्ट्यांमध्ये आम्ही माझ्या आजी-आजोबांच्या घरी जायचो. त्यावेळी आई- बाबा चॅप्लिन सिनेमांच्या व्हिडिओ कॅसेट भाड्यानं आणत असत आणि आम्ही ते सिनेमे पाहत असू. जसजसा मी मोठा झालो (आणि केबलची सोय झाली) तसतशी माझ्या आईनं माझी सत्यजित रे, विजय आनंद, बिमल रॉय, गुरु दत्त, श्याम बेनेगल यांच्या सिनेमांशी ओळख करून दिली. शिवाय माझ्या वडिलांनी माझी ओळख सर्जिओ लिओनचे वेस्टर्न आणि अमेरिकन क्लासिक्स जसे की ‘द गॉडफादर’ आणि ‘द फ्रेंच कनेक्शन’ यांच्याशी करून दिली. माझी मोठी बहीण सई हिने मला Albert Camus, Dostoyevsky इत्यादींच्या महान साहित्याची ओळख करून दिली, ज्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. एका अशा सामान्य मध्यमवर्गीय घराची कल्पना करा, ज्या घराच्या दोन संपूर्ण भिंती पुस्तकांनी भरलेल्या आहेत, ज्यांनी भीमसेन जोशी ते एस.डी. बर्मन ते बीटल्सपर्यंत सर्व काही ऐकले आहे आणि जिथे पालक त्यांच्या मुलांना अकिरा कुरोसावाच्या ‘रोशोमोन’ किंवा ‘फिडलर ऑन द रूफ’ रेकमेंड करतात. अगदी लहानपणापासूनच माझ्यासाठी हे एक पूर्णपणे पोषक वातावरण होतं. आता मागे वळून पाहताना मला जाणवतं की, या पोषक वातावरणामुळंच मी आणि माझी बहीण दोघंही लेखन आणि क्रिएटिव्ह फिल्डमध्ये आहोत.

तसं तर सगळीच मुलं किशोरवयात बंड करतात, तसाच मीही होतो. पण, माझी बंडखोरी इतर मुलांपेक्षा जराशी वेगळी होती. माझी अम्मा (मी आईला ‘अम्मा’ म्हणतो) एक टेक्सटाईल डिझायनर आणि कलाकार आहे. दहावी झाल्यावर अम्मानं माझा कलाक्षेत्राकडे असलेला कल हेरून मी आर्ट्सला प्रवेश घ्यावा असं सुचवलं. पण, मी बंड करून सायन्स घेतलं आणि त्यानंतर मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं. मी ही बंडखोरी केली खरी; पण मी निवडलेला हा मार्ग मला स्वतःलाच बिलकुल आवडला नव्हता. माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन दरम्यान Evolution of Advertising in India या प्रोजेक्ट साठी मला डॉक्युमेंटरी व्हिडिओ सादरीकरणाची संधी मिळाली. ती डॉक्युमेंटरी फिल्म तयार करताना मला खूप आनंद मिळाला आणि तेव्हा मला हे जाणवलं की, मला हेच करायचं आहे – फिल्म्स! मग तो मोठा पडदा असो, छोटा पडदा असो, लाँग फॉरमॅट असो, शॉर्ट फॉरमॅट असो, काहीही असो. मला माझं ध्येय समजलं होतं.

मी जेव्हा वयात आलो, त्यादरम्यान इंटरनेटवरील सिनेप्रेमी समुदाय भारतात अस्तित्वात येत होता. त्यानंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, तेव्हा मी इरॉसमध्ये ‘रंग दे बसंती’ सारखे सिनेमे, शिवाय ब्रिटिश कौन्सिलमध्ये किंवा अमेरिकन सेंटर मध्ये स्कॉर्सेसचे चित्रपट पाहत असे. अशाप्रकारे माझी अधिकाधिक जागतिक सिनेमांशी ओळख होत होती – फ्रान्सवा ट्रूफो, किजलॉस्की, अब्बास कियारोस्तामी, पाक चान वूक इ. ‘पॅशन फॉर सिनेमा’ नावाचा एक अतिशय अक्टिव्ह प्लॅटफॉर्म होता, जिथे सिनेप्रेमी लोक सिनेमाबद्दल पोस्ट करायचे आणि त्याचे विश्लेषण करायचे. अनुराग कश्यप ‘नो स्मोकिंग, आणि ‘देव डी’ सिनेमाच्या मेकिंगबद्दल ब्लॉग लिहायचा आणि मी या सर्वांत सक्रिय सहभागी होतो. त्यामुळे सर्व गोष्टी नैसर्गिकरित्या घडून आल्या. शिवाय माझ्या निर्णयावर माझ्या कुटुंबाची कधीच प्रतिकूल प्रतिक्रिया आली नाही. त्यांनी केवळ माझ्या निर्णयाचं समर्थनच केलं नाही, तर त्यांनी ते जोपासलंदेखील. मी माझ्या आवडीनुसार हे क्षेत्र निवडेन आणि पुढे जाऊन चित्रपट बनवेन हे मी ही निवड करण्यापूर्वीच त्यांना माहीत होतं.

प्रश्न : या क्षेत्रातला तुमचा पहिला प्रोजेक्ट कोणता होता? तो अनुभव कसा होता?

अभय: माझा पहिला प्रोजेक्ट म्हणाल तर तो माझी बहिण सईच्या त्यावेळेसच्या नवीन फूड ब्लॉगसाठी तयार केलेला व्हिडिओ होता. मला त्यासाठी पैसेदेखील मिळाले होते (सई आता एक प्रसिद्ध फूड ब्लॉगर, फूड हिस्टोरियन आणि कन्सल्टन्ट आहे). त्यावेळेस आम्ही संगीतावर आधारित साधे, उद्बोधक व्हिडिओ बनवायचे ठरवले, ज्यात साहित्य आणि खाण्याचे पदार्थ मध्यवर्ती होते.

Abhay Koranne 2

Abhay Koranne with Vikramaditya Motwane

एखादी गोष्ट योग्यरित्या स्क्रिप्टिंग, दिग्दर्शन आणि संपादित करण्याचा हा माझा पहिला अनुभव होता. हे करत असताना मी माझ्या बहिणीच्या सहनशीलतेचे आभार मानायला हवेत, कारण हे सर्व व्हिडिओ एकत्र कसे करायचे हे आम्हाला शोधायला बराच वेळ गेला. पण, तो एक शिकण्याचा अमूल्य अनुभवही होता. कारण, आमच्याकडे अक्टर्स नव्हते, आम्ही शॉट ब्रेकडाऊन करायला शिकत होतो, एखादं कथानक तयार करून त्याच्याभोवती हा सर्व ड्रामा तयार करत होतो, मग अगदी ते ओव्हनमध्ये ब्रेड बनवण्याइतपत का असेना. तरीही ते व्हिडिओ यशस्वी झाले आणि फूड ब्लॉगर समुदायानं त्यांचं कौतुक केलं आणि आम्हाला YouTube च्या माध्यमातून काही कमाईही झाली. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते माझं पहिलं पेइंग गिग म्हणता येईल.

त्या दरम्यानच मी चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम करत होतो आणि काही जाहिरातींचं कामही करत होतो.

प्रश्न : ‘भावेश जोशी’ ची सुरुवात कशी झाली? भावेश जोशीसाठी, तुमच्याकडे फॅंटम, विक्रमादित्य मोटवाने, अमित त्रिवेदी, हर्षवर्धन कपूरसारखा फ्रेश चेहरा यासारख्या सर्वोत्कृष्ट गोष्टी होत्या… सुपरहिरो बनवताना तुमची कल्पना काय होती? लेखक म्हणून पदार्पणाचा अनुभव कसा होता?

अभय: ‘उडान’ आणि ‘लुटेरा’ या सिनेमांमुळं विक्रमादित्य मोटवाने माझे आवडते हिंदी प्रोड्युसर होते. विशेषतः उडानचा माझ्यावर खूप खोलवर प्रभाव पडला. मला विक्रमादित्य मोटवाने यांचा ईमेल आयडी ऑनलाइन सापडला आणि माझ्या लेखनाच्या नमुन्यांसह मी त्यांना ईमेल करायचं ठरवलं.

त्यांना माझ्या लिखाणाचे नमुने आणि मी ज्या प्रकारे ईमेल लिहिला ते आवडलं आणि त्यांनी मला मीटिंगसाठी बोलावलं. ‘भावेश जोशी’ ची संकल्पना त्यांची होती. त्यांनी त्याबद्दल मला सांगितलं की, कसा एक सामान्य माणूस भ्रष्टाचाराविरुद्ध जागरुक बनतो.

या विषयावर त्यांनी आधी सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्क्रिप्ट म्हणावी तशी जमून आली नव्हती. एक सुखद योगायोग हा की, एका माणसानं भ्रष्ट व्यवस्थेला हात घातल्याबद्दल मीही एक कथा लिहिण्याचा प्रयत्न केला होता. मी सुचवलेल्या कल्पना विक्रमना आवडल्या – मी सुचवलं की, आपण पाणी टंचाईचा कथानक म्हणून वापर करू आणि Insaaf, youtube चॅनेल वगैरे दाखवू. मग आम्ही एकत्रितपणे त्या चित्रपटाची कथा तयार केली आणि यात भावेश जोशी हे मुख्य पात्र नसून, त्याचा मरणारा मित्र आहे हा त्यातला एक महत्चाचा घटक जोडला.

Abhay Koranne 1

मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो की विक्रम मोटवाने यांनी मला त्याच्यासोबत ही वैयक्तिक गोष्ट लिहिण्याची संधी दिली. नवोदित असूनही, त्यांनी मला प्रचंड creative freedom दिले आणि लेखक म्हणून दुय्यम व्यक्ती न मानता, मला समान वागणूक दिली. थोडक्यात सांगायचं, तर फिल्म स्कूलमध्ये फॉर्मल शिक्षण घेतलेलं असूनही, मी ‘भावेश जोशी’ माझी फिल्म स्कूल मानतो, कारण मी भारतीय चित्रपटसृष्टीतील मास्टर विक्रम मोटवाने यांच्याकडून अशाप्रकारचा चित्रपट बनवणं ही गोष्ट शिकलो. या चित्रपटाच्या निमित्तानंच मला अनुराग कश्यप यांच्यासोबत चित्रपटाचे संवाद लिहिण्यासाठी एक दिवस घालवता आला आणि त्या एका दिवसात त्यांनी मला लिहिण्याबद्दल खूप काही शिकवलं. हा चित्रपट वेळेत बनवणं खूप कठीण होतं; फँटममधील परिस्थिती आधीच समोर आली होती. त्यामुळे चित्रपट थांबला आणि दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झाला. पुढेही तो रिलीज होईपर्यंत इतर अनेक समस्या होत्या. पण, काहीतरी क्रिएटिव्ह केल्याचं समाधान होतं. मुख्यतः एखादी व्यक्ती एखादी गोष्ट इतकी खोलवर वैयक्तिक कशी घेऊ शकते, जे तुम्हाला व्यक्त करणे आवश्यक आहे आणि एखादी कथा अशाप्रकारे लिहू शकते की ती इतरांनाही अनुकूल होईल हे विक्रमच्या सहकार्यामुळे हे समजून घ्यायला मला खूपच मदत झाली.

प्रश्न : विक्रमादित्य मोटवाने यांनी एका मुलाखतीत असं म्हंटलं होतं की, भावेश जोशी ही व्यक्तिरेखा जर स्त्री असती तर एक जास्त चांगला सुपरहिरो बनू शकला असता… तुम्हाला काय वाटतं? तुम्हालाही अशी काही खंत वाटते का? या चित्रपटाविषयीच्या सर्वोत्कृष्ट गोष्टी कोणत्या होत्या?

अभय: ‘भावेश जोशी’ च्या शूटिंगचा फायनल ड्राफ्ट लिहिण्यासाठी आम्ही आठवडाभर अलिबागला गेलो होतो. मी सकाळी समुद्रकिनारी फिरायला जायचो, दिवसभर लिहायचो, मग विक्रम समुद्रकिनारी फिरायला जाऊन यायचा, असा आमचा दिवस संपायचा. सुमारे ४-५ दिवसांनी विक्रम फिरून परत आला तो एका नवीन कल्पनेसह – ‘नायक भावेशच्या मित्राऐवजी त्याची मैत्रीण असावी.’ आम्हा दोघांनाही या कल्पनेने लगेचच उत्साह आला आणि आम्ही उर्वरित संध्याकाळ चित्रपटात नायिका कसा बदल घडवून आणेल यावर चर्चा करण्यात घालवली- नायक, एक स्त्री म्हणून, अधिकच उपेक्षित होईल कारण ती पुरुषाच्या जगात एक स्त्री आहे, तिचा प्रवास अधिक परिणामकारक असेल,वगैरे. पण दुर्दैवानं, सकाळपर्यंत आमच्या लक्षात आलं की, चित्रपटासंदर्भातील इतर गोष्टी आधीच फार पुढे गेलेल्या आहेत. आम्ही कास्टिंग लॉक केलेलं होतं आणि या नायकाऐवजी नायिकेच्या वळणामुळे सगळ्याच गोष्टींवर सखोल परिणाम झाला असता. पण तरीही, आम्हा दोघांना आजही असं वाटतं की चित्रपटात नायक स्त्री पात्र असायला हवं होतं.

प्रश्न : ‘भावेश जोशी’च्या सेटवरील काही लक्षणीय प्रसंग तुम्हाला आठवतो का?

अभय: हो नक्कीच… मी या चित्रपटात एक छोटी भूमिका केली आहे. तीदेखील विक्रमने आग्रह धरला होता की, मी या चित्रपटात काम करावं आणि एक व्यक्तिरेखा साकारावी जी आपली गाडी चुकीच्या बाजूनं एका मार्गावर आणत राहते आणि भावेशशी भांडते. अडचण अशी होती की आम्ही एका अरुंद एका मार्गावर शूटिंग करत होतो आणि त्यासाठी मला हर्षवर्धन कपूर आणि प्रियांशू पैन्युली यांच्या दिशेनं पूर्ण वेगात गाडी चालवून ब्रेक दाबायचा होता.

हे जरा आव्हानात्मकच होतं, पण मी ते कसंतरी मॅनेज केलं. पण, नंतर अजून एक सीन, जो चित्रपटाच्या उत्तरार्धात होता, त्यामध्ये असं होतं की, मी माझी कार त्या वनवेमध्ये आणतो, हर्षला त्याच्या ‘भावेश’ वेशभूषेत पाहतो, तो मला मागे हटण्यास सांगतो आणि मी घाबरून गाडी रिव्हर्स घेतो. हे करताना प्रोब्लेम असा होता की, जेव्हा मी कार रिव्हर्स करण्यासाठी मागे वळून पाहिलं, तेव्हा कॅमेरा मागील खिडकीला ब्लॉक करत होता, त्यामुळे मी कुठं जातोय हे मलाच दिसत नव्हतं. एका सहाय्यकाला समोरच्या प्रवासी सीटच्या फूटवेलमध्ये खाली पडून स्टियरिंग ‘ऑफ कॅमेरा’ हाताळावा लागला आणि त्यावेळी मी फक्त एक्सिलेटर, ब्रेक आणि क्लच दाबले. आमची रिहर्सल चांगली झाली, पण प्रत्यक्षातलं दृश्य (जे नंतर सिनेमातून हटवलं गेलं) खराब झालं. मी जरी वेळेत ब्रेक लावण्यात यशस्वी झालो असलो तरी माझी कार दुसऱ्या कारवर ऑलमोस्ट क्रॅश झाली होती. हा प्रसंग माझ्या चांगलाच लक्षात राहणार आहे.

प्रश्न : रॉकेट बॉईज बद्दल बोलूया… ही सिरीज एक मास्टरपीस आहे. ही कथा तुमच्या मनात कशी आली? विशेषत: जेव्हा आपल्याकडे ओटीटीच्या बाबतीत मागणी तसा पुरवठा हे धोरण आहे, तिथे अशा बायोग्राफीबद्दल विचार करणं, ते देखील शास्त्रज्ञांबद्दल… हे सर्व कागदावर आणि नंतर प्रत्यक्षात कसं आलं?

अभय: ‘भावेश जोशी’ प्रमाणेच ‘रॉकेट बॉईज’चं बीज रागातून पेरलं गेलं होतं. ‘भावेश जोशी’ भ्रष्टाचार आणि सडलेल्या व्यवस्थेबद्दल संताप व्यक्त करत असताना ‘रॉकेट बॉईज’चा उगम झाला. तेव्हा अशी परिस्थिती होती की त्या वेळेस काही अश्या गोष्टी सांगितल्या जायच्या की वर्तमान सरकार येण्यापूर्वी भारताने काहीही साध्य केले नव्हते. इतक्या महान संस्थेची निर्मिती, स्वातंत्र्याच्या वेळी त्या दिशेने उचललेली छोटी -छोटी पावलं हे सगळं पूर्णपणे पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला. या प्रकाराने अनेक क्षेत्रातील महत्त्वाच्या भारतीयांचं योगदान पुसून टाकलं जातंय असं मला वाटत होतं. जे खरे हिरो आहेत त्यांची गोष्ट सांगितली गेली पाहिजे, म्हणून मी दोन नामांकित शास्त्रज्ञांची गोष्ट सांगायचं ठरवलं ज्यांच्या योगदानाशिवाय आपल्याकडे स्पेस प्रोग्राम, मिसाईल्स, सॅटेलाईट्स झालेच नसते. भारत न्युक्लियर स्टेट म्हणून अस्तित्वातच आला नसता. त्या दोन महान शास्त्रज्ञ व्यक्ती होत्या – डॉ. विक्रम साराभाई आणि डॉ. होमी भाभा! मी ही कल्पना सिद्धार्थ रॉय कपूर यांच्याकडे मांडली. त्यांनी ही कथा लोकांपर्यंत पोहोचणं किती गरजेचं आहे याचं महत्त्व ओळखलं आणि आम्ही एकत्र काम करायचं ठरवलं. त्यावेळी, मी विक्रमादित्य मोटवाने सोबत तयार केलेल्या आणखी एका मोठ्या प्रोजेक्ट वर काम करत होतो. तो एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट होता आणि एका वेळेस दोन्ही सांभाळणं मला अशक्य होतं. म्हणून, मी रॉय कपूर फिल्म्ससाठी ‘रॉकेट बॉईज’ची विस्तृत कथा लिहिली आणि त्यांना सुपूर्त केली. त्यानंतर, अर्थातच सहनिर्माते निखिल अडवाणी आणि लेखक-दिग्दर्शक अभय पन्नू आले आणि त्यांनी कथेला एका वेगळ्या स्तरावर नेलं. यावेळी, मी जसा ‘भावेश जोशी’ च्या निर्मितीमध्ये सहभागी होतो त्याप्रमाणे या वेबसिरीजच्या निर्मितीमध्ये सहभागी नव्हतो.

प्रश्न : ‘रॉकेट बॉईज’ मधील पात्रांचं वैयक्तिक, व्यावसायिक जीवन आणि कथेची ऐतिहासिक पार्श्वभूमी यांचा समतोल राखणं कठीण होतं का? म्हणजे कला, विज्ञान आणि राजकारण यांचा एकत्रित समतोल असं म्हणायचं आहे.

अभय: या शास्त्रज्ञांच्या वैयक्तिक कथा जगासमोर आणण्याचा हेतू अगदी सुरुवातीपासूनच होता. त्यांनी तरुण पणी काहीतरी धडपड करायला सुरुवात केली आणि अनेकदा अपयशही आलं. हे शास्त्रज्ञ किंवा ही पात्रं देखील माणसं होती आणि त्यांनाही आपल्या सर्वांप्रमाणेच वैयक्तिक जीवन आणि समस्या होत्या. त्या तशा होत्या हे समजून घेतल्याशिवाय, भारताच्या न्युक्लियर आणि स्पेस प्रोग्रॅमची गोष्ट तुम्ही सांगू शकत नाही आणि प्रेक्षकांना त्यात गुंतवूही शकत नाही. ते कोणी देव किंवा सुपरहीरो नव्हते. तसच कोणतीही घटना किंवा कथा राजकारणापासून विरहित असू शकत नाही. त्यावेळच्या राजकारणावर काहीच भाष्य न करणं किंवा त्याचा अनुल्लेख करणं ही देखील एक प्रकारची राजकीय भूमिकाच म्हणता येईल. त्या वेळच्या सरकारच्या वैज्ञानिक धोरणामुळे आणि विशेषत: पंडित नेहरू, ज्यांच्याकडे दूरगामी दृष्टी होती आणि त्या वैज्ञानिक कार्यक्रमांना आणि संस्थांना आवश्यक असलेलं सर्व सरकारी पाठबळ मिळालं होतं याची खात्री करून घेतल्यामुळे या कार्यक्रमांची भरभराट झाली हे आजच्या पिढीला दाखवणं फार महत्त्वाचं होतं. त्यांना हे माहीत होतं की ते फक्त बीज पेरत होते… ज्याची चांगली फळं पुढच्या पिढ्यांना म्हणजे आपल्याला चाखायला मिळतील. मला आनंद वाटतो की मला या शास्त्रज्ञांची गोष्ट जगासमोर आणावीशी वाटली आणि ती फार उत्तमपणे आणली गेली. ‘रॉकेट बॉइज’ला सर्वच वयोगटातील प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला.

प्रश्न : ‘रॉकेट बॉईज’ बद्दलच्या अनेक मुलाखतींवरून असं लक्षात येतं की, वेबसिरीजमधली काही पात्रं काल्पनिक आहेत. जेव्हा वास्तविक जीवनातील कथेचा अवलंब केला जातो तेव्हा सिनेमॅटिक लिबर्टीसाठी लेखकांवर नेहमीच टीका केली जाते. स्वत: एक लेखक म्हणून सिनेमॅटिक लिबर्टीबद्दल तुमचं मत काय आहे?

अभय: मला वाटतं की या प्रश्नाचा रोख ‘रॉकेट बॉईज’ मधील ‘डॉ. रझा’ या पात्राकडे आहे. हे पात्र सिरीजचा लेखक- दिग्दर्शक असलेल्या अभय पन्नूने तयार केलेलं होतं. या पात्रावर टीका झाली होती. पण, तुम्ही जर संपूर्ण शो पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल, की ते पात्र जसं अपेक्षित होतं त्यापेक्षा अगदीच उलट आहे. डॉ. रझा हा सचोटीने काम करणारा आणि प्रामाणिक आहे. जो होमी आणि विक्रम यांना सावध करण्याचा प्रयत्न करतो की अमेरिकन हेर त्यांचे इरादे हाणून पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या ट्रॅकचं ‘भावनिक सत्य’ हे होतं की आपण एखाद्या विशिष्ट समुदायातील लोकांना केवळ ते त्या समुदायाचे आहेत म्हणून कसं बदनाम करतो आणि परिणामी ते नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात सापडतात.

सर्व सिनेमा आणि चित्रपटनिर्मिती ‘भावनिकदृष्ट्या प्रामाणिक’ असण्यावर अवलंबून असते. याचा अर्थ असा नाही की, चित्रपट निर्मात्यानं सत्य घटनांवर आधारित एखादी गोष्ट बनवताना वस्तुस्थितीच्या अचूकतेकडे लक्ष दिलं पाहिजे. एखाद्या कथानकाचं ‘भावनिक सत्य’ हे ऐतिहासिक अचूकतेचा गुलाम होण्यापेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचं आहे –तो फिक्शनचा उद्देश नाही, मग ते कथानक कितीही सत्य घटनेवर आधारित असलं तरीही! काहीवेळा, घटनांचा वास्तविक क्रम जरी A,B,C,D हा मानला गेला, तर A आणि D मधील हा प्रवास आहे तसा दाखवणं परिणामकारक नसतं , म्हणून एखाद्याला A आणि D मधील प्रवास काल्पनिक बनवावा लागतो. क्वेंटिन टॅरँटिनो, हा एक महान चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. याने एक पाऊल पुढे जाऊन सर्व ऐतिहासिक अचूकतेला फाट्यावर मारलं- त्याने त्याच्या ‘इंग्लोरियस बास्टर्ड्स’ चित्रपटात हिटलरला ज्यू अमेरिकन सैनिकानं मारलेलं दाखवलं आहे. अगदी डॉक्युमेंटरीदेखील नेहमीच तथ्यात्मक नसतात आणि त्यात फेरफाराचा समावेश असतो. कथा आणि थीम सर्व ‘भावनिक सत्याशी’ प्रामाणिक असायला हवं – तुम्ही कथेतून काय सांगू इच्छिता? त्यामुळे मी ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ पेक्षा ‘भावनिक प्रामाणिकपणा’ हा शब्द वापरेन.

प्रश्न : कथा पुढे नेण्याचे अनेक मार्ग असू शकतात. अशा संदिग्ध परिस्थितीत, तुम्ही विशिष्ट मार्ग कसा निवडता आणि कथेसाठी तो न्याय्य आणि सर्वात योग्य मार्ग हे कसं ठरवता?

अभय: वर म्हटल्याप्रमाणेच, कथानकाचं भावनिक सत्य लेखकासाठी काय आहे यावर ते अवलंबून आहे. कथेतून लेखक काय सांगू पाहतोय? ‘भावेश जोशी’ सोशल मीडियावर एक कल्ट फिल्म बनल्यानंतर अनेकांनी आम्हाला मेसेज केले की आम्ही भावेशला खलनायकाला मारहाण करताना किंवा त्याला तुरुंगात पोचवताना किंवा इतर काही पद्धतीने न्याय मिळवून देताना दाखवायला हवं होतं. पण, कथानकासाठी एखाद्यानं अगदी कठोर संकटांना तोंड देत लढायचं थांबवू नये , जिंकणं किंवा हरणं या गोष्टीनं काही फरक पडत नाही – आमचं ‘भावनिक सत्य’ हे अधोरेखित करण्यासाठी होतं. त्यामुळे, आमच्या कथेच्या शेवटी एक मुख्य पात्र आहे जे मृत्यूच्या दारातून परत येतं ज्यामध्ये संकटांना न जुमानता, आव्हानांना न जुमानता लढा सुरू ठेवण्याचं धैर्य आहे. हा होता विक्रमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन- आणि माझा म्हणाल तर -प्रत्येक लेखकानं स्वतःच्या आत डोकावून पाहिलं पाहिजे आणि त्याचं भावनिक सत्य आणि त्याला कथेतून काय सांगायचं आहे ते शोधलं पाहिजे. उत्तर आपोआप स्पष्ट होईल.

प्रश्न : ‘रॉकेट बॉईज’ मध्ये डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम यांची व्यक्तिरेखा खूप चांगल्या प्रकारे उभी केलेली पाहून आम्हाला खूप आनंद झाला. आपण त्याच्यावर पुढील बायोपिकची अपेक्षा करू शकतो का?

अभय: मलादेखील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावर काहीतरी पहायला आवडेल. पण, सध्यातरी तसा काही प्लॅन नाहीये.

फँटम आणि रॉय कपूर या दोन मोठ्या प्रॉडक्शनहाऊसेसमध्ये काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता? आम्हाला ‘चक्र’ आणि नागराज मंजुळे यांच्यासोबतच्या भावी प्रोजेक्टबद्दलही ऐकायला आवडेल.

अभय: मी स्वतःला खरोखर अत्यंत भाग्यवान समजतो, की मला सुरुवातीलाच उत्तम लोकांच्यासोबत काम करायला मिळालं. माझा फँटम आणि आरकेएफ या दोन्हींबाबतचा अनुभव अतिशय अद्भुत होता. मलाही काही वाईट अनुभव आले आहेत, प्रोजेक्ट ज्या पद्धतीने हाताळला गेला त्यामुळे मी एक चित्रपट सोडला, पण विक्रमादित्य मोटवाने ‘फँटम’सह आणि नंतर त्यांची स्वतःची कंपनी ‘आंदोलन’ आणि ‘रॉय कपूर फिल्म्स’मधील सिद्धार्थ रॉय कपूर यांनी मला अत्यंत कल्पकतेनं पाठिंबा दिला आहे, ज्याबद्दल मी सदैव कृतज्ञ राहीन. शिवाय त्यांच्याशी एक विशेष नातं तयार झालं आहे, जे मी इथून पुढेही जपेन.

‘चक्र’ बद्दल सांगायचं झालं तर हा प्रोजेक्ट थोडा रखडला आहे.

नागराज मंजुळे आणि रॉय कपूर फिल्म्ससोबतच्या प्रोजेक्टवर मी सध्या काम करतोय. माझं लिखाण सुरु आहे. लवकरच त्याचं प्री-प्रॉडक्शन सुरु होईल. मीडियामध्येही त्याबद्दल जाहीर करण्यात आलं आहे. हे कथानक ‘मटका’ या जुगार खेळावर आधारित आहे आणि मी त्याची पटकथा लिहित आहे. मी याबद्दल सध्या जास्त काही सांगू शकत नाही. याशिवाय तो मुंबईत सेट झाला असला तरी तो एक सामान्य क्राईम शो किंवा तत्सम शो नाहीये हे मी नक्कीच सांगू इच्छितो. खरं तर तो त्यापासून खूप वेगळा आहे. या कथेचा गाभा तोच आहे आणि मला स्वतःला ज्याचा शोध घ्यायला आवडतं ते म्हणजे सिस्टीमला प्रश्न विचारणं आणि त्याची कारणमीमांसा करणं… नागराज मंजुळे सर ते फार उत्तमरीत्या करतात. नागराज सरांसोबत काम करण्याचा अनुभव खूप काही नवीन शिकवणारा होता आणि मी आमच्या या कलाकृतीची आतुरतेने वाट पाहतोय.

प्रश्न : ‘रॉकेट बॉईज’साठी तुम्हाला पहिला वहिला ‘उत्कृष्ट मूळ कथालेखक’ म्हणून पुरस्कार मिळाला आहे. हा तुमचा पहिला पुरस्कार कसा होता?

अभय: मला प्रामाणिकपणे असं वाटतं की पुरस्कार मिळणं हे छानच असतं. तुम्हाला तुमच्या समवयस्कांकडूनही ओळखलं जाणं हा विलक्षण अनुभव असतो. पण, मला विचाराल तर माझ्यासाठी माझं वैयक्तिक सर्जनशील समाधान, आणि प्रेक्षकांकडून थेट अभिप्राय मिळणं हे खूप आनंददायी आहे आणि मला ते अधिक आवडतं.

प्रश्न : कोरान्ने कुटुंब एक उच्चशिक्षित उच्च अभिरुची असलेलं कुटुंब आहे. तुमचे कुटुंबीय तुम्हाला कशी प्रेरणा देतात, शिवाय त्याच वेळी तुम्ही विनम्र राहाल हेही कसं पाहतात?

अभय: हाsहाsहा… मला वाटतं की कोणीतरी माझ्याबद्दल असं काही विचारण्याची ही पहिलीच वेळ असावी…

माझी बहीण सई ही एक हुशार लेखिका आहे, जी सहजतेने तिच्या लेखनात आणि तिच्या सर्व सर्जनशील कार्यात प्रेरणादायक आणि प्रामाणिकपणे काम करते. त्यामुळे तिचे अनेक लॉयल फॉलोअर्स आहेत. मी सुरुवातीला म्हणालो त्याप्रमाणे, आमच्या आईबाबांनी आम्ही निवडलेल्या करियर्सना आणि त्यातील आमच्या प्रवासाला बिनशर्त पाठींबा दिला. त्याबद्दल माझी बहीण आणि मी दोघेही अत्यंत कृतज्ञ आहोत. त्यांनी कायमच आमच्या आवडी जोपासता येतील, त्यात उत्तम काम करता येईल असं वातावरण निर्माण केलं. इंटरनेट येण्याच्या आधीही, मध्यमवर्गीय कुटुंब असूनही आम्हाला आपल्या संस्कृतीची आणि जगभरातील उत्तम गोष्टींची माहिती दिली जात होती, जी फार कमी मुलांना मिळाली असेल. सई आणि मी, आम्ही दोघंही या गोष्टींचं महत्त्व जाणतो आणि आमच्या पालकांनी आम्हाला दिलेल्या या प्रिव्हिलेजला योग्य न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणा आणि सचोटीनं आमची सर्जनशीलता वाढवण्याचा आमचा प्रयत्न असतो.

प्रश्न : नुकतंच लग्न झाल्यामुळं, आम्ही सोशल मीडियावर तुमची मोहक छायाचित्रं पाहतो. आम्हाला श्वेता कोरान्ने यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल..

अभय: श्वेताने तिच्या नावाला ‘कोरान्ने’ जोडलेलं नाही 🙂

प्रामाणिकपणे सांगायचं तर लग्न माझ्यासाठी खूप छान गोष्ट आहे किंवा टप्पा आहे… मला एक कणखर लेखक आणि चित्रपट निर्माता बनवलं आहे. श्वेता आणि माझ्यात एक सहज आणि घट्ट बंध आहे. आम्ही उत्तम जिवलग मित्र आहोत आणि एकमेकांना पाठिंबा देऊन दररोज एकमेकांना आपापलं ‘बेस्ट’ काम करण्यासाठी प्रोत्साहनही देतो. श्वेता अतिशय हुशार आहे आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात अत्यंत कुशल अभ्यासक आणि संशोधक आहे: तिनं आपलं जीवन लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्याच्या क्षेत्रात विशेषतः लैंगिक समस्यांवर काम करण्यासाठी समर्पित केलं आहे. किशोरवयीन मुलींना त्यांना आवश्यक असलेली माहिती आणि आरोग्यसेवा मिळवून देणारी व्यवस्था सेट करण्यात मदत करण्यासाठी, बांगलादेशातील दुर्गम भागांसारख्या ठिकाणी, शिवाय नेपाळ, भूतान, अंतर्गत महाराष्ट्र आणि झारखंड अशा ठिकाणी खूप प्रवास केला आहे. सध्या ती एका जागतिक संस्थेसोबत काम करत आहे आणि आफ्रिका, भारत किंवा जगभरातील गरीब प्रदेशात, जगण्यासाठी जग एक चांगलं ठिकाण बनावं या दिशेनं काम करणारे प्रोजेक्ट आणि त्यासाठी आवश्यक निधी याबाबत काम करत आहे. तिची तिच्या कामाबद्दलची आवड, त्यात स्वतःला उत्कटतेनं झोकून देणं हे मला माझ्या स्वतःच्या आवडीनुसार काम करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यास प्रवृत्त करतं. आम्ही पतीपत्नी म्हणजे एक उत्कृष्ट टीम आहोत; कामाच्या वेळी एकमेकांना सपोर्ट तर करतोच शिवाय इतर वेळी थोड्या वेडेपणाच्या आणि मजेशीर गोष्टींसाठीदेखील वेळ काढतो.

अभय कोरान्ने यांच्याशी झालेल्या या मनस्वी गप्पांसाठी त्यांनी आपल्या व्यग्रतेतून वेळ काढला त्याबद्दल ‘चित्रवेध’ टीमतर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार आणि त्यांच्या आगामी सिनेलेखन प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा!!!

COMMENTS